भारतातील जंगल 3 : मेळघाट, अमरावती.

Share


वनस्पती, पक्षी आणि प्राणी है जैव साखळीतील महत्वाचे घटक आहेत. ही साखळी टिकवून ठेवली तरच पर्यावणाचा समतोल राहील ;अन्यथा तो बिघडून त्याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर होणार आहे. कोअर जंगलाची सफर करायची आणि अशा जंगलाचे संवर्धन करणारा मित्र कोणता तर तो लहानपणापासूनच मित्र उपवनसंवर्धन अधिकारी शतानिक/धनु भागवत होय. 2013 साली धनु मेळघाट मध्ये नुकताच रुजू झाला होता आणि मी माझ्या एका मित्राबरोबर मेळघाटला पोहचलो.
मेळघाटच्या जंगलात तीन दिवस फिरलो. पहाटे सहा ते मध्यरात्रीपर्यंत आम्ही भटकत राहायचो. हे जंगल विविध वनस्पती,पशूंचा आणि पक्ष्यांचा खजिनाच म्हणावा लागेल. 20 प्रकारच्या वनस्पती, 40 प्रकारचे पक्षी आणि 10 प्राणी येथे पाहायला मिळाले. शतानिक बरोबर असल्यामुळे जंगलातील प्रत्येक गोष्टीची बिनचूक माहिती मिळत होती. येथील फॉरेस्ट आउलेटला ‘प्राईड ऑफ मेळघाट’असे संबोधले जाते. येथे 200 पेक्षा जास्त फॉरेस्ट आउलेटच्या नर मादी आहेत असे त्याने सांगितले. आम्ही रात्रीच्या वेळी नाईट जार, बार्न आऊल, ईगल आऊल, स्पॉटेड आउलेट, ब्राऊन फिश आऊल बघीतले. सकाळच्या वेळी सिल्वर बिल, शिकरा, मॅग पाय रॉबिन, कॉमन स्टोन चॅट, इंडियन रोलर, मुनिया, स्मॉल मिनिवेट, पडिफिल्ड पिपेट, वुड श्राइक, अलेक्झांडर पॅराकिट आणि आयोरा सारखे अनेक पक्षी पाहिले. निसर्गाने विविध रंगाची उधळण या पक्षांच्या माध्यमातून केली होती.


एका रात्री जंगलामध्ये गाडीतून जात असताना अचानक अस्वल मध्ये आले. आमच्या गाडीच्या दिव्याचा प्रकाश त्याच्यावर पडल्याने त्याला बघून आमच्या ड्रायव्हरच्या मात्र हृदयाचा ठोका चुकला. घनदाट जंगलात वानर, उदमांजर, रानमांजर, बांबू पिट व्हायपर, सांबर आणि गव्यांचा कळप बघायला मिळाला. वाघाचे दर्शन झाले नाही पण वाण गेस्ट हाऊस जे जंगलाच्या अती संवेदनशील भागात आहे त्याठिकाणी मुक्कामी असताना तेथील वन कर्मचाऱ्यांच्या वाघांच्या रंजक कथा ऐकून मजा आली. बिबट्या व वाघांचे अनुभवाचे अनेक किस्से शतानिकने सांगितल्यामुळे रात्री वाघच स्वप्नात आला.
जंगलातील अकोट, कुलरघाट, खाट्काळी आणि वाण भाग वाईल्ड लाईफसाठी प्रसिद्ध आहे या सर्व भागाची सफर झाली. जम्बुकुआ भागाला भेट दिली जेथे असंख्य फुलपाखरे बघायला मिळाली. पॅरोनेट, यलो फॅन्सी, ब्लु फॅन्सी, कॉमन लाईम, सल्फर इमिग्रण्ट आणि ग्रास यलो फुलपाखरे बघीतली. संथ वाहणाऱ्या नद्या मनाला शांती देऊन गेल्या.
येथील वनस्पतींमध्ये सागवान, अर्जुन, सिपना, गडगा, सालई, केगदा, हलदु आणि ऐन वृक्ष पाहीले. या झाडांमुळे जंगलाला सौंदर्य प्राप्त झाले आहे. तीन दिवस जंगलाची सफर करून पुण्याला निघालो ते जास्तीत जास्त वृक्षलागवड करायची या उद्देशाने. पशु पक्षी अनेक पाहिले पण मित्रांसारखा भला मोठा कॅमेरा माझ्याकडे नव्हता त्यामुळे छोट्या तसेच दूरवरच्या पक्षांचे फोटो काढता आले नाही. जंगलातील पहिलीच सफर असल्याने पुढच्यावेळेला डी एस एल आर कॅमेरा घेऊनच जंगल भटकंती करायचे ठरवले.


मेळघाट हे पुण्यापासून 10 तास अंतरावर वसलेले आहे. पुण्यापासून रोड आणि रेल्वेने जाणे सोयीस्कर ठरते. चार ते पाच दिवसाची टूर ला 15000 ते 20000 खर्च येतो. ऑक्टोबर ते मे महिना कोणतेही जंगल फिरण्यासाठी उत्तम कालावधी होय.