अजय चांडक : एक कलासक्त व सकारात्मक व्यक्तिमत्त्व

Share

वैविध्यपूर्ण रंग, वेश, संस्कृती व परंपरा यांनी नटलेल्या भारतीय भूमीत जन्म घेतलेले व इथल्या जल, वायु व धरतीवर पोसलेले श्रीमान अजय चांडक यांना आध्यात्माची मनस्वी ओढ आहे आणि ते आपल्या चित्रकलेच्या व्यासंगातून सकारात्मकता व निर्भेळ आनंदाचे वितरण करत असतात. नयनरम्य निसर्गाची भव्यता, ऐश्वर्य आणि विविधता यापासून प्रेरणा घेऊन श्री. अजय चांडक आपल्या अंतरीचे व सभोवतालचे सौंदर्य अचूक टिपतात आणि आपल्या कुंचल्याच्या अदाकारीतून निर्मिलेल्या चित्रकारीतून हळुवार मानवी भाव-भावनांचे, रूपांचे व जीवनाच्या गर्भरेशमी धाग्यांचे सुंदर व तलम वस्त्र विणतात. त्यांची ही अदभूत कला त्यांच्या प्रत्येक चित्रातून नाना प्रकारे दृग्गोचर होत असते.

श्री. अजय चांडक यांनी आपले बालपण निसर्गाशी व संस्कृतीशी संपूर्ण तादात्म्य साधण्यात व्यतीत केले आहे हे त्यांच्या चित्रकलेतील तरल रंगसंगती व आणि गर्भरेशमी पोत यामुळे प्रकर्षाने जाणवते. आपल्या कलाकृती चितारताना त्यांनी तैलरंग, अॅक्रिलिक रंग, पेस्टल कलर्स, कोळसा आणि मिश्रित माध्यमे सराईतपणे व आत्मविश्वासाने हाताळलेली आहेत. त्यांच्या कलाकृतीत समकालीन कलाकृती, भिन्न संस्कृतीतील अमूर्त वा गूढ कलाकृती, व्यक्तिचित्रे आणि निसर्गचित्रे अशा विविध शैलींचा सढळपणे व अत्यंत आत्मविश्वासपूर्वक वापर केल्याचे आढळून येते.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ श्री. अजय चांडक आपल्या रेखाटनांचा व चित्रांचा आनंद मनमुराद लुटत आहेत. त्यांनी आपल्या बहुरंगी व बहुआयामी कलाकृतींची व्यक्तिगत व सामुहिक प्रदर्शने कित्येक कलानिकेतनांमध्ये भरविलेली आहेत. त्यांच्या कलाकृतींचे चाहते व प्रशंसक केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर अशा दूरदेशातही आहेत.

श्री. अजय चांडक यांनी BITS, Pilani ‘बिट्स’ पिलानी येथून इंजिनीयरिंगची पदवी प्राप्त केली असून ते मुंबईच्या जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस येथून एम्. बी. ए. झालेले आहेत. त्यांनी जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय संयुक्त कंपन्यांमध्ये कुशलतापूर्वक काम केलेले आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात माहिती तंत्रज्ञानासारख्या अत्यंत व्यस्त क्षेत्रातील कार्यरत असूनही ते आपल्या आवडत्या चित्रकलेवरील प्रेमासाठी आवर्जून वेळ काढतात आणि कॅनव्हासवरील आपल्या कलात्मक प्रकटीकरणाची मोहकता आणि विविधता वृद्धिंगत करण्यात रममाण होतात. त्यांच्या अंगी असलेल्या या जन्मजात कलागुणामुळे त्यांना आंतरिक आनंद व आपल्या नित्यकर्मातून विरंगुळा लाभतो.

त्याशिवाय आपल्या या चित्रकलेद्वारे ते जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मकता व आशावाद निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहतात.

ते व्यवसायाने जरी इंजिनीयर असले तरी त्यांचा खरा पिंड हा कलाकाराचा आहे. ते अत्यंत सुस्वभावी, मनमिळाऊ व मैत्रीपूर्ण व्यक्ती आहेत. आपल्या कलासाधनेद्वारा निर्भेळ आनंद व सकारात्मकता यांचा प्रसार करुन हे जग जगण्यासाठी एक सुंदर व सुरम्य स्थान बनविण्यावर त्यांचा गाढ विश्वास आहे.

श्री अजय चांडक यांचा दृढ विश्वास आहे की, आपण परमेश्वरांना विविध नावांनी संबोधित करत असलो तरी पूर्ण पुरुषोत्तम भगवान एकच आहेत. अर्थात भगवंतांच्या प्रत्येक नावाची वेगळ्या प्रकारची सुप्त शक्ती असते आणि आपण ज्या भावनेत आणि ज्या श्रद्धेने त्यांना आवाहन करतो किंवा पुकारतो, त्यानुसार ते आपल्याला प्रतिसाद देत असतात.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला त्याचे मित्रगण त्याच्या राजू या नावाने बोलावत असतील, त्याच व्यक्तीला त्याच्या घरातील लोक बंड्या या घरगुती व लाडक्या नावाने हाक मारत असतील आणि त्याच व्यक्तीला त्याच्या कार्यालयातील लोक श्री. देशमुख या औपचारिक नावाने संबोधित असतील.

जरी राजू, बंड्या व श्री. देशमुख ही एकच व्यक्ती असली तरी त्या व्यक्तीचे इतरांशी होत असलेले आदान-प्रदान किंवा भावनिक नाते हे त्या व्यक्तीला कोणत्या नावाने बोलाविले जाते यावर अवलंबून असते.

आपणास ज्ञात आहे की, द्रौपदी भगवान श्रीकृष्णांना माधव, मधुसूदन, केशव इत्यादी या नावांनी बोलावते आणि त्या प्रत्येक नावामागे काहीतरी महत्त्व वा कारणमिमांसा आहे. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची एक सहस्र नावे आहेत आणि त्यांच्या प्रत्येक नावाचा वेगवेगळा अर्थ आणि सुप्त शक्ती आहे.

प्रस्तुत प्रदर्शनात चित्रकार श्री. अजय चांडक यांनी श्रीगणेशांच्या १२ विविध नावांवर आधारित अत्यंत आकर्षक चित्रे प्रस्तुत केलेली आहेत. त्यांनी गणेशांच्या त्या त्या विशिष्ट नावाच्या सुप्त शक्तीचे दृष्य रूप साकार करणारे प्रत्येक चित्र अद्वितीय व समर्पक स्वरूपात चितारलेले आहे. उदाहरणार्थ, एकदंत या चित्रात गणेशांच्या दाताला प्राधान्य देण्यात आले आहे, धूम्रवर्ण गणेशांचे चित्र धूसर रंगच्छटेत रंगविलेले आहे, गणेशांच्या लंबोदर या रूपात त्यांचे विशाल उदर लक्षणीय स्वरूपात दाखविण्यात आले आहे, तर भालचंद्र या गणेशांच्या चित्रात त्यांच्या मस्तकावरील चंद्रकोरीस प्राधान्य देण्यात आले आहे.

चित्रकार श्री अजय चांडक यांनी अत्यंत योजनाबद्ध रीतीने विविध रंगच्छटा, रंगांचे आत्मविश्वासपूर्ण फटके, विविध प्रकारचे पोत वापरून गणेशांची विविध व मनमोहक रूपे चितारली आहेत, ती आपल्या नेत्रांना अपरंपार सुख आणि मनाला आध्यात्मिक परमानंदाची अनुभूती देतात.

मो.न. – +91 93258 01500