गुरू शिष्याच्या पहिल्याच शॉर्टफिल्मला आंतरराष्ट्रीय पुरस्कार: धीरज झंवर व प्रणित बोरा

Share


सातारा परिसरातील फॅन थ्रोटेड लिझर्ड प्रजातीवर संशोधन करणा-या गुरुशिष्याच्या जोडीने प्रथमच बनविलेल्या शॉर्टफिल्मला नेचर इन फोकस फिल्म फेस्टिवलमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. धीरज झंवर व प्रणित बोरा अशी या गुरुशिष्यांची नावे आहेत.
सतराव्या शतकात साताऱ्याची ओळख मराठा साम्राज्याची राजधानी अशी होती. त्यानंतरच्या काळात पेन्शनर्सचे गाव अशीही ओळख निर्माण झाली. निसर्गाची कृपा असणाऱ्या साताऱ्याची ओळख कालांतराने आजूबाजूला असणाऱ्या कास पठार, वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा पश्चिम घाट परिसरात वसलेल्या ठिकाणांमुळे एक निसर्गरम्य ठिकाण अशी होऊ लागली . पश्चिम घाट परिसरातील साप, सरडा, पाली अश्या अनेक प्रकारच्या जैवविविधतेवर बऱ्याच लोकांनी संशोधन केले. पण काही सन्माननीय अपवाद वगळता हे संशोधन सामान्य लोकांपर्यंत पोहचू शकले नाही.
अशातच गुरू-शिष्याची एक जोडी म्हणजेच धीरज झंवर आणि प्रणित बोरा व सोबत स्थानिक संशोधक असे सर्व जण एक फिल्म बनवायला घेतात. ज्यामुळे हे सर्व संशोधन सातारकर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व लोकांपर्यंत पोचू शकेल. ज्यामुळे साताऱ्याचे नाव उज्ज्वल होण्याचे ते स्वप्न बाळगतात. फॅन थ्रोटेड लिझर्ड ही चाळकेवाडी परिसरात आढळणारी पालीची एक प्रजाती आहे. त्याच्या पूर्ण जीवनचक्राचा अभ्यास करून या जोडीने त्यावर एक छोटी फिल्म बनवायला घेतली. या मूळ कल्पनेचा उगम प्रणितच्या पुण्यातील आर्किटेक्चर कॉलेजमधे शिकवणारे विशाल सोनिग्रा सर यांनी केला.


हे सर्व एक वर्षापूर्वी सुरू झालं जेव्हा त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण करण्यास या जोडीने प्रारंभ केला. भर तळपत्या उन्हात हे सुमारे १० तास एका जागी निपचित पडून या प्रजातीचे निरीक्षण करायचे. संदेश कदूर नावाच्या नामांकित चित्रपट निर्मात्याकडून यांना प्रेरणा मिळाली, जे भारताचे
नेटजिओ एक्सप्लोरर आहेत. त्यांच्या कार्याकडे पाहून या जोडीने ही प्रेरणा घेतली. या सरड्याचं जगणं समजून घेवून त्याच्या चित्रपटासाठी यांना सुमारे 70 दिवस लागले आणि ते अद्याप यावर आणखी काम करत आहेत. चित्रीकरणाचा सर्वात कठीण भाग म्हणजे चित्रीकरण करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती आणि यात लगेचच कॅमेर्‍यावर जम बसवणे कठीण होते. दुसरे म्हणजे हवामान जवळजवळ 40 डिग्री सेल्सियस इतके गरम होते. अशा वातावरणात या प्रजातीचे वर्तन इतके अनिश्चित आहे की काही मिनिटे विश्रांती घेऊ वाटलं आणि इथं तिथं पहात राहिलं की तिथे शॉट चुकलाच समजायचं. या सरड्यांच्या जीवनचक्रांवर ते सध्या एक वैशिष्ट्यीकृत चित्रपट बनवत आहेत. ज्यात काही मिनिटांची शॉर्ट फिल्म बनवण्यात त्यांना यश आल आहे, ज्यासाठी त्यांना ‘इमर्जिंग टॅलेंट कॅटेगरी’ साठी ‘नेचर इन फोकस फिल्म फेस्टिव्हल २०२०’ चा २५ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आशा आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर साता-याला समांतर मान्यता मिळवून देऊन ही जोडी सामान्य माणसांपर्यंत हे सर्व पोहचवेल.


या संशोधनाबद्दल बोलताना ते सांगतात,”ह्या संशोधना दरम्यान आम्हाला काही पर्यावरणाला हानी पोचेल असे प्लॅस्टिक, जीवांना इजा होईल अश्या ग्लासचे तुकडे, तसेच लागणारे वणवे असे काही प्रॉब्लेम दिसले. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही आम्ही लोकांचे प्रबोधन करण्याचे काम करत आहोत आणि नक्कीच सर्वांना निसर्ग समजून घेण्यासाठी याचा फायदा होईल.”
‘सोशल मिरर’ कडून या वेगळ्या क्षेत्रात नव्याने बहरणाऱ्या जोडीला सलाम!
ही फिल्म बघण्यासाठी तुम्ही “wildeyesfilm” या युट्यूब चॅनेल वर ही फिल्म पाहू शकता.