देश 16 : अबुधाबी

Share


अबुधाबी ही युनायटेड अरब इमिरेट्स ची राजधानी असून पर्शियन गल्फ वर वसलेली आहे. येथील स्कायलाईन टॉवर्स आणि ऑइल इंडस्ट्री पाह्यल्यावर व्यापार चांगलाच जोरात असल्याचे दिसून येते. दुबईजवळ रस्ते मार्गाने तीन तास अंतरावर असल्याने या शहराची टूर करायची माझ्याबरोबरचे मित्र ऍड सुयोग वाघ, अमर दांगट आणि विनय मोरे यांनी जायचे ठरवले.
दुबई बरोबर दोन दिवसाची अबू धाबी या देशाची टूर तो बनती है. आम्ही दुबईवरून लक्सरी कार भाड्याने घेतली आणि मस्त हिंदी गाणी ऐकत अबू धाबी शहराकडे निघालो. दोन्ही बाजूला मैलोनमैल पसरलेले वाळवंट आणि त्यातून काढलेला सहा पदरी रस्ता आणि 120 च्या स्पीडला जाताना पोटातला थेंब सुद्धा न हलू देणाऱ्या त्या आलिशान कारचा प्रवास आनंददायी होता.


अबू धाबीला आम्ही पहिली भेट दिली ती तेथील शेख जायद ग्रँड मॉस्कला. संपूर्ण मस्जिद ही पांढऱ्याशुभ्र मारबल मध्ये बांधलेली असल्याने तिच्यावर पडलेल्या उन्हामुळे ती चकाकत होती. मस्जिदीच्या फ्लोर वर अंथरलेले ते मऊसुद नक्षीदार कार्पेट पायाला गुदगुल्या करत होते. तेथील भलीमोठी मौल्यवान धातूपासून बनविलेल्या रंगीबिरंगी झुंबरांवरील नजरच हटत नव्हती.
इतर पर्यटन स्थळे म्हणजे बीच, मरीना सर्कीट, इमिरेट्स पॅलेस, कॉर्निच आणि अबू धाबी शहराला आम्ही धावती भेट दिली.


आम्ही दुपारचे जेवण केल्यावर अबूधाबीच्या जग प्रसिद्ध फेरारी वर्ल्ड ला भेट दिली. फेरारी वर्ल्ड हे इनडोअर अम्युझमेंट पार्क असून ‘यास आयलंडवर’ वर वसलेले आहे. हे जगातील पहिले फेरारी वर्ल्ड थीम पार्क असून आतापर्यंतचे उभारलेले जगातील सर्वात मोठे स्ट्रक्चर आहे. जगातील सर्वात वेगवान रोलर कोस्टर सुद्धा येथेच आहे. येथील फेरारी कारचे संग्रालय छान असून प्रत्येक राईडचा मोह आवरत नाही. आम्हाला राईड घ्यायची नसल्याने आम्ही तेथे फिरून घेतले आणि आमच्या गाडीने दुबईकडे रवाना झालो.
अबुधाबी हा देश जास्तीत जास्त दोन दिवस फिरण्यासारखा असल्यामुळे याच्या बरोबर दुबई अशी संलग्न टूर करावी. पुणे मुंबईपासून शारजा आणि दुबईला थेट फ्लाईट असल्याने तीन तासात पोहचता येते. चार ते सात दिवसाची दुबई-अबुधाबी अशी टूर चांगली राहते. या टूरसाठी संपूर्ण खर्च 50000 ते70000 येतो. झगमगाटी दुनिया, स्कायस्क्रॅपर्स , आलिशान गाड्या पाहायचे असेल तर उच्च्भ्रू लोकांच्या या देशाला नक्की भेट द्या.