अशा रसाळ भाषेत मराठीची थोरवी गाणारे, मराठी साहित्याचे मानदंड, ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी राजभाषा दिन “म्हणून साजरा केला जातो. आपल्या मायबोलीची महानता व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
“मराठी आमुची मायबोली, स्वराज्याची शान,
भजन, कीर्तन, भारुड ऐकताच हरपुन जाते भान, काना,मात्रा,वेलांटीचे मिळाले आजे वाण,
मराठी जणू अमृताची खाण,मातीचा अभिमान। ”
सर्वांग सुंदर, नादमाधुर्य,गोडवा असलेल्या मराठी भाषेला अत्यंत पुरातन व उज्वल परपंरा लाभली आहे.मराठी ही भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी १ भाषा आहे. भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी मराठी ही तिसरी भाषा आहे.
“ओवी ज्ञानेशाची,अभंग तुकयाचा ।
आर्या मोरोपंतांची, समृद्ध मराठी महाराष्ट्राची । ”
आपली भाषा अनेक संतांच्या किर्तनांनी,भारुडांनी,ग्रंथानी सजली आहे. अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या कथा, कादंबऱ्या, कविता, लेख, चारोळ्या यांनी समृद्ध झाली आहे.
“इये मह्राटीचिया नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी ।”
“जैसे पुष्पामाजी पुष्प मोगरी।
की परिमळांमाजि कस्तुरी ।
तैसी भाषांमाजि साजिरी । मराठीया । ”
अशा उत्कृष्ट शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे कौतुक केले आहे. संस्कृतपासून निर्माण झालेल्या आपल्या भाषेला अमोघ साहित्यसंपदा लाभली आहे. वाचण्यास एक जन्म कमी पडेल इतके अमूल्य लिखाण मराठी भाषेत उपलब्ध आहे.
“मराठी मायबोली अमुची,बोल जिचे रसाळ।
भाषा सहज सुंदर, प्रेमळ, लडिवाळ।”
मराठीमुळेच आपल्याला प्रेम,राग,काळजी, आपुलकी व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.जगाचा इतिहास दृष्टीक्षेपात आला.संत वाड़मय सुककर झाले.आपला प्रदेश,संस्कृती समजून घेण्यासाठी मायबोलीचाच आधार घ्यावा लागतो.
स्वातंत्र्यवीर सावरकर घडले मराठीमुळेच.चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके ते विनोदवीर दादा कोंडके घडले मराठी मातीमध्येच.
“पाहुणे पोटभर जेवतात तुपाशी।
स्वगृही मराठी मायबोली उपाशी।”
ज्या मराठीने आपल्याला मोठे केले, ग्लोबल बनण्याच्या पात्रतेचे बनविले; त्याच मराठी भाषेत एकमेकांसोबत बोलणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. सामर्थ्यवान असलेल्या आपल्या मराठीचे वात्सल्य अनेकांना जाणवत नाही;कारण ती आर्थिक संधी, प्रतिष्ठा देण्यात कमी पडते.इंग्रजीशिवाय पर्याय नाही म्हणून आपण ती भाषा अवगत करून ऍक्टिव्ह मोड वर ठेवतो.मराठी विषयीचे प्रेम हे केवळ भावनिक व प्रतिकात्मक असल्यामुळे आपली भाषा नेहमीच स्लीप मोड वर राहिली. मध्यंतरी एक संदेश मोबाईल वर पाहण्यात आला व बऱ्याच अंशी पटलाही.”धन्य ती मराठी भाषा; जिने आज अनेक पालकांना इंग्रजी शाळांची फी भरण्याच्या पात्रतेचे बनवले”.स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर भाषांचे महत्त्व बळावले आहे परंतु मराठी बद्दल हीन भावना बाळगणे चुकीचे आहे.
“माय मराठी मरो पण इंग्रजी मावशी जगो”असे धोरण राहिल्यास १००० वर्षापूर्वीचा इतिहास असणाऱ्या मराठी भाषेचा ऱ्हास होईल.
“रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला फक्त बोलू मराठी”।
राजभाषा दिन साजरा करत असताना आपली भाषा ‘दीन”होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वर्षातील एक दिवस एकमेकांना शुभेच्छा देऊन ‘मराठीपण मिरवण्यापेक्षा मराठी अक्षरे गिरवणे’ही आपली जबाबदारी आहे. इंग्रजी ही काळाची गरज असली तरी मराठीची कास सोडू नये. शाळा इंग्रजी असल्या तरी संस्कार मराठी द्या. नवीन पिढीला महाराष्ट्राचा, मराठीचा इतिहास, साहित्य वाचायला प्रवृत्त करू शकतो ना आपण.
केवळ ‘दुकानांच्या पाट्या’नाही तर दुकानदार देखील मराठी झाला पाहिजे.तुम्ही कोणत्याही राज्याचे असाल तरी महाराष्ट्रात तुम्ही मराठी आहात. तुम्हाला मराठी आलंच पाहिजे. मराठी बोलल चं पाहिजे असे नियम हवेत.
आज अनेक मराठी माध्यमातील शाळांची दुरवस्था झाली आहे. ‘शिक्षणाची माध्यम भाषा म्हणून टिकली तर मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा मिळेल. महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या माणसापासून जगाच्या काना कोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मातृभाषेबदद्दल नितांत आदर व अभिमान वाटला पाहिजे.
“परप्रांती, परदेशी वाजू द्या मराठीचे चौघडे।
मराठीचे विश्व वसू द्या जगती चोहीकडे।”
भाषिकांची ताकद कोणत्याही भाषेला बळ देते. आपल्या भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी घेऊन खरा ‘मराठी बाणा’जगाला दाखवून देऊ. लवकर च मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी आशा व्यक्त करूया. मराठीचा बोलबाला आसमंतात दुमदुमण्यासाठी व ‘लय भारी’ बनवण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया.
जय महाराष्ट्र। जय मराठी। –
– शितू निघोट