sm logo new

प्रिय आबा…

social mirror fathers day
social mirror fathers day

Share

Latest

प्रिय आबा,

आज सकाळी उठल्यावर तुमच्या नातवाने मला फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या. तसा तर तो आता २१ वर्षांचा झाला पण त्याच्यातला नादानपणा अजून तसाच आहे. फादर्स डे वरुन मला आज पुन्हा तुमची आठवण झाली!

मला नाय हो आठवत कधी तुम्हाला फादर्स डे चं विश केलेलं, खरंतर असाही काही दिवस या जगात असतो हे ह्या आधी माहितीही नव्हतं मला. आपल्यावेळी कुठं होत हे असलं काय? ह्या परंपरा आता आल्या बाजारात. पण आबा, आज मला प्रश्न असा पडलाय, whats app वर fathers day चा status ठेवणाऱ्या या पिढीला नक्की बाप कळला असेल का? आम्ही तर तुमच्या समोर उभं रहायला पण घाबरायचो, त्यात हे असलं विशबिश् करणं लय लांब राहीलं. दिवसभर शेतात नांगर हाकून घरी आल्यावर आम्ही गपचूप आवाज न करता पुस्तक उघडून बसायचो. तुमच्या भीतीनं पुस्तकाच्या पानाचा आवाज करण्याची सुद्धा आमची हिम्मत होत नव्हती. हे आजकालच्या पोरांसारखं रोज सकाळी गाणी लावून नाचणं लय लांब राह्यलं. तुम्ही सांगितलेलं काम नाही ऐकल्यावर तुम्ही आम्हाला बेदम मारायचात, आम्ही कधी तुमच्या शब्दाबाहेर नव्हतो. त्यात उलट बोलणं हा विचार मनामध्ये येणं खूप दुर्मिळच, पण ही आजकालची पिढी MY LIFE, MY RULE म्हणून मोकळी होते? एवढा बदल कधी झाला? खरंच माझ्या लक्षात नाही आलं आबा.
असो, तुमच्याकडून आयुष्याचे बरेच धडे शिकायला मिळाले, शेतात काबाड कष्ट करून तुम्ही आम्हाला वाढवलंत, लहानाचं मोठं केलत, मला आजही आठवत मला नोकरी लागली तेव्हा किती खुश होता तुम्ही! पण माझ्यातला अहम् जागा होऊ नये म्हणून- “जास्त खुश होण्याची गरज नाही, नोकरीच लागलीये” असं म्हणून तुम्ही मला गप केलत. व्यक्त न होता प्रेम करणं काय असत? हे तुम्ही शिकवलंत….

पण खंत एवढीच आहे, आबा तुम्ही जवळ होतात ना तोवर जाणवलं नाही, पण आता सगळं काही उमजायला लागलंय. बाप होणं काय असत हे कळायला लागलंय. तुमचा फोटो पाहिला की इंद्रजित भालेरावांच्या कवितेतला बाप आठवतो. अंगावरती चिंध्या घेऊन मिरची भाकर खाणारा माझा बाप ही तसाच होता.
आबा खरं सांगू – तुम्ही होता, तोवर पंढरीला जायची कधी गरजच नाही भासली, कारण विठ्ठल तर आपल्या शेतात राबत होता ना….

FOR YOU