कोरोनानंतरची बदलती शिक्षणपध्दती

Share


डॉ. शैलेश कासंडे


भारतात शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाचे वारे कोविड १९ च्या आधीपासूनच खरं म्हणजे वाहत होते. येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण व त्या अनुषंगाने होणारे बदल ही त्याची नांदी होती. कोविडमुळे ही परिवर्तनाची प्रक्रिया आमूलाग्र बदलते आहे; अगदी बालवाडी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत. गेले कित्येक महिने अव्याहतपणे चालू असलेले शाळा, महाविद्यालयांमधले ऑनलाईन शिकवणे याने शिक्षण डिजिटल होण्याला गती मिळाली आहे. त्याने विद्यार्थी, शिक्षकच नव्हे तर शाळा महाविद्यालयाच्या शिपाई, कारकून, प्रशासक यांपासून शिक्षण संस्था, विद्यापीठे यांच्याही भूमिकेत सकारात्मक बदल झाला आहे. गेल्या चार महिन्यांत संगणकासमोर बसून शिकवण्याचे शिक्षकांचे कौशल्य विकसित होताना दिसत आहे. सुरुवातीला एकट्याने, समोर प्रत्यक्षात विद्यार्थी नसताना शिकवण्यातील संकोच, चिंता, भीती ही सर्व नाहीशी होऊन शिक्षक ही वय वर्षे ३ पासून ते ३० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने हाताळू लागले आहेत. म्हणजे विद्यार्थीच शिकत आहेत असे नव्हे तर शिक्षक ही नव्याने शिकत आहेत.
खरे शिक्षण हे फक्त माहिती देणे, कौशल्य विकसित करणे एवढेच नाही तर त्याही पलीकडे जाऊन एक चांगला, ज्ञानपिपासू तसेच मूल्याधिष्ठित माणूस घडवणे हे आहे. त्यासाठी हा ऑनलाईन शिक्षणाचा प्लॅटफॉर्म कायमस्वरूपी पुरेसा नाही, काही वेळा योग्यही नाही. कारण यात समवयस्कांबरोबर समायोजन करत शिकण्याचे, शालेय शिक्षणाचे उद्दिष्टच कुठेतरी बाजूला पडते आहे. माणूस घडण्यामध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर शारीरिक व्यायाम, खेळ, कला, तसेच सृजनशील उपक्रम यांचाही मोठा वाट असतो. यासाठी फक्त एका यंत्रासमोर बसून शिकण्याऐवजी माणसांत मिसळून शिकणे हे ही गरजेचे असते. म्हणूनच शाळा महाविद्यालये ही हवीच असणार आहेत. पण जेव्हा हा कोविड १९ चा काळ संपून आपण आणि आपली मुले या प्रत्यक्ष शैक्षणिक वातावरणात जाऊ त्यावेळी ऑनलाईन शिक्षणाचा अंतर्भाव हा मोठ्या प्रमाणावर सर्वत्र दिसणार आहे.
एक रुपेरी किनार जी या तंत्रज्ञानाने या काळात आपल्याला दाखवली आहे ती अशी की कोणत्याही आर्थिक, सामाजिक स्तरावरील पालक, विद्यार्थी ते साधा मोबाईल हाताळायला घाबरणारे पण ज्ञानाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षक, व्यावसायिक या तंत्रज्ञानाचा धीराने आणि विश्वासाने उत्तम वापर करायला शिकले आहेत. नवीन पिढी, जी हे तंत्रज्ञान कुशलतेने वापरते आहे, ती आणि या आधीच्या पिढीत त्यामुळे अत्यंत चांगला संवाद घडतो आहे. शिक्षकही या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध प्रयोग करून, उत्तम, सोप्या, तरी गुणवत्ता पूर्ण अशा शिकवण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या वैविध्यपूर्ण पद्धती निर्माण करत आहेत. त्याद्वारे अनेक शिक्षक एकत्रितपणे स्वतःचे इ -कन्टेन्ट निर्माण करून मुलांपर्यंत पोचत आहेत. यातून सौन्दर्यपूर्ण शिक्षण साधननिर्मितीचेही काम होत आहे, आणि हे व्यापक स्तरावर होते आहे असे निरीक्षणास आले आहे. तसेच समाजातील सर्व घटकांपर्यंत हे डिजिटल शिक्षण पोचवून समाजात डिजिटल दुही निर्माण होणार नाही यासाठी सरकार, विद्यापीठे, महाविद्यालये, उद्योग जगत आणि नवनवीन स्टार्ट अप्स यांनीही पुढाकार घेतला आहे.
मुलांना सतत स्क्रीन समोर बसायला लागल्याने त्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही, त्यांना या स्क्रीन चे व्यसन लागेल अशी चिंता सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. मुले कंटाळली आहेत असे ही दिसते आहे. पण अजून एक निरीक्षण असे की त्यांनी हे सर्व स्वीकारले आहे. यामुळे ही शिक्षकांचा उत्साह वाढतो आहे. तंत्रज्ञान हे दुधारी आहे. आपण कसा वापर करू तसे ते चालणार आहे. शिक्षक, प्रशासक आणि शिक्षण तज्ज्ञ हे या अचानक आलेल्या परिस्थितीवर जिकीरीने लढा देत आहेत. या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेवर लॉकडाऊनचा परिणाम होणार का .. या प्रश्नात न अडकता आता त्याही पुढे जाऊन सृजनशील पद्धतीने मुलांपर्यंत कसे पोचता येईल हाच विचार करत आहेत. यातून पुढील वाटचाल योग्य दिशेने होईल यासाठी आपण शिक्षक, पालक, व्यावसायिक आणि विद्यार्थी सर्वच जण प्रयत्न करूया आणि सकारात्मक मनोभूमिकेतून एकमेकांचे हात धरून भारतीय समाजाला आत्मनिर्भर करूया.

(लेखक सीईओ व ग्रुप डायरेक्टर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे, अध्यक्ष ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट अभ्यासमंडळ, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे कार्यरत आहेत.)
[email protected]