भारतातील जंगल -1 “ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह”

Share


ताडोबा जंगलाची सफर करायला मी तीन वेळा गेलो पण तरीसुद्धा हे जंगल मला सतत खुणावत असते. येथील पर्णपाती/ पर्णझडी वन, वाघांची निश्चित साईटींग आणि असंख्य प्राणी असल्याने हे जंगल माझे सर्वात आवडते जंगल होय. महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे जंगल म्हणजे ताडोबा नॅशनल पार्क होय. नागपूरपासून 150 किमी असलेले हे जंगल चंद्रपूर जिल्ह्यात मोडते. या ठिकाणी वाघांची संख्या जास्त असल्याने वाघ सहज बघायला मिळतो या उद्देशाने मी पहिल्यांदा भेट दिली ती माझे बंधू डॉ संजयकुमार भोसले, संदीप भुजबळ, मंत्री आणि राजू ड्रायव्हर यांच्याबरोबर. ताडोबा आणि कोलसा ही दोन तळी आणि ताडोबा नदी या जंगलात असल्याने वनस्पती आणि पशु पक्षी येथे भरपूर प्रमाणात आढळतात. कोलसा, मोहरली गेट आणि बफर झोन असे जंगल सफारी साठी विविध विभाग केले आहेत जेथून जिप्सी सफारी उपलब्ध असते.


जंगलाची सफर करायची असेल तर सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 3 ते 7 दरम्यान करावी कारण सकाळी आणि दुपारी ऊन कमी झाल्यावर प्राण्यांची झुंबड पाणवठ्यावर पाहायला मिळते. ओपन जिप्सी मध्ये फिरण्याची मजा भलतीच भारी असते. जानेवारीचे दिवस होते आणि दुपारची वेळ होती अशावेळेला ताडोबा च्या मोहरली गेट पासून आम्ही जिप्सी सफारी सुरु केली. जंगलातील मुख्य रस्त्यावरून पुढे जिप्सी कच्या रस्त्यावर निघाली तेंव्हा ड्रायव्हरने आम्हाला मातीच्या रस्त्यावरून चालत गेलेल्या वाघाच्या पाऊलखुणा दाखवल्या आणि पुढे वाघ दिसणार याचे त्याने आम्हाला संकेत दिले. झाले नेमकी तसेच अंदाजे 2 किमी गेल्यावर आम्हाला वाघीण दिसली. जिप्सी ड्रायव्हर ने सांगितले हिचे नाव माया आहे. ज्यावेळेला वाघ किंवा वाघीण आजूबाजूला असते त्यावेळेला गाडी उभी करून त्याच्या हालचाली न्याहाळणे आणि फोटोग्राफी करण्याची आपल्याला संधी मिळालेली असते ती दवडू नका. जंगलात केमोफ्लोज असे कपडे आणि आवाज करायचा नाही या दोन बाबी पाळा. आमच्या सुदैवाने आमच्या आजूबाजूला मोकळा परिसर असल्याने वाघिणीला भरपूर जागा मिळाल्याने ती ऐटीत चालली होती आणि काही वेळानेतर आमच्या गाडीच्या बाजूने सुद्धा ती गेली. बाजूने वाघीन जाताना पाहताना तर आमच्या बरोबरील राजू हा टुणकन उडीमारून शीटवर उभा राहायला. जिप्सीतील सगळ्यांनी पहिल्यांदाच वाघीण पाहयली होती त्यामुळे सर्व भलतेच आनंदी झाले होते. मायाच्या अदाने आम्हाला मात्र घायाळ केले होते.
ताडोबामध्ये आम्हाला सांबर डिअर, स्पॉटेड डिअर, चितळ, मगर, रानगवा, जंगल कॅट, हाईना, ग्रे हेडेड फिश ईगल, सर्पनटाईल ईगल, पिकॉक, रॉबिन, कॉपरस्मिथ बार्बेट पाहायला मिळाले. तसेच हिरडा, बेहडा, अर्जुन, टीक, मधुका, निलगिरी, आईन आणि असंख्य प्रजातीच्या वनस्पती पाहायला मिळाल्या. मी ताडोबाला एकदा कुटुंबासमवेत मे महिन्यात गेलो तेव्हा तर दुपारच्या तीनच्या उन्हात आम्ही चौघे स्कारफेस या वाघाच्या एका अदासाठी अर्धातास 48 डिग्रीच्या तापमानात ओपन जिप्सी मध्ये भाजून निघालो होतो पण त्याची छायाचित्रे काढल्याशिवाय आम्ही चौघे तेथून हललो नाही. जंगल आणि जंगलातील प्राण्यांचा वाईल्ड लाईफ लव्हेरिया झाला कि तो प्रेमिका सारखा मनातून काढता येत नाही. म्हणून तर मी फक्त ताडोबाला पुण्यापासून 800 किमी दूर टू अँड फ्रो तीन वेळा केले आहे.


पर्यटकांना माझा एक सल्ला राहील तो म्हणजे फक्त वाघासाठी जंगल बघायला जाऊ नका. जंगलात ट्रेल्स असतात, नागमोड्या वाटा असतात, पाण्याचे साठे, लँड्स्केप आणि सूर्योदय-सूर्यास्त सुद्धा मनाला भोवळ घालतो. जंगलात अनेक सुंदर वनस्पती, पक्षी आणि प्राणी सुद्धा असतात त्यांना सुद्धा बघा आणि त्यांचे खूप फोटो काढा.
ताडोबाला जायचे असल्यास पुणे मुंबईपासून विमानाने, रेल्वेने किंवा रस्ता मार्गे जाऊ शकता. सफारीचा खर्च 500 रुपयापासून ते 3000 रुपया पर्यंत आहे. कोसला आणि मोहरली गेट जवळ रिसॉर्ट आणि शासकीय राहण्याची व्यवस्था अत्यंत वाजवी दरात आहे. तीन ते सहा दिवसाच्या ट्रीप ला 15 ते 21000 खर्च येऊ शकतो.