भारतातील जंगल 4 : जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, उत्तराखंड.

Share


बंगालचा वाघ संवर्धन करायचा पहिला प्रकल्प म्हणजे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क होय. 1936 साली व्याघ्र संवर्धनाचा हा प्रकल्प उदयास आला. नैनीताल आणि पौरी गडवाल या दोन जिल्ह्यात 520 चौ किमी वर हे जंगल विस्तारले आहे. 2014 साली या सुंदर जंगलाला भेट देण्याचा योग सुभाष काटकर, बजरंग जाधव यांच्यामुळे आला.
जुलै मध्ये या जंगलात पावसाला सुरुवात होत असल्याने आम्ही जूनच्या शेवटच्या आठवड्यात गेलो पण दुरदैवाने पाऊस एक आठवडा आधीच आल्यामुळे जंगलात नैसर्गीक जलस्त्रोत निर्माण झाले आणि पक्षी प्राणी कोअर जंगलात निघून गेले. सहाजिकच त्याचा परिणाम आमच्या जंगल सफारींवर झाला. पावसामुळे चिखल आणि काही ठिकाणी झाडी पडल्याने फक्त दोन गेटच जीप सफारीसाठी खुली होती. पण पावसातील जंगल सफारीची वेगळीच मजा असते. या जंगलात आम्हाला आंबा, साग, हलदु, पीपल अशा अनेक वनस्पती बघायला मिळाल्या तर हत्ती, सांबर, मस्क डिअर, स्पॉटेड डिअर,
चितळ, रानडुक्कर आणि नीलगाय बघायला मिळाली. या शिवाय येथे 500 पेक्षा जास्त जातीचे पक्षी असून आम्ही 25 प्रकारचे पक्षी पाहिले. पक्षांमध्ये मोर, पीजन, आऊल, मैना, बार्बेट, मिनिवेट, वैगटेल, सनबर्ड सारस, बंटिन्ग, बुलबुल असे अनेक पक्ष्यांची रंगीत दुनिया बघायला मिळाली. माझ्याकडे कॅमेरा नसल्याने पक्ष्याचे फोटो काढता आले नाही मात्र काही प्राण्यांचे फोटो मोबाईल मध्ये काढू शकलो. या जंगलापासून 70 किमीवर नैनीताल हे नयनरम्य थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे.


या जंगलाचा विस्तार खूप मोठा असल्याने या जंगलाला संपूर्ण बघायचे असल्यास किमान 10 दिवस देणे गरजेचे आहे. या जंगलास जाण्यास रोडने गेल्यास दिल्ली पासून सहा तास लागतात. पुणे ते दिल्ली विमान मार्गे किंवा ट्रेन द्वारे प्रवास करू शकता. पाच दिवसाच्या टूरला 20 ते 35000 खर्च येतो.