“अरेरे! गेला का, चांगला माणूस होता”
मला हा जरा न कळलेला प्रकार आहे. तो चांगला होता हे ठीक आहे… पण जिवंतपणी त्याला का नाही सांगितलं की तो खूप चांगला आहे… तो मेल्यावर त्याला इव्हॉल्यूएट करण्यात काय अर्थ आहे?
पण हे आपल्याकडंच दुर्दैव आहे…
लोकांनी तुम्ही चांगले आहात हे कबूल करण्यासाठी तुम्हाला मरावं लागतं… तुमच्या जिवंतपणी फार थोडे लोक तुम्हाला “तुम्ही चांगले आहात/तुमचं काम चांगलं आहे” असं म्हणतात…
असं का होतं हा मला पडलेला प्रश्न…
असं तर नसेल की त्या माणसाची किंमतच कळत नाही? तो नसताना मात्र त्याची उणीव भासत असल्याने अशी प्रशंसा येते…
का असं असेल की किंमत तर कळते पण आपला इगो दुखावतो म्हणून त्याला बोलून नाही दाखवायचे…
एक नक्की. की आपल्या आयुष्यातील अणि आजूबाजूची माणसे ‘आपली काय खोट आहे, आपण कुठे चुकीचे आहोत’ ह्याकडे बारीक लक्ष ठेवून असतात अणि आपल्या स्वभावाचे वर्णन करताना हे निगेटिव्ह मुद्दे अगदी ठळकपणे अधोरेखित करून सांगितले जातात…
त्यामुळे असेही होत असेल की त्या माणसाचे काय पॉझिटिव्हज् आहेत ह्याकडे लक्षच जात नाही.
का असं असेल हो? सगळे म्हणताहेत ना मग आपण पण मेलेल्या माणसाला थोर, चांगले म्हणा!
थोडक्यात! तुम्हाला जर थोरपण मिळवायचे असेल, लोकांनी तुम्हाला चांगले म्हणावे वाटत असेल तर तुम्ही ह्या भूतलावर नसले पाहिजे!!
…
माणसाचं किती भारी असतं बघा!
स्वतःचे लग्न/रीसेप्शन अशा ठिकाणी त्याला बुके (फूलं) मिळतात अणि एकदम त्याच्या प्रेतावर फूलं पडतात.
अरे जर फूलं द्यायचीच आहेत तर सहज म्हणून, भेटायला गेल्यावर का नाही एक तरी फूल देऊ शकत?
त्याला काही असा विशिष्ट प्रसंगच घडायला हवा का?
मला वाटतं जे आपण मृत शरीरावर किंवा फोटो वर किंवा समाधीवर पुष्पचक्र/पुष्पहार अर्पण करून सुद्धा मिळवत नाही तो आनंद जीवंत माणसाला एक फूल देण्यात आहे. पुष्पचक्र किंवा पुष्पहार अर्पण करणं हे फार औपचारिक असतं. त्यात किती प्रेम असतं माहीत नाही पण दिखावा भरपूर असू शकतो.
एकदा कुणाला भेटायला जाताना फक्त एक फूल नेऊन बघा. ती समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात पडेल.
…
असं बर्याच वेळा होतं ना! की…
“अरे त्याला बरंच काही सांगायचं होतं पण राहून गेलं”
मग माणसं फोटो समोर उभारून, समाधी समोर उभारून आपल्या भावना व्यक्त करतात. त्या कशाही असतिल, अगदी प्रेमापासून चुकीच्या कबुली पर्यंत.
पण खरंच ह्याचा उपयोग असतो?
आरे! समोरची व्यक्ती जर ऐकूच शकत नसेल तर तुमच्या कुठल्याही सांगण्याचा काय उपयोग?
मला वाटतं माणसाने आज ना उद्या, थोडा उशीर झाला तरी चालेल पण व्यक्ति जीवंत असतानाच आपल्या भावना बोलून दाखवाव्या. कमीतकमी ज्याला सांगतो तो ऐकून काहीतरी प्रतिक्रिया/प्रतिसाद तरी देईल… आनंदाची गोष्ट शेअर करायची आहे ना मग आत्ताच करा… उद्या हे शेअर करायला तो नसेल कदाचित!
…
मला मान्य आहे की प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात खूप बिझी असतो…
अणि आजकाल ह्या चढाओढीच्या जीवनात आणखीनच व्यस्तता आली आहे…
पण प्रत्येकाने आपले इमोशनल कोषंट व्यवस्थित सांभाळून ठेवले की नंतर पश्चाताप करायची वेळ येणार नाही!!!
विक्रम इंगळे
कंटेन्ट रायटर आणि ट्रान्स्लेटर