sm logo new

Periods ट्रॅकिंग ॲप

Share

Latest

धावपळीच्या काळात प्रत्येकाच्या आयुष्यात व्यस्तता आली आहे. तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली ज्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात होताना दिसत आहे. वैद्यकीय क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. आपल्या शरीरात होणाऱ्या बारीक हालचाली देखील आपल्याला डिजिटल दुनियेमध्ये मोजता येतात त्याही स्वतः कोणाचीही मदत न घेता. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने विविध फिटनेस ॲप बनवत आरोग्य संकल्पनेत देखील सुधार घडवून आणला.
अशा ॲपचा फायदा स्त्री आणि पुरुष आणि प्रत्येक वयाच्या व्यक्तीला घेता येत आहे. ह्याचाच एक भाग म्हणजे महिलांसाठी त्यांच्या मासिक पाळीची आठवण करून देत, त्या संबंधी असणाऱ्या इतर प्रश्नांची उत्तरे देणारे ॲप आता लोकप्रिय होत आहेत. ज्याला Period ट्रॅकिंग ॲप असे म्हटले जाते.
कामात फार व्यस्त असणाऱ्या, विसराळू, निष्काळजी महिला ह्या बऱ्याचदा पाळीची तारीख विसरतात. क्लिनिक मध्ये तर आम्हाला असा अनुभव नेहमीच येतो. पाळीची मागची तारीख विचारली तर अनेकदा होऊन गेलेले सणवार यांचा संदर्भ देत सांगितली जाते जसे “राखी पौर्णिमेला मला ५ दिवस होता, चतुर्थी झाल्यावर दुसऱ्या दिवशी पाळी आली होती” असे सांगितले जाते किंवा “झाले असतील दोन आठवडे, येईल बहुतेक पुढच्या १०-१२ दिवसात” म्हणजे सगळं ढोबळ अंदाजे सांगितले जाते. पूर्वी मला वाटायचे की अशिक्षित किंवा स्वतःकडे फार लक्ष न देणाऱ्या महिलांचा हा प्रॉब्लेम आहे. पण नंतर लक्षात यायला लागले की शिकलेल्या, चांगल्या उच्चपदावर काम करणाऱ्या महिला देखील पाळीची तारीख स्पष्ट सांगू शकत नाहीत. कारण कुठलेही असो महिला पाळीची तारीख विसरतात हे नक्की होते. मग अशा सर्व महिलांसाठी हे periods ट्रॅकिंग ॲप खरोखर फायदेशीर आहे.

हे ॲप काम कसे करते?


स्मार्ट फोनवर असे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यात वैयक्तिक माहिती दिल्यानंतर पाळीच्या मागच्या तारखा, पाळीचा कालावधी म्हणजे किती दिवस फ्लो सुरू होता, पाळी येण्याआधी काय त्रास होतो. ह्याची अचूक माहिती आपल्याला एकदा त्यात भरावी लागते. त्यानंतर पुढच्या महिन्याच्या तारखे आधी आपल्याला notification येते.

अजुन काय उपयोग होतो?


त्याचबरोबर गर्भधारणेसाठी योग्य असणारा कालावधी अर्थात ovulation period ह्याची पण माहिती दिली जाते. काही ॲपमध्ये गर्भनिरोधक म्हणून वापरण्याचे विविध पर्याय निवडण्यासाठी देखील मदत होते.
महिलांचे मानसिक आरोग्य, त्याचबरोबर इतर महिलांचे अनुभव, प्रत्येकीच्या पाळीच्या संदर्भात असणारी आकडेमोड एका तक्त्याच्या स्वरूपात आपल्या फोनच्या Homescreen वर एकाच ठिकाणी पाहायला मिळते. फार धावपळीची जीवनशैली असणाऱ्या महिलांसाठी हे ॲप खूप फायदेशीर आहे. Ovulation ची देखील माहिती मिळत असल्याने pregnancy देखील प्लॅन करायला मदत होते.

परंतु ज्या महिलांचे किंवा मुलींचे पाळीचे चक्र अनियमित आहे, त्यांना ह्या ॲपचा विशेष फायदा होत नाही. कारण निसर्गतः पाळीचे चक्र आणि त्याचे गणित अशा महिलांना लागू पडत नाही. त्यामुळे पुढच्या पाळीची अचूक तारीख सांगता येत नाही.
आपणही आपली पाळीची तारीख विसरत असाल तर विश्वासार्ह असणारे जास्तीत जास्त वापरले जाणारे ॲप नक्कीच वापरू शकता….पण हो त्यासाठी ॲप मध्ये माहिती भरताना पाळीची मागची तारीख अचूक लिहायला विसरू नका 😄
धन्यवाद!

FOR YOU