दिव्यांगत्वावर मात करीत ‘ ती’ ने निर्माण केले स्वतःचे उद्योगविश्व: सुरश्री रहाणे-बागूल

Share


ज्या वयात खेळायचं, बागडायचं, शाळेत जायचं त्याच वयात पंधरा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही शारिरिक अपंगत्व आल्यानंतरही केवळ इच्छाशक्ती, प्रचंड कष्टाच्या बळावर शैक्षणिकच नव्हे तर उद्योगविश्वातही आपलं स्वतःचं विश्व निर्माण करणारी सुरश्री रहाणे-बागूल! प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ करणा-या अनेक युवकांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण आहे.


सूरश्री रहाणे यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील भगूर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्माने पुनित झालेल्या या गावामध्ये सूरश्रीचे बालपण गेले. जन्म झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच सूरश्रीवर पहिली शस्त्रक्रिया करावी लागली. या शस्रक्रियेनंतर पुढील काळात तिच्यावर पंधरा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. परंतु सर्वात मोठी आणि अवघड शस्रक्रिया झाली ती जेव्हा चौथीत असताना. पायात लोखंडी रॉड व गोलाकार फ्रेम टाकावी लागली आणि डॉक्टरांनी वडीलांना सांगितले की सूरश्री किमान वर्षभर तरी तिच्या पायावर उभी राहू शकणार नाही. सूरश्रीला हे समजताच तिला मोठा धक्का बसला. कारण तिला शाळेत जाता येणार नव्हते, मैत्रिणींसमवेत मजा करता येणार नव्हती. तिला स्वतःचाच प्रचंड राग आला. वयाच्या नवव्या वर्षी तिने निश्चय केला आणि जिद्दीने पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करु लागली. कधी कुटुंबियांच्या मदतीने तर कधी मैत्रिणींच्या मदतीने ती उभे राहण्याचा सराव करु लागली. हे करीत असताना प्रचंड वेदना होत होत्या. कधी जमिनीवर कोसळत होती. परंतु तिने हार मानली नाही. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर सूरश्री तीन महिन्यांतच फक्त पायावर उभी राहिली नाही तर हळूहळू चालू लागली आणि शाळेतही जाऊ लागली.
शाळेतही सूरश्री खुप हुशार होती. सर्व प्रकारच्या सहशालेय कार्यक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेऊन बक्षिसेही पटकावत होती. परंतु पुन्हा दैव आड आलं आणि सूरश्री दहावीला असतानाच तिच्या वडीलांना अर्धांगवायूचा झटका आला. ती खुप खचली. वडीलांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले. सूरश्रीचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले. ती दररोज वडीलांजवळ जाऊन बसू लागली. त्यांची सेवा करु लागली. बेडवर खिळलेले असतानाही तिचे वडील तिला नेहमीच प्रोत्साहित केले. वडीलांनी पुन्हा तिच्यामधील आत्मविश्वास जागृत केला. वडीलांना पुढील उपचारासाठी मोठ्या शहरात हलविल्यानंतर सूरश्रीने आपले लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले. त्यावेळी तिच्या हातात होते फक्त तीन महिने. या तीन महिन्यांत सूरश्रीने रात्रंदिव अभ्यास करुन दहावीच्या परीक्षेत शहरातच पहिला तर दिव्यांगांच्या गटात राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला.


त्यानंतर सूरश्रीने मागे वळून पाहिलेच नाही. शारिरिक व्यंगत्वाचा बागूलबुवा न करता ती जिद्दीने अभ्यास करीत राहिली आणि पुण्यातील प्रतिथयश सीओईपी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तिथेही सूरश्रीने विविध कार्यक्रम, सेमिनार, प्रकल्प सादरीकरणामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. अनेक प्रदर्शनांमध्ये कॉलेजच्या टीमचे नेतृत्व केले. डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम, प्रा.संजय इनामदार आणि डॉ. अनिल सहस्रबुध्दे यासारखे मार्गदर्शक तिला लाभले. २०१३मध्ये तिने कॉलेजचा लीडर ऑफ द ईयर हा पुरस्कार पटकावला. दरम्यान सूरश्रीने आपल्या कौटुंबिक व्यवसाय असलेल्या हातमाग व्यवसायामध्ये लक्ष घातले. याच व्यवसायात तिने आपली आंत्रप्रान्युअरशिप सुरु केली आणि सूरश्री कॉटन या नावाने ऑनलाईन ब्रँड सुरु केला. वयाच्या 19 व्या वर्षी ती एनडीटिव्ही इंडियन रुट्स या प्लॅटफॉर्मवर सर्वात तरुण आंत्रप्रान्युअर होती.


पुढे तिने दिल्ली येथील faculty of management studies(FMS) कॉलेजमधून एमबीए ही पुर्ण केले. पुढे तिच्या टीमसमवेत तीने एक शॉर्टफिल्मही तयार केली. या शॉर्टफिल्मने एक पुरस्कारही पटकावला आहे. याशिवाय सूरश्रीने स्कुबा डायविंगमध्येही प्राविण्य मिळविले आहे. शालेय जीवनापासूनच सूरश्रीने अनेक पुरस्कार व शिष्यवृत्याही मिळविलेल्या आहेत.
FMS सारख्या कॉलेजमधून डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर खरं तर सूरश्रीसाठी नोकरी मिळविणे कठीण नव्हते. परंतु पुन्हा शारिरिक व्यंगत्व आड आले. जिथे जिथे ती नोकरीच्या मुलाखतीसाठी जात होती तिथे तिच्याकडे सहानुभूतीने पाहण्यात येत होते आणि फिल्डवरील काम ती कसे करणार अशी शंका व्यक्त करीत होते. शेवटी एका कंपनीमध्ये जेव्हा तिला सेल्स मॅनेजर म्हणून फिल़्डवर काम करावे लागेल असे सांगण्यात आले. तेव्हा तीने आत्मविश्वासपुर्वक सांगितले की एकदा मला संधी देऊन पहा. आणि त्या कंपनीमध्ये सूरश्रीने असे काही काम केले की कंपनीचा सेल वाढविलाच शिवाय वर्षातील चार महिने तिने ‘सेल्स मॅनेजर ऑफ द मंथ’ हे अवार्डही पटकावले. सध्या ती एचपी इंक कंपनीमध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेश साठी एज्युकेशन व क्रोमबुक विभागात पोर्टफोलिओ हेड म्हणून काम करीत आहे. याशिवाय सूरश्री मोटिवेशनल स्पिकर म्हणूनही काम करीत असून जोश टॉक, टेडेक्स, युनेस्को सारख्या प्लॅटफॉर्मवर होस्ट म्हणून गेली आहे. आयएसबी हैदराबाद सारख्या मोठ्या कॉलेज मध्ये सूरश्रीला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते.
सूरश्रीच्या नवनवीन संशोधनासाठी एचपी कंपनीमध्ये तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जीवनात सतत सर्वोत्तम गोष्टींचा ध्यास हेच तिचे मिशन असून उद्योगक्षेत्रासाठी व समाजासाठी त्याचा उपयोग व्हावा ही तिची इच्छा आहे.
या प्रंचड कष्टानंतर मिळालेल्या यशावर सूरश्री समाधानी नाही. तिला अजूनही बरंच काही मिळवायचं आहे. अजूनही तिचं क्षितीज तिला खुणावतं आहे! ‘सोशल मिरर’ च्या वतीने सूरश्रीच्या या धडपडीला मानाचा मुजरा!