sm logo new

आज जागतिक मातृभाषा दिन…

Share

Latest

युनेस्को म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सांस्कृतिक समितीने २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला.
त्याचा मुख्य उद्देश असा की प्रत्येक मुलाने आपले शिक्षण मातृभाषेतून घेतल्यास ते सोपे जाते व त्याला पटकन कळते.
म्हणून लोकांनी शिक्षणात आपापल्या मातृभाषेला जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे त्याकरता हा दिवस.

मला इंग्लिश मीडियम मधली खूप मुलं मुली म्हणायच्या की आम्हाला हिस्टरी जॉग्रफी म्हणजे इतिहास आणि भूगोल खूप अवघड जातं.
आणि माझा नेहमी प्रश्न पडायचा हे दोन एवढे सोपे विषय… इतिहासाचे पुस्तक तर नॉव्हेल म्हणजे एखादी कादंबरी वाचतो किंवा गोष्टीचं पुस्तक असेल तसं असतं याच्यामध्ये…
मग विचार केल्यानंतर लक्षात आलं की… याची उत्तरं डिस्क्रिप्टिवली म्हणजे सविस्तरपणे इंग्रजीमध्ये द्यावी लागतात
आणि मुलांची इंग्रजी वर्ड पॉवर (शब्द संपदा) तेवढी स्ट्रॉंग नाहीये. म्हणून मुलांना इतिहासाची उत्तर लिहायला अवघड जातं. म्हणून कमी पडतात आणि म्हणतात आम्हाला इतिहास विषय अवघड जातो.

म्हणून माझे स्पष्ट मत आहे… इंग्लिश मीडियमच्या शाळांपेक्षा सेमी इंग्लिश असावं…
म्हणजे तुम्ही पहिली पासून मुलांना इंग्लिश इंट्रोड्युस करा आणि सायन्स आणि मॅथ्स हे दोन विषय फक्त इंग्रजीमध्ये ठेवा.
बाकीचे विषय आपापल्या मातृभाषेतच पाहिजेत.

याला आणखीन एक कारण आहे… ते म्हणजे इंग्लिश मीडियम मधनं शिकणाऱ्या मुलांचं मी एक पाहिलेले… त्यांचं धड इंग्लिश चांगलं नाही आणि मराठी पण चांगलं नसतं
खरं म्हणजे मराठी साहित्य इतकं प्रचंड, प्रगल्भ, बुद्धित वाढ करणारं आणि बुद्धीला खाद्य आहे
पण आजकाल एक तर वाचन संस्कृती कमी झाली आहे आणि त्यातून म्हणजे या इंग्लिश मीडियमच्या मुलांना भरभर मराठी वाचता येत नाही… त्याचा अर्थही कळत नाही आणि त्याच्यामुळे ही पुस्तकं त्यांच्या वाचनात काय बघण्यात देखील येत नाहीत

मागे एकदा असंच झालं…
एका मुलामुलींच्या ग्रुपला मी विचारलं पु ल देशपांडे यांच्या बद्दल तुम्ही ऐकलं आहे का?
सगळी पोरं विचार करायला लागली आणि त्यातल्या त्यात एक हुशार मुलगी जी होती ती म्हणली “अरे हा! मागच्या वर्षी आम्हाला त्यांचा एक धडा होता मराठीमध्ये”
इतका अगाध ज्ञान! म्हणजे मराठी मधले सर्व घराघरातून पोचलेले लेखक पु ल देशपांडे यांना जर माहिती नसतील तर मी जीए कुलकर्णी, इरावती कर्वे अशी नावं काढली ना तरीही या मुलांना आपण कुठल्या जगात आहोत आणि आपल्याशी कोण काय बोलतोय असं होईल.

इंग्लिश मीडियम मधली मुलं इंग्लिश मध्ये तरी दिवे लावतात का?
तर अजिबात नाही…
तिथेही सगळा आनंदातच आहे
त्यांना साधं सिडनी शेल्डन, ऑर्थर हेली माहिती नसतं मग त्यांना जर अगथा ख्रिस्ती, पी जी वूडहाऊस वगैरे असेच नाव सांगितले ना तर संपून जातील ती बिचारी!

ही आणि अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळे मला स्ट्रॉंगली वाटतं की गणित आणि शास्त्र हे दोन विषय जर सोडले तर बाकीचे सगळं शिक्षण मातृभाषा व्हावं

गणित आणि शास्त्र हे दोन विषय इंजीनियरिंग आणि मेडिकल या फीडमध्ये लागतात आणि तिथे इंग्रजी शिवाय पर्याय नाही म्हणून या गोष्टी लहानपणापासूनच इंग्रजीमध्ये शिकवाव्यात

पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की इंग्लिश चांगलं येणं हा एक असेट आहे… इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय संवादाची भाषा आहे… त्यामुळे ती आलीच पाहिजे…
दुसरं… तुमचं शिक्षण जर मातृभाषेतून झालं असेल तर तुम्हाला इतर भाषा शिकायला सोप्या जातात.

कमीत कमी दहावीपर्यंत शिक्षण तरी मातृभाषेतनं व्हावं…

ऑन द लाईटर नोट… मातृभाषा का म्हणायची?
तर फक्त आई बोलत असते आणि बापाला बोलायला चान्स नसतो म्हणून ती मातृभाषा…

विक्रम इंगळे
कन्टेन्ट रायटर आणि ट्रान्स्लेटर

FOR YOU