माझ्या शालेय आणि कॉलेज जीवनात जे घडलेलं आहे त्याचे आत्मपरीक्षण करून मी इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षणात म्हणजे विशेषतः शाळेत 10 वी, 12 वी पर्यंत आपण काय होतो. आता शिर्षकाकडे बघून वेगळं नको सांगायला की मी वर्गात कोण होतो??
आमच्या काळात म्हणजे 1966 ते 1976 म्हणजे पहिली ते दहावी शैक्षणिक काळ. पाचवी पासून शाळेत विद्यार्थ्यांला कोणत्या वर्गात बसवायचे त्याची तुकडी ( त्या काळात
क्लासरूमला तुकडी म्हणतं. आता हा शब्द कालबाह्य झाला, किंवा हल्लीच्या मुलांना माहीतही नाही ) कोणती, तर आम्ही पाचवी ते दहावी ‘ ढ ‘ मुलांच्या क्लास मध्ये. त्या काळात हुशार मुलांचा क्लास, तसेच मुलं आणि मुली असा मिक्स क्लास असे प्रकार होते. हुशार मुलांच्या वर्गातील मुलांना जरा भारी वाटायचे. त्यांची
मनोधारणाही अशी असायची की, हे म्हणजे बाकीचे सगळे ‘ ढ ‘ . तसे त्यांच्या नजरेतही दिसायचे. वय जरी लहान असले तरी कोण आपल्याला कसे समजतंय हे कळण्याइतपत तरी नक्कीच डोसकं होतं. अकरावी, बारावीच्या क्लास मध्ये ती मंडळी, त्यांच्या त्यांच्याच मित्रांशी गप्पा गोष्टी करायची. आपल्याला ही मंडळी कमी समजतात हे ही कळायचे.
नंतर स्टेट बँकेत नोकरी लागली. प्रमोशन घेतले. आणि ब्रँच मॅनेजर च्या खुर्चीत बसण्याचा योग आला. तेंव्हा शाळेतील सो कॉल्ड हुशार मंडळी होती, ती लोन घेण्याच्या निमित्ताने जवळ आली.
आता येतो मूळ मुद्द्यावर. समाजात बघतो, तेंव्हा लक्षात आले की, शाळेत मिळालेला
बॅकबेंचर्स हा बहुमान, ब्रँड आणि पुढे आयुष्यात, नोकरीत, व्यवसायात मिळालेले यश याचा तसा संबंध नाही.
सांगण्याचा मुद्दा हा की, कुणी कुणाला कधीही कमी समजू नये. हे ही तितकेच खरे की, आयुष्यात येणारे यश हे कदाचित आपल्याला कमी समजल्याने आले असावे. सकारात्मक वृत्ती असेल तर कमी लेखणे हे पुढील यशस्वी आयुष्याचे गमक आहे.
प्रमोद कुलकर्णी
निवृत्त बँक अधिकारी ( एसबीआय)