105 वेळा रक्तदान करुन समाजाशी रक्ताचे नाते जोडणारा रक्तदाता: अॅड. सुनिल वाळूंज

Share


गेल्या 28 वर्षांत तब्बल 105 वेळा रक्तदान करुन लोकांशी रक्ताचे नाते निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते अॅड. सुनिल वाळूंज यांनी युवा पिढीपुढे एक आदर्श घालून दिला आहे.
राजगुरुनगर(ता.खेड,जि.पुणे) येथील सुनिल परशुराम वाळूंज यांना महाविद्यालयीन जीवनातच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. वयाच्या 19 व्या वर्षी हुतात्मा राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. त्यानंतर रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून दरवर्षी चारवेळा त्यांनी रक्तदान केले. आपल्या या रक्तदानामुळे अनेक रुग्ण तसेच अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी मदत होते आणि या माध्यमातून समाजाची उतराई होण्याची संधी आहे अशी सुनिल यांची भावना होती.
दरम्यान एम्.कॉम्.चे शिक्षण झाल्यानंतर सुनिल यांनी विमा व्यवसायात प्रवेश केला. उत्कृष्ट संवाद कौशल्य व दांडगा जनसंपर्क असल्यामुळे सुनिल यांनी विमा प्रतिनिधी म्हणून चांगले यश मिळविले. हा व्यवसाय करीत असताना सामाजिक बांधिलकी सोडली नाही. विमा व्यवसाय सुरु असतानाच सुनिल यांनी शिक्षणातही खंड पडू दिला नाही. एल.एल.बी. पुर्ण करुन कायद्याची पदवी तर दोन विषयात एम.बी.ए. करुन व्यवस्थापनशास्रातही पदवी मिळविली.
व्यवसाय व शिक्षण घेत दरवर्षी सुनिल यांनी रक्तदान सुरुच ठेवले. 2 जानेवारी 2018 रोजी खास रक्तदान शिबिर आयोजित करुन आपले शतक पुर्ण केले. राजगुरुनगरवासियांच्या वतीने सुनिल यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याच वर्षी हुतात्मा राजगुरु यांच्या जयंती दिनी आपल्या मित्रांसमवेत हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनची स्थापना करुन रस्त्यावरील निराधार लोकांना आधार केंद्रात सोडण्याचे काम केले. लोकसहभागातून सांगली-कोल्हापूर येथील पुरग्रस्त भागातील लोकांना धान्य,कपडे व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय मजूरांना भोजनवाटप, शिधा वाटपही केले.


आतापर्यंत त्यांनी 25 रक्तदान शिबिरे आयोजित करुन युवकांना प्रेरीत केले आहे. हुतात्मा सोशल फाउंडेशनच्या वतीने आज हुतात्मा राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात त्यांनी 105 वे रक्तदान केले आहे. सुनिल यांच्या या अलौकिक सामाजिक कार्याबद्दल सोशल मिरर च्या वतीने मानाचा मुजरा!