आज मानवाने अनेक क्षेत्रात प्रगती केली. नवनवीन संशोधन केले गेले. जीवन अधिकाधिक सुखकर आणि कष्टविरहीत व्हावे म्हणुन अनेक सुखसोयी निर्माण केल्या गेल्या. पण तरीही संपुर्ण स्वास्थ्य मात्र मनुष्याला लाभले नाही. उलटपक्षी आधुनिक युगात विविध प्रकारचे शारिरीक तसेच मानसिक विकार वाढतच गेले. सुखी माणसाचा सदरा आपल्याला गवसलाच नाही. आपण जिथे जिथे हरलो, अपयशी ठरलो, कमी पडलो, तिथे तिथे निराश होतो. पुन्हा नव्या उमेदीसह त्या निराशेतून बाहेर पडत आपण पुन्हा नव्याने सुरूवात करायला प्रयत्न करतो.
कोरोनात लॉकडाऊन मध्ये आणि त्यानंतर देखील अशी अवस्था आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली. कोरोनाकाळ हा तात्पुरता होता तरीही त्याचे परिणाम आपण अजूनही भोगत आहोत. ह्या काळात शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्य अधिक खालावले.
अनेकांनी परिस्थितीवर मात करत पुन्हा नव्याने सुरुवात केली पण बरीच लोकं अशी आहेत की जे काही कारणांमुळे अजूनही सावरले नाहीत.
त्याचाच एक भाग म्हणजे निराशा, ही निराशा जेंव्हा भयंकर रूपात मनामध्ये कायमचे घर करते, तेव्हा मात्र जगणे कष्टी होते. निराशेच्या गर्तेत सापडून जगण्यातला आनंद, उत्साह आपण पुर्णपणे विसरतो. सदर लेखात आपण depression अर्थात नैराश्य या मानसिक व्याधीबद्दल माहिती करून घेणार आहोत.
नैराश्य ही माणसाच्या आयुष्यातील एक कटू स्थिती आहे आणि स्वभावात दिसून येणाऱ्या विविध लक्षणांचा समूह आहे.
ही लक्षणे कुठली?
या समस्येने ग्रासलेला रूग्ण नेहमी उदास आणि दुःखी असतो. दैनंदिन व्यवहारात आनंद, रूची न वाटणे, एकूणच थकवा वाटणे, एकाग्रता नसणे, स्वतःला दोष देणे, नकारात्मक विचार करणे, विकोपाच्या स्थितीत आत्महत्येचे विचार किंवा प्रयत्न करणे अशा स्वरूपात हे depression वाढत जाते. depression मध्ये रुग्णाचा स्वभाव, विचार जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे नकारात्मक होतो. Depressionने ग्रासलेल्या रुग्णात एकटेपणे राहणे, स्वतःच्या अस्तित्वाला दोष देणे, स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणे, नेहमी कुठलीतरी खंत बाळगून असणे असे दिसून येते.

त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?
अशा रुग्णात भूक नसणे ज्यातून वजन कमी होत जाऊन तब्येत खालावते अथवा भुकेचा अतिरेक ज्यामुळे स्थूलत्व येणे, झोप न लागणे अथवा सारखे झोपणे ही लक्षणे दिसून येतात.
काही रुग्णात तर नैराश्य असूनही त्यांच्या वागण्यातून तसे दिसून येत नाही. याला मास्क depression असे म्हटले जाते. असे रुग्ण आपले नैराश्य मनात लपवून ठेवतात. मात्र मुखवट्याआड नैराश्यांचा प्रवास सुरूच असतो, असे नेहमीचे नैराश्य मनाच्या सीमा ओलांडून शरीरात असंतुलन निर्माण करते आणि यातून निर्मिती होते ती शारीरिक व्याधींची, वरवर दिसणारी डोकदुखी, नेहमी होणाऱ्या वारंवार उद्भवणाऱ्या शारीरिक तक्रारी या मागे अदृश्य स्वरूपात नेहमीचे नैराश्य कारण असू शकते.
आपल्या मानसिकतेचा शरिरात नियंत्रित ठेवणाऱ्या संप्रेरकांवर, हार्मोन्सवर परिणाम होत असतो. अशा मानसिक अस्थैर्यातून निर्माण होणाऱ्या शारिरिक व्याधी केवळ शारीरिक उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे वारंवार उपचार घेऊनही आजार बरा होत नाही. आपले शारीरिक आजार हे असेच मानसिक कारणांतून निर्माण झालेले आहेत का? हे जाणून घेऊन, असे उपचार घेणे गरजेचे आहे ज्यात मन आणि शरीर असा एकत्रित विचार केला जातो. depressionवर उपचार म्हणुन ‘अँटीडिप्रेशन’ औषधे दिली जातात. ह्याच्या जोडीला हाथ धरून येणारे इतर आजार जसे anxiety ह्यावर देखील depression सोबत उपचार करावे लागतात. प्रेमभंग, जवळच्या व्यक्तिचा मृत्यु, व्यवहारातील मोठे नुकसान, नेहमीचे अपयश, आत्मविश्वासाची कमतरता, कौटुंबिक विसंगती अशी अनेक कारणे depression निर्माण करू शकतात. त्यामुळे depressionच्या प्रत्येक रुग्णात depressionचे वेगवेगळे स्वरूप दिसून येते.
काम करण्याची किंवा जगण्याची इच्छा, उमेद हरवलेले रुग्ण नकारात्मक विचारसरणी सोबत जगत असतात.
होमिओपॅथी चिकित्सा शास्त्रात उपचार करताना रुग्णाच्या मानसिक स्थितीचा सखोल विचार केला जातो. रुग्णाचा स्वभाव, त्याची विचार करण्याची पद्धत, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इत्यादी बाबींचा सुक्ष्मपणे विचार करून औषधोपचार केले जातात. होमिओपॅथीक औषधांनी रुग्णांच्या स्वभावात उचित परिवर्तन घडवून आणण्यासाठी मदत होते. जुनाट म्हणजे chronic आणि ॲक्युट depression असणाऱ्या व्यक्तींना मानसोपचार हाच एक सर्वोत्तम पर्याय असतो. उपचारासोबतच समुपदेशन, योग, प्राणायाम इत्यादीची भूमिका महत्त्वाची ठरते.
आपल्या आजूबाजूला तसेच मित्रपरिवार ह्यामध्ये वरील दिलेली लक्षणे जर आढळून येत असतील तर त्वरित त्यांना मदत करा.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कठीण दुःखद प्रसंग येतच राहतात, त्या त्या काळापुरते थोडे निराश प्रत्येकालाच वाटते. पण ही अवस्था जर जास्त काळ टिकून राहत असेल तर आधी मदत स्वतःपासून करायला सुरुवात करुया .
मन प्रसन्न ठेवूया…