कुठल्याही मित्राला विचारा… आज दिवस कसा गेला?
तो सांगेल, काही नाही यार… तेच तेच कंटाळवाणे!
कुणालाही विचारा… आयुष्य कसं चाललंय?
हमखास सांगेल… काय सांगू! मला हा प्रॉब्लेम आहे… पोरगं असे आहे… बायको अशी वागते वगैरे वगैरे.
कोणीही कधीही सकारात्मक बोलतच नाही… सगळेजण रडगाणे गायला तयार असतात.
सगळ्यांना फक्त सिंपथी हवी असते.
प्रत्येकजण फक्त नकारात्मक गोष्टी कुरवाळत बसलेला असतो.
मला नेहमी असा प्रश्न पडतो की माणूस नेहमी फक्त नकारात्मक गोष्टींचा का विचार करतो? काय नाही ह्यापेक्षा काय आहे हे का नाही बघत?
तसं बघायला गेलं तर माणसाकडे भरपूर काही असतं… पण दुर्दैवाने तो आपल्याकडे काय आहे ह्याकडे दुर्लक्ष करतो…
म्हणजे बघा… मुलगा तक्रार करेल की “आई बापाने आमच्यासाठी इस्टेट ठेवली नाही म्हणून मी गरीब राहिलो”
पण तो हा का नाही विचार करत की… त्यांनी माझ्यासाठी फेडायला म्हणून काही कर्ज नाही ठेवलं… काही लायाबीलीटी नाही… तुमच्या वर कुठलं ओझे किंवा फार मोठी जबाबदारी टाकून नाही गेले…
पण असं होत नाही… तो नेहमी काय नाही हाच विचार करणार.
माझं म्हणणं तर नेहमीच राहणार…
काय आहे त्याचा विचार अणि वापर करायचा…
काय नाही ते मिळवायचा प्रयत्न करायचा… पण रडत बसायचं नाही…
फक्त… “काउंट युवर ब्लेसिंग”
आयुष्य म्हटलं की त्यात काही फायदे आहेत अणि काही तोटे आहेत… पण फायदा बघा. नुकसानाकडे लक्ष देऊ नका असं नाही पण त्यावर अति विचार करून रडत बसू नये हे माझं मत आहे.
आयुष्य म्हटलं की काही वेदना, त्रास होणारच. काही दुःखद प्रसंगांना तोंड द्यावे लागणारच. तसेच आनंदाचे, सुखाचे क्षणही येतील.
झालेला त्रास आठवून आत्ता त्रास करून घेण्यापेक्षा कुठल्या गोष्टी केल्या तर आपण आनंदी रहातो हे आठवून त्या गोष्टी केल्या की मन आनंदी, उत्साही ठेवायला मदत मिळते.
ह्याच अनुषंगाने म्हणता येईल ना… की तुमचे मित्र कोण आहेत ते बघा अणि मित्र वाढवत रहा. जे शत्रू आहेत त्यांना कशाला वाढवत बसायचं.
काहीतरी वाईट घटना आठवून उदास बसण्यापेक्षा हसत हसत आयुष्य काढणं चांगले ना!
मला हे येत नाही पेक्षा मला बाकीचं सगळं येतं हा विचार चांगला…
काय आहे आपण प्रॉब्लेम (येत नाही हे) वर लक्ष दिलं तर आहे तो प्रॉब्लेम मोठा वाटायला लागतो अणि नविन नविन प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागतात… पण उलट आपण सोल्यूशन (काय आहे/येत ते) वर लक्ष केंद्रित केलं तर आहे तो प्रॉब्लेम छोटा वाटायला लागतो अणि आपल्याला पुढे जायच्या अनेक वाटा दिसायला लागतात…
रडलेलं तुमच्या लक्षात असेल… पण हसण्याचे प्रसंग तेवढे प्रकर्षानं आठवतात का?
माणूस का नेहमीच दुःखद प्रसंग आठवून कुढत बसतो?
हेच बघा ना! एका वर्षात काही काळ छान, चांगला जातो तर काही काळ वाईट जातो, मनासारखा नाही जात. पण लक्षात राहतो तो हा वाईट काळ. चांगले दिवस विसरूनच जातो.
एका व्यापाऱ्याला पाहिले दहा महिने तुफान प्रॉफिट झाला. नंतरचे चार महिने काही कारणास्तव त्याचा उद्योग चालला नाही. पण त्याच्या लक्षात राहतील ते चार महिनेच!
आयुष्य आनंदाने, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगणे आपल्या हातात आहे… संकटं, वाईट प्रसंग येतातच… आपण ठरवायचं कुणाला किती प्राधान्य द्यायचं ते!
जीने के बहाने लाखो हैं…
विक्रम इंगळे
कंटेंट रायटर आणि ट्रान्स्लेटर