All President’s Men……अमेरिकेच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना

Share

सागर भोर


सत्य घटनेवर आधारित सिनेमाच्या मालिकेत आपलं पुन्हा एकदा स्वागत.
सिनेमाची सुरुवात होते अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरात असलेल्या “Watergate complex” या शासकीय इमारतीतून.
१ जून, १९७२ रोजी वॉटरगेट कॉम्प्लेक्सचा दरवाजा बंद होवू नये म्हणून तो बोल्ट टॅपने लावलेला सुरक्षारक्षक फ्रँक विल्स याला लक्षात येते. तो पोलिसांना फोन करून कळवतो आणि पोलिस डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या मुख्यालयात घुसलेल्या पाच लोकांना अटक करतात. दुसर्‍या दिवशी सकाळी, वॉशिंग्टन पोस्टच्या (अमरिकेतील वर्तमानपत्र )मुख्यालयात ही केस नवीन पत्रकार बॉब वुडवर्डला देण्यात येते कारण ही तितकी महत्त्वाची नाही असा अंदाज लावला जात असतो.
वुडवर्डला लक्षात येत की या पाच लोकांमध्ये मियामी येथील चार क्यूबन-अमेरिकन आणि जेम्स डब्ल्यू. मॅक्कार्ड,यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक बगिंग उपकरणे आहेत ज्यांचा उपयोग हा गुप्त माहिती रेकॉर्ड करण्यासाठी केला जातो. या पाच जणांचे प्रतिनिधित्व उच्च दर्जाच्या “कंट्री क्लबचे” वकील करणार असतात. या आरोपींमध्ये मॅककार्ड, नुकतीच केंद्रीय गुप्तहेर एजन्सी (सीआयए) सोडल्याचे न्यायालयात स्वत: कबूल करतो आणि तसेच इतरांचे सुद्धा सीआयएशी संबंध असल्याचे उघडकीस येते. वुडवर्डला लक्षात येते की यांचा संबंध ई. हॉवर्ड हंट, सीआयएचे माजी कर्मचारी तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि व्हाईट हाऊसचे वकील चार्ल्स कोल्सन यांच्याशी आहे.
इकडे वाशिंटन पोस्टकडूंन, कार्ल बर्नस्टेन या दुसर्‍या पोस्ट रिपोर्टरला वॉटरगेट केस वर काम करण्यासाठी वुडवर्डचा सहकारी म्हणून नेमण्यात येते. दोघेही तसे एकमेकांवर विश्वास ठेवणारे नसतात पण ते एकत्र चांगले काम करू लागतात. त्यांना वाटत असते की ही बातमी मुखपृष्ठावर छापली जावी पण, वॉशिंग्टन पोस्टचे कार्यकारी संपादक बेंजामिन ब्रॅडली यांचे मत असते की अजून यावर ठोस असे पुरावे हाती लागले नाहीत आणि ते पोस्टच्या पहिल्या पानावर बातमी छापण्यास नकार देतात, परंतु पुढील तपासणीस ते प्रोत्साहित करतात.
वुडवर्ड एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याशी संपर्क साधतो ज्याला त्याने, “डीप थ्रोट.” हे टोपण नाव दिलेले असते. हे एक गुप्त काम असल्याने त्याला सिग्नल करण्यासाठी वुडवर्ड आपल्या बाल्कनीच्या फ्लॉवरपॉटमध्ये झेंडा ठेवून इशारा करत असतो, ते रात्री एका पार्किंग गॅरेजमध्ये भेटत असत, तो वुडवर्डला इशारा करून सांगत असतो आणि “पैशाचा मागोवा” घेण्याचा सल्ला देत राहतो.
निक्सनच्या पुन्हा अध्यक्षपदी निवडणूक प्रचारासाठी एका समितीची स्थापना केलेली असते ज्याला committee to re-elect president (सीआरपी किंवा क्रीप) संबोधलं जाई.या समिती मध्ये जो भ्रष्टाचार केला जाई त्यात त्या पाचही आरोपींचा सहभाग असल्याचे वूडवर्ड आणि बर्नस्टेनला समजते. यात केनेथ एच. डहलबर्गने दिलेला 25,000 डॉलर्सचा धनादेश समाविष्ट असतो ज्याला, मियामीच्या अधिकाऱ्यांनी मियामी मधील चार आरोपींची चौकशी करताना ओळखलेले असते. तरीही, ब्रॅडली आणि वॉशिंग्टन पोस्टमधील इतरांना वूडवर्डचा तपास आणि त्याच्या डीप थ्रॉट सारख्या स्त्रोतांवरील टिप्स बद्दल शंका असते. कारण राष्ट्राध्यक्ष निक्सन त्यांचे विरोधक आणि डेमोक्रॅटिक उमेदवाराचा, (जॉर्ज मॅकगॉवर) अगदी सहजपणे पराभव करतील असं मानलं जातं आणि म्हणून त्यांना हे सगळं करण्याची गरज काय असा प्रश्न पडतो.

क्रीपचे माजी ट्रेझरी ह्यू डब्ल्यू. स्लोन ज्युनियर, याच्या सहायाने, वुडवर्ड आणि बर्नस्टेन यांना, शेकडो हजारो डॉलरचा “स्लश फंड”, व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ एचआर हॅल्डेमानला, “देशातील दुसरी महत्वाची व्यक्ती” आणि जॉन एन मिशेल, आताचे क्रीपचे प्रमुख यांना दिल्याचे समजते. त्यांना लक्षात येत की वॉटरगेट चोरीच्या एक वर्ष अगोदर, जेव्हा निक्सन हे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत, डेमॉक्रटिक पक्षाचे उमेदवार एडमंड मस्की यांच्या मागे पडतात तेव्हा एडमंड मस्की यांना एका घाणेरड्या (ratfucking) गुन्ह्यामध्ये अडकविण्यासाठी क्रीप पैसा पुरवत असतो.
इकडे वॉशिंग्टन पोस्टमध्ये ब्रॅडली केस पूर्ण करण्याचे सांगतो कारण व्हाइट हाउसने हा सगळा प्रकार खोटा असल्याचे सांगितलेले असते.असे असूनही पोस्टचे संपादक केस चालू ठेवण्याचा निर्णय घेतात.
वुडवर्ड पुन्हा डीप थ्रोटला गुप्तपणे भेटतो आणि त्याला वैतागून स्पष्ट माहिती द्यायला सांगतो. डीप थ्रोट त्याला सांगतो की हेल्डमन हाच वॉटरगेट ब्रेक-इन आणि कव्हर-अपचा मास्टरमाइंड आहे. तो असेही सांगतो की यात फक्त क्रीप सहभागी नसून हा एक मोठा प्लॅन आहे. हा सीआयए आणि एफबीआयसह “संपूर्ण अमेरिकन गुप्तचर संघटना” या “गुप्त ऑपरेशन” लपविण्यासाठी केलेली प्लॅनिंग आहे. तो वुडवर्ड आणि बर्नस्टीनला इशारा देतो की त्यांच्यासह आणि इतरांचे जीवन धोक्यात आहे. जेव्हा हे दोघे ब्रॅडलीला हे सांगतात तेव्हा ब्रॅडली, निक्सनची निवडणूक पुढे असताना सुद्धा त्यांना केसवर न घाबरता काम करायला लावतात.
सिनेमाच्या शेवटी जेव्हा निक्सन दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदाची शपथ घेत असतो तेव्हाच म्हणजे २० जानेवारी, १९७३ रोजी बर्नस्टेन आणि वुडवर्ड संपूर्ण घटना वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित करतात.पुढच्याच वर्षी वॉटरगेटशी संबंधित हेडलाईन्स वाहिन्यांवर झळकू लागतात आणि शेवटी निक्सन यांना राजीनामा द्यावा लागतो आणि ९ ऑगस्ट १९७४ रोजी उपाध्यक्ष जेरल्ड फोर्ड हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतात.
मित्रांनो, अमेरिके सारखा देश हा इतकी प्रगती करू शकतो याचा एक कारण म्हणजे तिथे प्रसार माध्यमांना असलेले स्वतंत्र अधिकार. वॉटरगेट ही अशीच एक घटना आहे ज्यामुळे एका लोकप्रिय राष्ट्राध्यक्षला राजीनामा द्यावा लागला. भ्रष्टाचारी हा प्रत्येक देशात घडतो पण जिथे मीडिया स्वतंत्र आहे तिथेच प्रगती आहे.