गांडूळखत – प्रक्रिया व नियोजन पद्धती….

Share

बागकाम व शेती करणाऱ्या प्रत्येकास गांडुळखताची महती ठाऊक आहेच.अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर गांडूळ कंपोस्ट म्हणजे गांडुळांची विष्ठा, ज्याला कास्टिंग म्हणतात. ह्या कास्टिंगस मुळे मातीचे जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म सुधारतात. गांडूळाच्या पचनसंस्थे मधील रासायनिक स्राव माती आणि सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यास मदत करतात, त्यामुळे मातीचा कस वाढतो, माती भुसभुशीत होते.
शेतकरी मोठ्या प्रमाणावर गांडूळखत तयार करून त्याचा शेतीत वापर करतात.शेतात, फार्म्स वर आपण मोठ्या प्रमाणात गांडूळखत प्रकल्प नेहमी बघतो, पण असा, आपल्या छोट्या बागेच्या गरजेपुरता घरगुती,सहज सांभाळत येणारा छोटासा प्रकल्प करता येणं शक्य आहे का? तर हो, अगदीच शक्य आहे! बऱ्याचदा हा प्रयत्न आपण करतोही पण काहीतरी फ़सतं मग आपण थांबतो.मी ही चुकत माकत शिकले, त्यात अनेक गांडूळे गमावली, प्रयत्न फसले पण आता हे तंत्र चांगले जमू लागले आहे.
तुम्हां सर्वांबरोबर माझी पद्धत शेअर करत आहे.
1) गांडूळे कुठून मिळवावीत?
व्यावसायिक प्रकल्पांमध्ये / ऑरगॅनिक शेतीमध्ये चार विशिष्ट जातीची गांडूळे वापरतात, जी विकतही मिळतात. गांडुळांची शास्त्रीय माहिती गुगलवर उपलब्ध आहे तेव्हा त्यावर मी लिहिणार नाही, नाहीतर पोस्ट अति लांबलचक होईल.आपल्या छोट्या प्रकल्पासाठी आपण आजूबाजूला नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेली उदा.मातीतली, कुंडीत तयार झालेली , कुंड्यांखाली लपलेली,विकतच्या गांडूळखतातील अंड्यातून मिळालेली अशी गांडूळे वापरू शकतो. सध्या पावसाळ्यात सहजपणे गांडूळे मिळवण्याचा एक सोपा उपाय म्हणजे कार्डबोर्ड चा एक ओला तुकडा जमीनमातीवर ठेऊन देणे. चार पाच दिवसांनी बघितलं तर ह्याच्या खाली बरीच गांडूळे जमा झालेली असतात.
2)प्रकल्पासाठी जागा कशी निवडावी?
जिथे सावली आहे, थेट ऊन पडत नाही, पावसात भिजणार नाही, आजूबाजूने कुठून उष्णता लागणार नाही(उदा. जवळपास जनरेटर / शेगड्या नसतील) अशी जागा निवडावी. भरपूर हवा मिळेल असे कुठलेही बास्केट, भरपूर सच्छिद्र ड्रम,कंटेनर, भाजीवाल्यांकडचे क्रेटस असं काहीही चालू शकेल. विटांचे वाफेही उत्तम. बास्केट असेल तरआतून गोणपाटाचे कापड लावून घ्यावे म्हणजे हवा खेळती राहील पण प्रकाश आत येणार नाही. गांडूळांना जास्त उष्णता, जास्त ओलावा, सूर्यप्रकाश आवडत नाही. कंटेनर थेट जमिनीवर न ठेवता विटांवर ठेवावा म्हणजे खालूनही हवा मिळते.
3)बेडिंग (फोटो बघावे)
वर्मिकंपोस्ट मध्ये बेडिंग (bedding) खूप महत्वाचे असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर bedding म्हणजे गांडूळाची रहाण्याची, विश्रांतीची आणि पुनरोत्पादनाची जागा. तेव्हा त्यांना आवडणाऱ्या गोष्टी इथे असायला हव्यात. तळाशी नारळाच्या शेंड्या/ आंब्याच्या पेटीतले गवत या पैकी एकाचा थर द्यावा. त्यावर कार्डबोर्ड चे तुकडे, पाण्यात भिजवून, पिळून जास्तीचे पाणी काढून पसरवावे. त्यावर एक पाचोळ्याचा थर द्यावा. आता अर्धवट कुजलेला पाचोळा/ अर्धवट झालेले कंपोस्ट/ जुने शेण/ शेणाच्या गोवऱ्या पाण्यात भिजवून, तुकडे करून यापैकी काहीही पसरवावे. यावर आता गांडूळे सोडावी. वरून ओलसर पाला पाचोळ्याचा चांगला थर द्यावा. हाताने दाबू नये. ही झाली सुरुवात. ड्रम झाकण्यासाठी सच्छिद्र झाकण/ गोणपाटाचे कापड वापरावे.आपला छोटा प्रकल्प असल्याने अगदी तीस ते चाळीस गांडुळांनीही सुरवात करता येते. त्यांना वातवरण आवडले तर प्रजनन करून ते आपली संख्या वाढवतातच.
4)मेंटेनन्स
पाहिले चारपाच दिवस ह्यात काहीही घालू नये, गांडूळांना नव्या वातावरणात सेट होऊ द्यावे. नंतर हळूहळू गांडूळांना आवडीचा खाऊ द्यावा. खाऊ देताना वरच्या पाचोळ्याच्या लेयरच्या खाली हाताने पुरावा, टॉप लेअर मध्ये कधीही देऊ नये. किचन मधील भाज्यांचे वेस्ट, फळांच्या साली, अंड्याच्या टरफलांची मिक्सरमध्ये केलेली पूड, अर्धवट कुजलेले कंपोस्ट/कचरा,पालापाचोळा, गार्डन मधील हिरवा कचरा असं सगळं तुम्ही यात टाकू शकता. पण उग्र वास व चवीचे पदार्थ उदा. कांदा, खूप ऍसिडीक पदार्थ उदा. लिंबाची,/ संत्र्याची साले ,धारदार/ अतिकडक पदार्थ उदा. अंड्याची भुगा न केलेली टरफले, उष्ण पदार्थ उदा. ताजे शेण, याशिवाय प्लास्टिक, शिजवलेले अन्न, डेअरी पदार्थ, आणि रसायनयुक्त पदार्थ टाळावेत. नाहीतर गांडूळे मरतात. ड्रम मधील वातवरण दमट हवे पण गच्च ओलावा नको. कोरडे वाटल्यास तीन चार दिवसांनी वरच्या गोणपाटावर पाणी शिंपडावे. गांडूळांना खुश ठेवलं तर त्यांची प्रजा वाढून ते खूप पौष्टिक गांडूळखत देतात पण नाराज झाले तर चक्क स्थलांतर करतात. (ड्रम च्या बाजूने गांडूळे वर चढायला लागली की समजावे काहीतरी बिघडलंय) मिक्सर मधून काढलेली अंड्यांच्या टरफलांची पूड, शेणाच्या गोवऱ्या, पपई- कलिंगड- खरबूज-केळी-बटाटा-दुधी भोपळा-काकडी यांची साले, कार्डबोर्ड चे तुकडे, चहाचा चोथा, पालेभाज्यांचे देठ, भिजलेला पाचोळा, अर्धे झालेले म्हणजे हीट निघून गेलेले कंपोस्ट हा गांडुळांचा अतिशय आवडता खाऊ आहे.हे खत वरखाली अजिबात करायचे नाही. बऱ्याचदा उत्सुकतेपोटी किंवा गांडुळं जिवंत आहेत ना हे बघण्यासाठी वर्मिकंपोस्ट वारंवार हलवलं जातं. पण गांडूळांना डिस्टर्ब केलेलं अजिबात आवडत नाही. जितकं कमी डिस्टर्ब करू तितकी गांडूळे खुश राहतील.
5)तयार केलेले गांडूळखत कसे काढावे?
साधारण अडीच ते तीन महिन्यात दाणेदार, उत्कृष्ट गांडूळखत तयार होते. गांडूळखत हारवेस्ट करण्याच्या खूप पध्दती आहेत. मी काय करते ते सांगते. एक प्लास्टिक च्या कागदावर तयार झालेले खत तीन ते चार ढीग/ वाटे करून सकाळच्या / संध्याकाळच्या उन्हात थोडा वेळ ठेवते. काही वेळातच गांडूळे प्रकाशापासून दूर जाण्यासाठी आपापल्या ढिगाच्या तळाशी जाऊन बसतात. मग हे वरचे खत अलगद काढून घ्यायचे आणि हलक्या हाताने चाळून ठेऊन द्यायचे. ढिगाच्या खालची गांडूळे परत नवीन प्रकल्पात कमला लावायची.
आता पावसाळ्यात गांडूळखत यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच असते. तेव्हा प्रयोग म्हणून एक छोट्या प्रोजेक्टला सुरुवात करून बघायला हरकत नाही.