sm logo new

Cartoon वारी पडतेय महाग

social mirror cartoon disadvantages
social mirror cartoon disadvantages

Share

Latest

वय वर्षे 3 ते 5 वयोगट आणि बोलण्याची अडचण असलेली गेल्या दहा दिवसातील आजची ही चौथी केस. आमचा मुलगा आमच्याशी बोलत नाही, त्याला काय हवे? काय नको? हे तो आम्हाला सांगू शकत नाही ही आई वडिलांची तक्रार. उपचार करण्यासाठी गरजेची असलेली माहिती जसे भूतकाळ आणि कौटुंबिक पार्श्वभूमी विचारली असता समजले की, त्यांच्या स्वरयंत्राला काही अडचण नाही, त्यांना शब्द उच्चार करता येतोय. पण बोली भाषेतील आणि रोजच्या व्यवहारातील गोष्टी, भावना ही मुले व्यक्त करू शकत नाही. भूक लागली, शी शू आली हे पण काहींना सांगता येत नाही.
कोरोना महामारीच्या काळात ही मुले घरातच होती. भाषा, भावना विकसित होण्याच्या काळात ह्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क आलाच नाही. मग ही मुले ह्या काळात नक्की काय करत होती?

शाळा नाही, समाजात सहभाग नाही, घरात बसून बसून मुले कंटाळली म्हणून, एका जागेवर बसून जेवण पूर्ण करावे म्हणून, घरातील उचापत्या कमी करून शांत रहावे म्हणून आई बाबांनी ह्या मुलांना मोबाईल दिले. मोबाईल मध्ये मुले रमली म्हणून पालकांनी थोडा सुस्कारा सोडला पण नंतर त्यांना मुलांच्या अभ्यासाची काळजी वाटू लागली, मग झाली सुरुवात अभ्यासपूर्ण आणि शिक्षणिक मनोरंजनाची साधने अर्थात काही Youtube Channel किंवा Cartoon शोधून मुलांनी ते बघण्यासाठी आग्रह. मुले रंग, आकार, प्राणी, पक्षी, लिंग भेद, इतर विविध संकल्पना शिकत आहे म्हणून पालक खूप आनंदात होते. आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे मुले इंग्रजी भाषा बोलायला शिकत आहेत. एवढे सगळे छान सुरू असताना मग अडचण नेमकी आली कुठे?

१. अभ्यासाच्या गोष्टी मुले शिकत आहेत म्हणून पालकांनी Screen Time वरील अंकुश शिथिल केला.

२. मातृभाषा शिकत आपल्या रोजच्या जगण्यात वापरली जाणारी बोली भाषा ऐकण्या ऐवजी मुले इतर भाषेतील काही ठराविक आणि मोजके शब्दच सतत बोलत राहिली.

३. डोळ्यांना आणि कानांना आवडणारे Cartoon मुलांच्या मेंदूवर ‘डिजिटल ड्रग’ सारखे काम करू लागले. त्यामुळे भोवतालचा परिसर, शब्द, भाषा ह्यांचा विकास न होता इंग्रजी तीही प्रमाण भाषेतील शब्द मुले खुप चांगल्या प्रकारे बोलू लागली.

४. तो/ ती इंग्रजी इतकी सुंदर बोलतेय हे बघून पालक देखील रोजच्या बोलण्यात Cartoon मधली भाषा मुलांशी बोलायला वापरू लागली.

मग ह्याचा अर्थ मुलांनी Cartoon बघूच नयेत का ? त्यांना काही चांगले शैक्षणिक कार्यक्रम बघू देवू नये का?
असे मुळीच नाही, पण आपण मुलांना काय बघू द्यावे फक्त हा नियम न लावता ते किती वेळ बघू द्यावे किंवा काय खबरदारी घ्यावी हे जरूर लक्षात घ्यावे, मनोरंजनातून शिक्षण काही सकारात्मक गोष्टी हसत खेळत पुस्तक विरहित शिकणे ही गोष्ट सोयीस्कर आणि बऱ्याचदा फायदेशीर असते. त्याने नवीन भाषा शिकणे, कल्पना शक्तींचा विकास होण्यास, थोडे फार बैठक जमवण्यासाठी आणि विनोदी गोष्ट असतील तर मुले खळखळून हसून त्यांचा stress कमी होण्यासाठी मदत होते. ही एक positive बाजू असली तरी आपण दुसऱ्या बाजूचा विचार करणे फार गरजेचे आहे. मुळात screen ही अशी गोष्ट आहे की तिची सवय फार लवकर जडते पण ती सोडवायला फार कठीण. मोठ्या माणसांना देखील ह्याचा अनुभव आहे तर लहान मुलांना देखील हा नियम लागू पडतो.

ढोबळपणे आपण सर्व प्रकारच्या Cartoon किंवा मुलांसाठीच्या Youtube Channel चा आढावा घेतला तर दुष्परिणाम आपल्या लक्षात येतात जसे की, मारझोड, एकमेकांच्या खोड्या, दुसऱ्याला वेदना होतील असे वार, हाणामारी, तोडफोड, अपघात सर्रास दिसतात, ह्याचा परिणाम मुलांच्या वागणुकीत दिसून येतो. काही कार्यक्रमात लहान मुलांचे हावभाव करणारी मोठी माणसे जी किंचाळून बोलतात, विचित्र आवाज काढतात अंगविक्षेप करतात. ज्यात चूक आणि बरोबर ह्यातील फरक मुलांना कळत नाही, दुसरी गोष्ट काही Cartoon मध्ये त्यांनी केलेला पेहराव हा त्यांच्या वयाला साजेसा नसतो. एका जागेवर सतत बसून बसून मुलांना लठ्ठपणा, स्नायू आणि कमकुवत हाडे अश्या समस्या देखील जाणवतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, screen किंवा मोबाईल बघून जी आनंदाची भावना मुलाच्या मनात तयार होते त्यामुळे dopamine नावाचे chemical मुलांच्या मेंदू मध्ये स्त्रावते, आणि त्यामुळे ही आनंदाची भावना वाढत जाते आणि मुलांना ह्या screen आणि मोबाईलचे व्यसन जडते. वैज्ञानिक तज्ञांच्या मते screen, मोबाईल सारख्या वस्तू मुलांसाठी आमली पदार्थांसारखे काम करतात. ज्यामुळे पुढे जावून मुले आक्रमक, अतीचंचल, असंयमी, अस्थिर बनून ह्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक आलेखावर होतो.

iStock

पालकांनी घ्यावयाची खबरदारी

१. Screen time वर मर्यादा.

२. मुले काय आणि किती वेळ बघत आहेत ह्यावर बारीक लक्ष ठेवणे.

३. त्यात भूमिका करणारी माणसे ही खोटी आहेत. खरे आणि खोटे ह्यातील फरक समजावून सांगणे

४. स्वतः मुलांसोबत बसून हे कार्यक्रम बघणे जेणे करून वेळोवेळी त्यातील खटकणाऱ्या गोष्टी, नकारात्मक भावना, शीवराळ भाषा, आक्रमकता ह्यात आपण त्यांना दुरुस्त करून सांगू शकतो.

५. Net Nanny, Norton Family, Kaspersky Safe Kids सारखे ॲप वापरून मुलांना आपण घातक गोष्टींपासून दूर ठेवू शकता आणि नजर पण ठेवू शकता.

६. मुलांच्या आवडी ओळखून इतर छंदाचे क्लास, मैदानी खेळ, सामजिक सहभाग ह्याकडे जास्त लक्ष दिले तर Cartoon इतकेच मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी त्यांचा सर्वांगीण विकासासाठी देखील फायदेशीर ठरतील.

मुलांना शिक्षणासाठी कुटुंब, शाळा आणि समाज ह्या खूप समृद्ध गोष्टी आपल्याजवळ आहेत त्यामुळे screen आणि Cartoon हे नक्कल करून शिकवणी देणाऱ्या गोष्टींपासून आपल्या मुलांना लांबच ठेवू.

पालकत्वाच्या ह्या प्रवासात सर्व पालकांना शुभेच्छा.

कळावे, लोभ असावा.

FOR YOU