sm logo new

Aging – वाढत्या वयाला लावू लगाम

social mirror aging
social mirror aging

Share

Latest

आपण सुंदर दिसावे, हे प्रत्येकालाच वाटत असते. “सुंदर मी होणार” म्हणत अनेकजण हे सौंदर्य टिकवण्यासाठी आणि त्याच्या वाढीसाठी धडपडत असतात. सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणे जास्त महत्वाचे आहे, मनाने सुंदर असले पाहिजे हे सर्व सांगणारी, अशी धारणा असणारी मंडळी देखील आपल्या आजूबाजूला आहेत. दोन प्रकारचे मतप्रवाह आपापल्या परीने जागृतीचे काम करतच असले तरी देखील केसांत दिसणारी चांदी, चेहऱ्यावर दिसणारी सुरकुत्यांची जाळी, डोळ्यांभोवती दिसणारी वर्तुळे कुणालाच नकोसे असतात. निसर्गनियमानुसार आपल्या प्रत्येकाला वयाचा हा टप्पा कधी न कधी गाठावा लागतोच. त्या टप्यावर होणारे बदल देखील स्वीकारावे लागतात. ह्या बदलांना आपण एजिंग(Aging) असे म्हणतो.

ह्या एजिंग(aging) ने जर आपल्या आयुष्यात लवकर प्रवेश केला तर मात्र अनेकांचे धाबे दणाणतात. मग त्यासाठी दिसतील ते, कुणी सांगेल ते उपाय करायला सुरुवात होते. आजच्या लेखात आपण उपाय करण्यापेक्षा हे एजिंग काही काळ आपल्याला थोपवून ठेवता आले तर? ह्या साठी काय करता येते त्याविषयी जाणून घेऊ.

एजिंग(Aging) ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही घटक ह्या प्रक्रियेला वेग देतात. आधी आपण त्यांची माहिती घेऊया.
त्या घटकांचे मुळात दोन भाग आहेत.


१. आपण बदल करू शकत नाही असे

  • आनुवंशिक कारणे (genetic) ……..
  • प्रदूषण
  • काही विशिष्ट शारीरिक आजार

२. आपण बदल करू शकतो असे

  • स्वच्छता
  • ताण तणाव
  • कमी पाणी पिणे
  • सतत उन्हात असणे
  • झोपेचा अभाव
  • व्यायामाचा अभाव
  • वय वाढण्यास कारणीभूत असणाऱ्या पदार्थांचे सेवन
  • व्यसनाधीनता

वरील यादी बघून आपल्याला हे लक्षात येते की जसे आनुवंशिकता, आजार आणि प्रदूषण ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीत परंतु त्यांचा परिणाम मात्र थोड्या प्रमाणात नक्कीच कमी करू शकतो. जसे, प्रदूषण आहे तर आपण स्वच्छतेच्या काही सवयी रोजच्या दैनंदिनी मध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो.
ज्या गोष्टी आपण बदलू शकतो किंवा ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यात जर आपण बदल किंवा सुधारणा केली तर निश्चितच आपल्याला वाढत्या वयाचा लगाम घालता येऊ शकतो. त्वचेवर घामासोबत येणारे तेल, त्यावर जमणारी धूळ, त्यावर तयार होणारे मुरूम, मृत त्वचेचे जमा होणारे थर वाढू द्यायचे नसतील तर हे आपण वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छ करायला हवे. त्वचेच्या प्रकारानुसार क्लीन्सिंग, स्क्रब आणि मॉइश्चरायझर(Moisturizer) चा योग्य पद्धतीने वापर करावा. उन्हात जास्त काळ काम केल्याने अथवा फिरल्याने त्वचेचे नुकसान होते.

Photo Damage – सूर्याची अतिनील किरणांमुळे त्वचा काळवंडते आणि लवकर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. त्यासाठी Paraben free आणि SPF 30 आणि त्यापासून पुढची Sun care cream वापरावी.

अपुरी झोप आणि ताणतणाव ह्या मुळे शरीरात stress hormones तयार होतात जे आपल्या त्वचेला आणि आरोग्याला देखील हानिकारक आहेत. त्यामुळे पुरेशी झोप आणि ताणतणावाचे नियोजन करावे.
आपल्या शरीराचा बहुतांश भाग हा पाण्याने व्यापला आहे. त्यामुळे शरीराच्या जैवरासायनिक क्रियांसाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. पाण्याच्या कमतरतमुळे त्वचा कोरडी होऊन सुरकुत्या लवकर पडायला सुरुवात होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रमाण तर वाढवायचे आहे पण त्वचेला देखील पाणी पाजायचे म्हणजे दिवसातून किमान 3 वेळा तरी साध्या पाण्याचे चेहरा धुवावा.
अती तिखट, अती मसालेदार, junk food, preserved food हे वय वाढीसाठी हातभार लावतात. त्या ऐवजी ऋतूनुसार मिळणारी ताजी फळे, भाज्या, कडधान्याचे सेवन वाढवावे.

व्यायाम हा फक्त वजन कमी करण्यासाठी, किंवा फिटनेससाठी उपयोगाचा आहे असे नाही तर, चीरतरुण राहण्यासाठी देखील व्यायामाचा फायदाच होतो. मुळात व्यायामाने रक्तभिसरण प्रक्रिया (Blood circulatory process) वाढते, शरीरात Happy Hormones तयार होतात, muscle tone सुधारतो, शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकायला मदत होते. ताणतणाव कमी होतात. भूक वाढते, त्वचेचे आरोग्य सुधारतो. त्यामुळे खरेतर सौंदर्य वृद्धीसाठी मोफत करता येण्यासारखी ही गोष्ट आरोग्यासाठी देखील फायदेशीरच आहे.

काही महत्वाच्या टिप्स

  1. रोजच्या दैनंदिनीत त्वचेच्या संगोपनासाठी देखील काही वेळ ठेवावा.
  2. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार सौंदर्य प्रसाधने निवडावी. आपल्याला समजत नसेल तर तज्ञांची मदत घ्यावी.
  3. ऋतूनुसार Routine care and Cosmetics ह्यात बदल करावा.
  4. सौंदर्य प्रसाधने ही केमिकल युक्त असतात त्यांचा जेवढा कमी वापर करता येईल तेवढे चांगले आणि वापर करायचा असेलच तर झोपण्यापूर्वी ते चेहऱ्यावरून पुसणे स्वच्छ करणे देखील तितकेच महत्वाचे.
  5. कुणाचे ऐकून, कुणी सांगितले म्हणून बाजारात मिळणाऱ्या गोष्टी त्वचेसाठी सर्रास वापरू नये. तज्ञांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.
  6. ” मी तर बाई काहीच वापरत नाही, मला आवडत नाही”, असे म्हणत काही जण त्वचेची निगा राखण्यासाठी देखील काही प्रयत्न करत नाहीत. सौंदर्य प्रसाधने वापरावी की नाही ही ऐच्छिक बाब असली तरी त्वचेला पोषण देण्यासाठी काही गोष्टी आपल्या रोजच्या व्यवहारात असायलाच हव्या.

वय वाढीची नैसर्गिक प्रक्रिया चालूच राहणार पण काही साध्या सोप्या गोष्टींची जर वेळेवर काळजी घेतली तर काय हरकत आहे, सुंदर दिसायला?

FOR YOU