sm logo new

जागतिक महिला दिन माझ्या नजरेतून

Share

Latest

मित्रांनो नमस्कार,

महिला दिनाच्या निमित्ताने समस्त महिलांवर्गास सादर प्रणाम नी शूभेच्छा.

काय आहे मित्रांनो, मी काही साहित्यिक नाही, सो कविता, छान छान असे साहित्यिक लेखन, चारोळ्या असे काही जमत नाही. त्यामूळे जे मनात येते ते लिहून काढणे.

आज माझी आई या जगात नाही, खूप वाईट वाटते. तिने मला जन्म दिला, वाढवलं, चांगले संस्कार केले, सुखात जगत आहे. तिने केलेल्या संस्कारांमुळेच ही पोस्ट लिहीत आहे.

आजची महिला जागृत आहे, सतर्क आहे. स्वतंत्र विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता आहे. कौतुक आहे. अभिमान आणि गर्व वाटतो. स्त्री जेंव्हा यशाच्या शिखरावर जाते तेंव्हां तिच्या मागे तिच्या कुटूंबातील
सदस्यांची साथ असते,पाठिंबा असतो.

महिला दिनाचे औचित्य साधून मनात आलेले विचार व्यक्त करत आहे. सर्वांनी सकारात्मक दृष्टिने या पोस्टकडे पहावे, ही नम्र विनंती. या पोस्टमधे केलेल्या मुद्यांवर विचार करण्याची गरज आहे, नितांत आवश्यकता आहे. जे वास्तव आहे तेच लिहिलेलं आहे. त्यामुळे माझा महिला दिन थोडा वेगळ्या नजरेने. आत्मपरीक्षण करण्याची गरज. आज 75 वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून पण महिलांवरील अत्याचार, छळ हे कमी झाल्याचे दिसत नाही, उलट वाढतच चाललेले आहेत.याचा आलेख उतरता कसा होईल हे बघितले पाहिजे त्यासाठी मानसिकता बदलायला हवी.

स्त्री ही निर्विवाद विचाराने, कृतीने, सामंजस्य राखण्यात, ते ठेवण्यात, संसार करण्यात, दोघांच्या वादातील भांडण सोडवण्यात, नोकरीत, सर्वच पातळ्यांवर पुढे आहे हे अमान्य करून चालणार नाही. समाजातील वैचारिक पातळीचे संतुलन ठेवण्यात महिला अग्रेसर आहेत. प्रसंगानुसार तसेच नात्यांप्रमाने वेगवेगळी रूपं धारण करणारी, ही स्त्रीच आहे, हे नव्याने सांगायला नको. संसारात नवऱ्याच्या कठीण प्रसंगी खंबीरपणे उभी राहणारी ही स्त्रीच असते. घरातील व्यक्ती आजारी पडली तर खचलेल्या मनाला धीर देणारी ही स्त्रीच” असते. *आज मी जो काही आहे त्यात आई,आणि माझी मिसेस यांच्यामुळे आहे. मैत्रिणी पण आहेत,त्यांच्याकडूनही मौलिक सल्ले वेळोवेळी मिळत असतात

जे काही व्यक्त झालो आहे, ते महिलांबद्दल असलेल्या आदराप्रती व्यक्त झालो. मी ही पोस्ट का लिहिली?? त्याचा हेतू काय?? हे लक्षात घ्यावे ही विनंती. समाजात जे आजूबाजूला बघतोय त्याबद्दल राहवत नाही म्हणून हा माझा आतला आवाज आहे. महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत ही कळकळ आहे.

आपण महिलांवर अत्याचार, कौटुंबिक छळ, बलात्कार झाल्याच्या घटना, बातम्या, या टिव्ही, न्यूज चॅनलवर बघत असतो, वर्तमानपत्रांमधून वाचत असतो. काही फोकस मधे आलेल्या घटनांचा खाली उल्लेख करत आहे.

1) डिसेंबर 2012 ला घडलेली निर्भया केस देशभर गाजली. जवळपास 7 ते 8 वर्ष केस चालली. हा इतका कालावधी आपल्याला सहनशीलतेच्या बाहेर आहे,असं वाटत नाही
का ?? महिलांचे कायदे कडक आहेत. जिथे कायदाच महिलांच्या बाजूने कडक आहे तर मग न्याय मिळण्यासाठी, न्यायदानाच्या प्रक्रियेमधे तिच्यावर झालेल्या अत्याचार, बलात्कार झालेल्या खटल्यांच्या निकालांची आपण वर्षानुवर्षे का वाट बघत आहोत ??? ही वस्तुस्थिती आहे, वास्तव आहे.

2) श्रद्धा वालकर प्रकरण, तिचा निर्घृण खून करून, आरोपीने मृतदेहाचे 35 तुकडे फ्रिज मधे ठेवले. मानव जातीला लाज, कलंक लागेल अशी ही घटना आहे. बुद्धी बधीर करणारी ही घटना आहे, डोकं सुन्न होते, कल्पनाच करवत नाही. आमच्याकडे काय आहे मित्रांनो, अशा घटना घडल्या की सोशल मीडियावर संस्कार वर्गाच्या धड्यांची बरसात होते. नुसता मुसळधार पाऊस आणि मग बाळबोध वळण, संस्कार यांची आठवण येते. कोण चूक, कोण बरोबर या चर्चेला उधाण येते. पुढे काय??? नेहमीचं रूटीन या पलीकडे काही नाही.

पिडीत स्त्रीला किंवा मुलीच्या बाबतीत विशेषतः मुलीच्या आईला, महिलेच्या नवऱ्याला किंवा अशा कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काय सोसावे लागत असेल??, किती यातना या पिडीत महिलांना होत असतील?? त्यांची मानसिकता काय असेल?? यावर गांभीर्याने विचार करायला हवा. कोणाची चूक होती किंवा नव्हती याकडे लक्ष न देता, पिडीत महिलेवर, मुलीवर काय प्रसंग आला असेल?? यावर विचार करून आरोपीस शिक्षा होण्याचा कालावधी लवकरात लवकर कमी कसा होईल हे बघितलं पाहिजे. महिला अत्याचारांवरील सर्व खटले / केसेस हे फास्ट ट्रॅक वर चालले पाहिजेत. पीडितांना न्याय मिळाल्याचे एक मानसिक समाधान तरी लाभेल. दुसरं असे की, कायदे महिलांच्या बाजूने आहेत याचा अर्थ महिलांनी कायदा हातात घेऊ नये हे ही तितकेच बघितले पाहिजे.

3) वर्ष 2021, मुंबईच्या साकीनाका भागात, मध्यरात्री एका महिलेवर घडलेला प्रसंग. त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पण एक 34 वर्षीय महिला त्या प्रसंगाला बळी पडली , तिची हत्या केली, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला, याचे वाईट वाटते.

4) आपल्याकडे कसं आहे की, यासंदर्भातील घटना जर राज्यव्यापी किंवा देशव्यापी झाल्या तरच अशा घटना आपल्याला माहीत होतात, गवगवा होतो, पण अशा कितीतरी घटना समाजात रोज घडत असतात, आपल्या परिसरात घडत असतात, त्या फोकस मधे येत नाहीत इतकेच.

5) एखादया स्त्रीस निसर्गानं मूल दिलं नसेल, काही शारीरिक दोष असतील तर वंधत्व येण्याची शक्यता असते. तिची ही अवस्था कायमची असेल असेही नाही. अशा स्त्रीची मानसिक अवस्था खूप नाजूक असते, ती कोणत्या परिस्थितीतून जात असते हे तिलाच माहित, अशा स्त्रीला आजही महिलाच हिणवत आहेत. काय दोष आहे त्या महिलेचा??? काय चूक केली तिने??? समाजातील/कुटुंबातील या महिलाच, आजही त्या स्त्रीला कमी लेखतात हेही वास्तव आहे. जरा आत्मपरीक्षण करूया. मी फेसबुकवर एक वंध्वत्व (infertility) यावर एक लेख लिहिला होता, तेंव्हा एका मैत्रिणीने मला तिच्या जीवनातील कहाणी सांगितली. ते ऐकून मी थक्कच झालो. आजच्या काळात आपला त्यावर विश्वासही बसणार नाही. ती एक सत्य घटना आहे. माझ्या बायकोनेही या वंधत्वामधे 10 वर्षे काढली. माझ्या कुटूंबातील एकानेही माझ्या मिसेसला एका शब्दाने ब्र म्हणलेले नाही की दुखावलेही नाही. परिस्थती समजून घेणे गरजेचे आहे भगिनींनो.

6) घटस्फोटाचे वाढते प्रमाण, ही पण आजच्या काळातील गंभीर समस्या आहे. या मागची कारणमीमांसा काय?? टॅलेंट वाढलंय, एकमेकांच्या एकमेकांबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. त्या पूर्ण नाही झाल्या की घटस्फोट कारण तडजोड मान्य नाही. त्या महिलेचे पुढील आयुष्य काय नी कसे आहे / असते ?? आजच्या महागाईच्या दिवसात तिच्या सरर्व्हायवलचा प्रश्न आहे. यावर विचार करणे गरजेचे आहे. इथे आठवण येते ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची. अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर मी एक स्वतंत्र पोस्ट मागे लिहिली आहे. (10/12/2022)

7) शाळेत, कॉलेज, नोकरीत जाणाऱ्या मुलींवर आई,वडील तसेच कुटूंबातील इतर सदस्यांचे लक्ष असणे हे खूप महत्त्वाचे आहे.

प्रत्येक स्मितहास्य म्हणजे सुखी सदरा नसतो. खूप महिला आहेत की त्यांच्या स्मितहास्यामागे चिंता, संसाराची काळजी, घरातील वृद्धांची सुष्रूषा, सामाजिक बंधने, नोकरीतील अडचणी, वैयक्तीक शारीरिक व्याधी या लपल्या आहेत. हे मी बघितले आहे म्हणून बोलतो आहे.

महिलांनी पुरुषांच्या अन्यायाला बळी पडता कामा नये. अन्याय सहन करण्यापेक्षा प्रसंगी दुर्गेचे रूप घ्यावे लागले तरी चालेल. कारण स्त्रिया मुकपणे अश्रू ढाळत अन्याय सहन करतात. म्हणूनच अन्याय करणाऱ्यांचे धाडस वाढते.

मेसेज :- बरीच वर्षे हा विषय मनात रेंगाळत होता. व्यक्त होणे आवश्यक असतं. मन मोकळं होतं. त्यातून काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणण्याची इच्छा असते. सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. महिलांवर झालेल्या अशा घटनांचा त्यांच्यावर काय मानसिक आघात होत असेल?? यावर विचार करण्याची गरज आहे. महिला अजून सशक्त झाली पाहिजे, तिचे जीवन सुकर झाले पाहिजे. तिच्या समस्यांवर विचारमंथनातून उपाय योजना झाली पाहिजे. या करता हा लेखन प्रपंच. पुनश्च आपणा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

ही पोस्ट माझ्या स्वर्गवासी आईस समर्पित.

प्रमोद कुलकर्णी
निवृत्त बँक अधिकारी ( एस बी आय )

FOR YOU