दमा आणि होमिओपॅथी

Share

सध्याचे थंडीचे, ढगाळ वातावरण हे श्वसनाचे अनेक आजार बळावण्यास कारणीभूत ठरतात. दमा हा त्यातीलच एक आजार.
आज आपण दमा ह्या आजारावर होमिओपॅथिक उपचार ह्याची माहिती घेऊयात.
दमा किंवा अस्थमा ह्यात दम लागणे, धाप लागणे, बोलताना, हसतांना किंवा लहान मुलांमध्ये पळताना कोरडा खोकला येणे ही प्राथमिक लक्षणे दिसतात. श्वास नलिकेचे स्नायू आकुंचन पावतात, आतील आवरण जाड होते, आणि आतील स्त्राव कोरडा आणि घट्ट होतो. त्याच बरोबर श्वासनलिका आकुंचन पावते, अरुंद होते आणि त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा येतो. अरुंद श्वास मालिकेतून हवा आत बाहेर जाताना सुई सुई असा आवाज आवाज येतो. श्वास घेताना कष्ट पडतात. सर्व सामान्यपणे ह्याचे मूळ कारण म्हणजे वातावरण किंवा अन्न घटकातील काही गोष्टींची ॲलर्जी असणे. उदा. धूळ, बुरशी, परागकण, कीटक, घरातील पाळीव प्राण्यांच्या अंगावरील केस, वाढते प्रदूषण, ढगाळ वातावरण, कोरडी आणि थंड हवा. गिरणी कामगार, धुळीत काम करणारे शेतकरी, किंवा प्रदूषण असलेल्या ठिकाणी काम करणारे, दमट वातावरणात राहणाऱ्या लोकांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त दिसते. ह्या सर्वांबरोबर आनुवंशिकता हे देखील महत्वाचे कारण आहे. प्रचलित औषध प्रणाली मध्ये हे आकुंचन पावणारे स्नायू हे शिथिल करण्यासाठी औषधे दिली जातात. त्याच बरोबर ॲलर्जी वर मात करण्यासाठी औषध दिले जाते. परंतु होमिओपॅथिक औषध प्रणाली मध्ये उपाययोजना करताना आजाराची मूळ लक्षणे व त्याच बरोबरीने इतर बाबींचा देखील बारकाईने विचार केला जातो. जसे दम्याचा अचानक त्रास सुरू होण्यापूर्वी काही विशिष्ट पदार्थ खाण्यात आला का? काही भावनिक, मानसिक ताण आला होता का? कुठल्या विशिष्ट ठिकाणी गेल्यावरच हा त्रास होतो का? काय केल्यावर बरे वाटते? किंवा कुठल्या विशिष्ट वेळेलाच हा त्रास होतो का? ह्या सर्व गोष्टींचा बारीक विचार करून औषधे दिली जातात. मुळात म्हणजे फक्त श्वास नलिकेचे स्नायू शिथिल करणे हा तात्पुरता पर्याय होवू शकतो. परंतु श्वास नलिका आकुंचन पावण्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या गोष्टींवर मुळापासून उपचार करण्यासाठी होमिओपॅथिक औषधे अत्यंत उपयोगी पडतात. ब्रायोनिया, बेलाडोना, सिना, लाकेसिस, मर्क सोल, हेपार सल्फ, पल्सेटीला, नक्स व्होमिका, सिलीसिया, स्त्रमोनियम, सल्फर ह्या सारखी अनेक औषधे अत्यंत गुणकारी आहेत. होमिओपॅथिक औषधांनी ज्या घटक पदार्थांची ॲलर्जी आहे कालांतराने त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत जाते. वर्ज असणारे पदार्थांचे रुग्ण सेवन करू शकतो. तसेच वातावरणातील बदलाला सामोरे जाण्यासाठी शरीर तयार होते. लहान मुलांमध्ये पळणे, धावणे खेळणे ह्यावर आलेल्या मर्यादा कमी होत जातात आणि त्यांचे बालपण ते आनंदाने जगू शकतात. दम्याच्या रुग्णांसाठी होमिओपॅथी ही खरोखर संजीवनी ठरते.

डॉ. सौ. नीलम गायकवाड.
एम.डी. ( होमिओपॅथी)
एम. एस. ( कौंसेलिंग )