किडनी स्टोन आणि होमिओपॅथी

Share

सप्रेम नमस्कार,
आजवर ” होमिओपॅथी सर्वांसाठी” ह्या लेखमालेत आपण होमिओपॅथी ह्या औषध प्रणालीच्या विविध अंगांची आणि ह्या शास्त्राचा प्रभाव आणि मर्यादा ह्यांची माहिती घेतली. श्री किशोर भगत सरांनी सुचविल्या प्रमाणे तसेच काही मित्र मंडळी आणि पेशंट ह्यांच्या आग्रहाखातर, आजपासून पुढील भागात आपण काही विशिष्ट आजार आणि त्यावर प्रभावीपणे काम करणारी होमिओपॅथी ह्या बद्दल जाणून घेणार आहोत.
होमिओपॅथिक डॉक्टरांकडे विशेषतः हिवाळ्यात हमखास येणारी तक्रार म्हणजे मुतखडा अर्थात किडनी स्टोन. पाठीतून सुरू होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या वेदना, कधी कंबरेकडून पायाकडे तर कधी पुढच्या बाजूला पोटाकडे, ओटीपोटाकडे जाणाऱ्या वेदना ह्या सहसा स्टोन मुळे होणाऱ्या असतात. किडनी मध्ये साठून राहिलेले स्टोन हे सहसा, कॅल्शियम, ऑक्सलेट आणि फॉस्फेट ह्या ह्या प्रकारचे असतात. बऱ्याचदा हे खडे किडनी च्या एखाद्या भागात स्पुत ( काहीही लक्षणे न दाखविणारे) असतात. परंतु ज्या वेळी ते आपली जागा सोडतात किंवा हलतात त्यावेळी पुढील प्रमाणे कमी अधिक प्रमाणात लक्षणे दिसून येतात. पाठीच्या बाजूने सुरू होवून पोटाकडे येणाऱ्या तीव्र वेदनेची लाट किंवा सतत जाणवत राहणारी हलकी वेदना किंवा रग. त्याचबरोबर लघवी करताना पोटात किंवा लघवीच्या जागेवर दुखत राहते. वारंवार लघवीला येणे, लघवी साफ न होणे, लघवी झाल्यावर जळजळ होणे, गर्द पिवळसर किंवा लालसर लघवी होणे ही लक्षणे देखील दिसून येतात. काही जणांना थंडी ताप येणे, मळमळ किंवा उलट्या देखील होतात. स्टोन होण्याची प्रमुख करणे आपण पाहिली तर लक्षात येते की, सर्वात मोठे कारण म्हणजे शारीरिक पाण्याचा अभाव, तहान कमी असणे किंवा जास्तवेळ घराबाहेर राहत असल्याने पाणी पिण्याचे टाळणे हे मुख्य कारण आहे. आनुवंशिकता, आहारात प्रथिनांचा अतिवापर, मधुमेह, लठ्ठपणा, शरीरात युरिक एसिड, ऑक्सलेट वाढण्यास कारणीभूत असणारे इतर आजार ही सर्व करणे स्टोन तयार होण्यास जबाबदार असतात. होमिओपॅथिक उपचार पद्धतींमध्ये स्थितीला असणारे खडे विरघळवून शरीराबाहेर टाकण्याचे तसेच सतत खडे तयार होण्याची प्रवृती नष्ट करण्यासाठी होमिओपॅथिक औषधे अत्यंत परिणामकारक आहेत.सदर औषधे देताना प्रामुख्याने खालील गोष्टींचा विचार केला जातो. पाहिले म्हणजे खड्याची जागा, म्हणजे खडा कोठे आहे, डावी किंवा उजवी बाजू, किडनी, युरेटर किंवा ब्ल्याडर. खड्याचा आकार किती मोठा आहे ही देखील एक महत्वाची बाब आहे. दुखणे वेगवेगळ्या ठिकाणी पसरत जाण्याची दिशा आणि व्यक्तिगणीक वेगवेगळी लक्षणे ह्यांचा एकत्रित विचार करून प्रत्येकास वेगळे औषध दिले जाते. बरबेरीस, सरसापैरीला, केंथेरीस, नक्स वोमिका, ऑस्सिमम, लयकोपोडीयम, परेरा सारखी औषधे चांगल्या प्रकारे उपयोगी आहेत. रूटीन युरीन आणि सोनोग्राफी सारख्या प्राथमिक तपासण्या हे निदान करण्यासाठी पुरेशा आहेत. कुणाला असे निदान झाल्यास खालील उपाययोजना कराव्यात. घरगुती उपाय डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही महत्वाचे आहे. खडा अडकल्याने ट्रॅक मध्ये कुठे पाणी साठले आहे का? इन्फेक्शन आहे का? खडा असण्यासोबत त्या ठिकाणी अजुन दुसरी काही अडचण आहे का? लघवीची पिशवी पूर्ण रिकामी होत आहे का ह्या गोष्टींची शहानिशा करून त्या दृष्टीने औषधोपचार करण्यास सोपे जाते. “काही होत नाही, सोडा प्या, दोरीच्या उड्या मारा, काढा घ्या” असा सल्ला देणारे खूप जण भेटतात परंतु डॉक्टरी सल्ल्याशिवाय केलेले घरगुती उपाय कधी कधी त्रासदायक होवू शकतात. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी पिणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात योग्य तो बदल करणे, जीवनशैली मध्ये सुधारणा करणे ह्या गोष्टी खडा तयार होण्यास अटकाव करतात. सौम्य स्वरूपात काम करणाऱ्या होमिओपॅथिक गोळ्या आणि मदर टिंचर ह्यांच्या मदतीने ह्या त्रासातून कायमस्वरूपी खात्रीशीर सुटका होवू शकते हे नक्की.

पुढील भागात एका नवीन विषयासह भेटू, तो पर्यंत

कळावे, लोभ असावा…

डॉ. सौ. नीलम गायकवाड.
एम. डी. ( होमिओपॅथी )
एम. एस. ( कौंसेलिंग )