देश 15 : बँकॉक पटाया

Share


बँकॉक ही थायलंड देशाची राजधानी असून या ठिकाणी जगातील प्रत्येक देशातील पर्यटक एकदा तरी हजेरी लावल्याशिवाय राहत नाही. बँकॉक पटाया विनाकारण बदनाम केले ते तेथील मसाज पार्लरमुळे आणि बँकॉकला नावे ठेवणाऱ्या बहुतांशी आशियन देशात मसाज पार्लर हे आता कॉमन झाले आहे. असो अशा बदनाम केलेल्या देशाची उत्सुकतेपोटी सफर करण्याचा योग मित्र सुदीप बर्वे, अभिजीत दातार यांच्यामुळे आला.


माझा बँकॉकचा अनुभव हा वेगळाच आहे. बँकॉक चे स्ट्रीट लाईफ बरोबर ग्रँड पॅलेस, वाट फो, टेम्पल ऑफ द गोल्डन बुद्धा, नॅशनल म्यूझीयम आणि वांग ना पॅलेस ही ठिकाणे छान आहेत. दोन दिवस बँकॉक शहर बघायला पुरेसे ठरतात. बँकॉक पासून 3 तासावर पटाया शहर आहे याठिकाणी सुद्धा अनेक पर्यटन स्थळे आहेत शिवाय पटाया बीच तर बघण्यासारखा आहे. बँकॉक पटाया रोडवर टायगर पार्क हे ठिकाण बघण्यासारखे होते. येथील सुमारे 40 कॅप्टिव्ह टायगर एका ठिकाणी बघण्याची मजा वेगळीच होती. एवढ्या मोठ्या संख्येने मी कधीच टायगर पाहीले नव्हते. त्यात वाघाच्या छोट्या बछड्याना आपल्या हाताने बाटलीतून दूध पाजणे ही संकल्पना मला भलतीच आवडली. येथे क्रोकोडाईल पार्क सुद्धा पाहिले तेथे किमान 100 मगरी एक भल्या मोठ्या तळ्यात असतील. या पार्क मधील क्रोकोडाईल आणि डॉल्फिन शो बघण्यासारखा होता.
पटायाला नाईट लाईफ, मसाज पार्लर बरोबर अनेक पर्यटन स्थळे सुद्धा आहेत हे लोक विसरूनच जातात. मला पटायाचे सर्वात आवडलेले पर्यटन स्थळ म्हणजे संपूर्ण लाकडापासून बनवलेला अजस्त्र असे सॅकच्युरी ऑफ ट्रुथ हे मोनुमेंट होय. प्राचीन थाई संस्कृतीचे देखणे रूप हे मोनुमेंट होय. लाकडाचा सुयोग्य वापर, योग्य प्रकारचे कार्वींग आणि 500 वर्षापेक्षा जास्त जुनी पण तितकीच सुबक आणि अन टच अशी कलाकुसर बघायची असेल तर किमान तीन तास तरी वेळ काढला पाहिजे. तसेच येथिल फ्लोटिंग मार्केट मस्तच आहे. विक्रेते पाण्यावर बोटीच्या साह्याने मार्केट उभारतात आणि अशा ठिकाणी बोटीच्या साह्याने पर्यटक जाऊन वस्तू खरेदी करू शकतात. एक दिवसाची कोरल आयलंड टूर, मिनी सियाम, रामायणा वॉटर पार्क अशी विविध ठिकाणे सुद्धा बघू शकता. पटाया नाईट लाईफ छानच आहे आणि तिथे गेल्यावर मसाज घेऊनच या कारण परत भारतात आल्यावर मित्रांनी नावे ठेवायला नको कि ‘काय लेका पटायात गेलास आणि मसाज नाही घेतलास”.
बँकॉक ला जायचे असेल तर मुंबई, दिल्ली चेन्नई वरून विमानसेवा आहे . पाच दिवसाची टूर ही योग्य आहे. यासाठी खर्च 40000 ते 60000 येतो. ऑक्टोबर ते मार्च या काळात गेल्यास वातावरण चांगले राहते. एकदा जाऊनच या पटायला.