sm logo new

लेटकमर्स ( वेळ न पाळणे )

Share

Latest

मित्रांनो नमस्कार. पोस्ट खूप मोठी आहे. सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर या पोस्टमुळे तुमच्या आयुष्यात खूप बदल होऊ शकतो.

लहानणापासूनच ठरवलेले होते,आयुष्यात वेळ पाळायची, मेन्टेन करायची. त्यामुळे कुठेही जायचे असेल त्या वेळे आधी अर्धा पाऊण तास जाऊन पोहोचणे हे मनात ठरवलेले असायचे. कधी कधी काय असतं मित्रांनो सवयीचे रूपांतर व्यसनात होते, तर असे हे माझे वेळ मेन्टेन करायचे व्यसन. आपण इतर कोणत्याही गोष्टीत व्यवस्थित प्लॅनिंग करत असतो तर मग वेळ मेन्टेन करण्याचे का नसावे??? हा एक साधा सरळ सोपा प्रश्न.

मूळात लेट जाणे, मग ते नोकरी असो की वैयक्तिक आयुष्य, कोणत्याही सबबीवर लेट जाणे हे बरोबरच नाही. लेट जाणे म्हणजे दुसऱ्याला इरिटेट करणे, टॉर्चर करणे आणि त्यांचा अमूल्य वेळ निष्क्रिय / Unproductive करणे होय.

काही सो कॉल्ड सुशिक्षित लोकांना, वेळ मेन्टेन करणे कधीही जमत नाही. पण त्यांचे वागणे बोलणे, शिक्षण यावरून आपण असा अंदाज बांधू शकतो की ही मंडळी वेळ पाळत असावी, पण तसा अनुभव येत नाही आणि आपला अंदाज चुकतो. इतर वेळी त्यांचे बोलणे, टॅलेंट सगळंच अफाट असते.

काही मंडळी अशी असतात की जी, ऑफिसमध्ये, समाजात, आपल्या अपार्टमेंटमधे, मीटिंग, गेट टू गेदरला कधीही वेळेवर येत नाहीत. बहुतेक ठिकाणी कोणी ना कोणी असे लेटकमर्स असतात. त्यांना वारंवार सांगूनही उपयोग नसतो. बरं दुसरं असं की,जेंव्हा ही मंडळी तेथे पोहोचतात, तेंव्हा त्यांना आपण काही वेगळं ( चुकीचं ) केलंय असं मुळीच वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने ते नॉर्मल / रूटीन असते. साधी दिलगिरीही व्यक्त करत केली जात नाही. मानसिकता अशी असते की आपण नेहमीच लेटकमर्स आहोत हे त्यांना ठाऊक असते, याची त्यांना आतून जाणीव असते.

काही नोकरदार मंडळी, ऑफिस स्टाफ, अशी असतात की “मी थोडा वेळ लेट येते आहे / येतोय” असा वरिष्ठांना व्हॉट्स ॲपवर मेसेज करून मोकळे होतात. थोडा वेळ म्हणजे 15, 20 मिनिटे. ही 15, 20 मिनिटांची वेळ कधी कधी आणखी एक सबळ कारण सांगून एक तासही होऊ शकते. कधीतरी सबब सांगणे हे वाजवी आहे. आपण समजू शकतो. या मंडळींचे वैशिठ्य असे की, ही मंडळी आपण वेळेवर येऊ शकत नसल्याचे
कम्युनिकेशन वरिष्ठांना न विसरता पाठवण्यात खूप तत्पर, दक्ष / प्रॉम्प्ट असतात.

मला नेहमी पडलेला एक प्रश्न की, “आपलं रूटीन फिक्स आहे, नोकरी/ ऑफिस ला जाणे तर क्रमप्राप्त आहे, तेथे पोहोचण्याचे टायमिंग फिक्स आहे, केंव्हा ना केंव्हा तरी तुम्हाला
( म्हणजे या लेटकमर्सना हं ) सकाळी घर सोडणे हे भागच आहेच तर मग ही मंडळी उशिराने घर सोडायच्या ऐवजी थोडं लवकर का घर सोडू शकत नाहीत????

तर मित्रांनो, सर्वसाधारणपणे वेळेवर आपण का पोहोचू शकत नाही त्या कारणांवर काही सूचना सांगू इच्छितो. अमलात आणल्यास फायदा नक्की होईल.

1) सर्वात महत्त्वाचे की, आपल्याला किती वाजता घर किंवा कोणतेही तुमचं ठिकाण सोडायचे आहे हे कमिट करणे आवश्यक आहे. बघू , जाता येईल निवांत काय फरक पडतो उशिरा गेल्याने, ही वृत्ती सोडली पाहिजे.

2) नोकरी असो वा ऑफिसला जाण्याचा मार्ग हा तर नेहमीचाच असतो, तर किती वेळ लागतो, ट्रॅफिकचा अंदाज यावरून वेळेचे नियोजन करा. जो काही तुमचा अंदाज आहे त्यापेक्षा अर्धा, पाऊण तास जास्त क्यालक्यूलेट करा. वाहनाचे टायर पंक्चर होणे, गाडी बंद पडणे या गोष्टीही होऊ शकतात. वेळेचे नियोजन हे कुठे जायचे आहे हे त्या अंतरावर आहे. अंतर जास्त लांब असेल तर लागणाऱ्या वेळे आधी एक तास आधी निघा. ट्रॅफिकचा भरोसा नसतो.

3)बरेच जण ऑफिसला जाताना पार्किंगमधे वाहनाची टाकी उघडुन बघतात की पेट्रोल, डिझेल किती शिल्लक आहे?? आणि जर ते कमी असेल, तर अशा वेळी टेन्शन येते. ऑफिसला जाण्याआधी ते भरणे तर क्रमप्राप्त ठरते. दुर्दैवाने पेट्रोल पंपावर गर्दी असते. मग जीवाची तगमग सुरू होते. टायर मधे हवाही कमी असते. पर्यायाने लेट.

—– रविवारी वाहन टाकी फुल करून टाका, त्याच बरोबर हवाही भरून घ्या. पेट्रोल पंपावर शक्यतो ऑड टायमिंगला जा, गर्दी कमी असते.

—– वाहनाचे सर्व्हिसिंग नियमित करून घ्या.

4) ऑफिसला जाण्याचा ड्रेस आंघोळीला जाण्याआधीच कपाटातून काढून ठेवा. कधी कधी त्याची इस्त्रीही नीट नसते. बुटाचे पॉलिशही आंघोळी आधी करून ठेवा. कधी कधी धुतलेले पायमोजेही (सॉक्स) वेळेवर सापडत नाहीत आणि आपण स्वतःशीच इरीटेट होतो.

5) ज्या विसरणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे एखादी फाइल, वॉलेट, वाहनाची किल्ली, रुमाल, पेन, चष्मा, गॉगल, सॅक, इत्यादी, हे एकाच ठिकाणी इस्त्रीच्या कपड्या शेजारी ठेवा. विसरायची शक्यता जवळ जवळ म्हणजे 99% नाहीच.

6) काही जणांची बाय डिफॉल्ट वृत्तीच ही लेट जाण्याची असते, ती सोडली पाहिजे. ठरवून वृत्ती बदलली तरच सुधारणा.

7) काहीजण निमंत्रण पत्रिकेत तारीख आणि स्थळ लक्षात ठेवतात पण कितीची वेळ आहे हेच विसरतात किंवा लक्षात ठेवत नाहीत. नंतर मग कार्यक्रम मिस झाल्याची हुरहूर.

8) मित्रांनो, तुम्हीच नुसती वेळ पाळून जमणार नाही, तर त्याचे महत्त्व घरातील इतर मंडळींना पण हवे, त्याचबरोबर त्यांचीही साथ हवी.

या अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे थोडा वेळ का होईना आपले मानसिक संतुलन बिघडते आणि त्याचा परिणाम उशिरा पोहोचण्यावर होतो. बरं या गोष्टी करायला फार मोठे प्लॅनिंग लागते असेही नाही. महत्वाचा मुद्दा आणि मानसिकता अशी असते की, जरी तुम्ही लेट येण्याची परवानगी जरी घेतली असली, तरीही ऑफिसमधे गेल्यावर एक गिल्टी फिल येतं. याउलट जर वेल इन अडव्हान्स जात असाल तर तुम्ही त्या ऑफिस वातावरणाशी किंवा जेथे जाल त्या वातावरणाशी समरस / एडजस्ट झालेले असता. आपलं मन शांत असते. थोडा वेळ आपण इतरांशी नॉर्मल गप्पा मारू शकतो.

जी मंडळी लेट जातात, त्यांची वाहन वेगाने चालवण्याची मानसिकता असते. त्यात सुरक्षितपणा रहात नाही, उशीर झालेला असतो आणि त्या ठिकाणी लवकर पोहोचायच्या नादात अपघात झाल्याची उदाहरणे बघितली आहेत.

आपल्या लेट जाण्याने ऑफिसमधे, कॉम्प्युटर / सर्व्हर /सिस्टीम सुरू होण्यास विलंब होतो.

मित्रांनो विषय खूप मोठा आहे. आपल्यामूळे कोणीतरी वाट बघत असते,अवलंबून असते हे ध्यानात घ्या. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात, उशिरा जाण्यामुळे /येण्यामुळे कित्येक कार्यक्रमांचे पुढील नियोजन ढासळल्याची उदाहरणे कमी नाहीत. नेहमी लेट जाणाऱ्यांमधे काहीतरी सबब सांगायची वृत्ती असते.

मेसेज :- तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग / ठसा म्हणजे वेळ पाळणे. लोकांची तुमच्याकडे बघण्याची नजर कायमस्वरूपी बदलते. वेळ पाळणे ही एक ब्रँड व्ह्याल्यू आहे. Maintaining time is one of the important personality trait.

प्रमोद कुलकर्णी
निवृत्त बँक अधिकारी ( एस बी आय )

FOR YOU