अध्यात्माचं विज्ञान

Share

विषय रंगात आला आहे अध्यात्माचा आणि विज्ञानाचा, अनेको वर्षांपासून हा विषय रंगलेला आहे जितकं बोलावं तितकें नव- नवीन पैलू येत राहतात. एकोणिसाव्या शतकात सुद्धा अशी लोकं होती जी स्वतःला विज्ञानवादी म्हणवून घेत आणि साधा ग्रामो फोन आला म्हणून विज्ञान किती पुढे गेलं याच्या टिमक्या मारत, अन त्या ग्रामो फोन चं कौतुक (आयुष्य) ते किती (?). आपण पाहतोय कि विज्ञानाच्या पाठीवर स्वर होऊन एक एक करत आपण अनेको सुख सुविधा मिळवत पुढे जात आहोत, पण जस जसं आपण पुढे जातोय तसं आपल्याला आधीची गोष्ट तितकीच फिकी वाटत राहते, म्हणजे विज्ञानाची पूर्तता होणं (?) एवढ्या सहज सहजी शक्य नाही. पण एक गोष्ट यातून होत राहील कि शरीराच्या सुख सुविधा गाठता गाठता आपण आंतरिक गोष्टींपासून दूर राहू.
देवाला मानलं नाही तरी हे जग असंच चालू राहील. जर आपण विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल कि;आपली हि धावपळ, आपली हि पळापळ प्रत्येकवेळी निसर्गाला हरवण्याची आहे, आपली प्रगती हि निसर्गाचा हात हातात धरून करण्याची नाही तर निसर्गावर कुरघोडी करण्याची आहे, म्हणजे साधं उदाहरण घायचं झालं तर आपलं त्या नकाट्या छमि सारखं झालंय, छमिला सुंदर दिसायचं आहे मग ती खूप नट्टा-पट्टा करते, मेकअप करते, अगदी प्लास्टिक सर्जरी सुद्धा करते पण, खाताना ती नेहमी चमचमीत खाते, चुकीचा खाते आणि अजिबात व्यायाम करत नाही, आणि मग रडते मी अशी का दिसते, पण तिला जसं हे समजलं पाहिजे कि सुंदर दिसणं तिच्या सवयीनवर अवलंबून आहे किंवा बाह्य सौंदर्य मिळवण्या पेक्षा जर ती स्वतःच्या शरीराची नीट काळजी घेईल तर बाहेरून छान दिसणारच आहे, अगदी त्या प्रमाणे आपण बाह्य सुखाच्या रूपाने विषयांची ठिगळं स्वतःच्या सुखाला लावत असतो ते सुख कधीच पूर्ण होत नाही, इथून शिवलं कि तिथून फाटणार. एक विषय भोगून झाला कि त्याचा वीट येणार आणि दुसऱ्या विषयाची चाहूल लागणार, मन दुसऱ्या ठिकाणी पाळणार. पण आपल्याला हे माहीतच नाही कि सुखाचा खरा कंद खरं मूळ हे आपल्या अंतःकरणात लपलं आहे.
संत यालाच म्हणतात
“राजयाची कांत काय भिख मागे”
म्हणून हे कले कलेने प्रगती करणार विज्ञान जे बाह्य सुख देतं आहे, हे त्या चंद्र सारखं आहे आणि अध्यात्म हे त्या स्वयं प्रकाशमान सूर्या सारखं आहे, चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, तो सारा प्रकाश सूर्याकडून घेतो अगदी त्याप्रमाणे विज्ञानाची प्रगती जरी शरीराला सुख देणारी असेल तरी ते सुख तो पर्यंतच आहे जो पर्यंत त्या शरीरात चेतना आहे “राम” आहे.
मग आपण विज्ञानाची कास धरायची नाही का ? सुख भोगायचं नाही का? तर या साऱ्या प्रश्नाचा उत्तर आहे ‘हो, सारे उपभोग घ्यायचे पण आपल्यात असणाऱ्या “स्वरूपा”च्या जणीवेसह, अधिष्ठान पांडुरंगाचे मांडून केलेला प्रत्येक कर्म देव पूजाच ठरेल’.
राहिला प्रश्न श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा तर जसं भारतात लोकं अंधश्रद्धाळू आहेत तशीच ती बाहेरच्या सो कॉल्ड विकसित देशातही आहेत. म्हणून विज्ञान म्हणजे फक्त टेकनॉलॉजिचा विकास नाही तर तो एक दृष्टिकोन आहे जिथे सारासार विवेक बुद्धीचा कस लागतो. म्हणून अध्यात्मिक असणं म्हणजे विज्ञानाची निवृत्ती नाही तर विज्ञानाची कास धरत स्वतःच्या अंतरंगात केलेला प्रवास आहे. हा प्रवास याच जन्मी पूर्ण होईल असं नाही. पण पुढच्या प्रवासात (जन्मात) जिथे तो प्रवास अर्धवट सुटला होता तिथून तो सुरु होईल.म्हणून न थांबता प्रवास करत राहिलं पाहिजे. अखंड मार्ग कदाचित दिसणार नाही पण पाऊल टाकत राहूया वाटा दाखवण्याचं कार्य तो विधाता करेल.