“शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर तो चमत्कार करून दाखवतो”, या वाक्यावरती ज्यांचा ठाम विश्वास होता ते म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री “वसंतराव नाईक” यांची आज जयंती. त्यांचे स्मरण म्हणून महाराष्ट्रात १ जुलैला कृषी दिन साजरा करण्यात येतो.
१९१३ मध्ये जन्मलेले वसंतराव नाईक काँग्रेस पक्षाचे विदर्भातील यवतमाळ जिल्यातील बंजारा समाजाचे प्रणेते होते. प्रगतशील महाराष्ट्राच्या विकास रथाला पुढे नेण्यात वसंतरावांचे महत्वाचे योगदान आहे.
कृषी क्षेत्रातील योगदान…
राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल? महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत कसं स्वयंपूर्ण होईल यावर वसंतराव नाईकांनी विशेष लक्ष दिलं. वसंतराव नाईकांच्या काळात राज्यात कृषी विद्यापीठं आणि कृषीशी संबंधित विविध संस्थांची निर्मिती झाली. राज्यात 1972 साली ज्यावेळी दुष्काळाचं संकट आलं त्यावेळी शेतकऱ्यांना संकरीत बियाणं उपलब्ध करून दिली, जलसंधारणाची कामं वाढवली आणि शेतीला शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला. या नंतर राज्याच्या कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून आले महाराष्ट्रात उद्योगिक क्षेत्र वाढले, सहकारी साखरकारखाने स्थापन केले गेले, दूध उत्पादन संघ व सुत गिरणी उद्योगाला चालना देण्यात आली. आजची सरकारची ‘मनरेगा’ योजना वसंतरावांच्या काळी सुरू झाली आहे. आज महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्राच्या बाबतीत देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखला जातो आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात नाईकांची वाटचाल…
१९५२ मध्ये निवडून आल्यावरती वसंतराव नाईक पहिल्यांदा विधान सभेवर गेले. त्यानंतर मुंबई प्रांतात त्यांची कृषी मंत्री या पदी वर्णी लागली. १९६३ ते १९७५ या कालावधीत ११ वर्षासाठी वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अत्यंत मुरब्बी आणि हुशार राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती.
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ची कहाणी…
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असले ‘वर्षा’ बंगल्याचे नामकरण हे देखील वसंतराव नाईक यांनीच केले आहे. कृषिमंत्री झाल्यानंतर नाईक यांच्या वाट्याला मंत्री म्हणून ‘डग बीगन’ नावाचा बंगला आला. सरकारने दिला तो बंगला त्यांनी स्वीकारला. त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंना टापटिपीनं राहण्याची आवड होती. तसा हा बंगला अगदीच साधा होता. बैठी बांधणी, सगळीकडून मोकळे दरवाजे आणि खासगीपणा नाही.

श्री. नाईक म्हणाले, ‘छान आहे हे घर. याला एक घरंदाजपणा आहे.’ ते खरंच होतं. डग बीगन बंगल्यामध्ये येणाऱ्या अभ्यगताला परकेपणा वाटेल, अशी औपचारिकता नव्हती. त्याला घराचा मोकळेपणा होता. पाऊस हा श्री. नाईक यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. कवी पांडुरंग श्रावण गोरे यांची ‘शेतकऱ्यांचे गाणे’ ही त्यांची अत्यंत आवडीची कविता होती. जेव्हा नाईक कुटुंब ‘डग बीगन’वर राहायला आले तेव्हा श्री.नाईक यांनी ‘डग बीगन’चं नामांतर ‘वर्षा’ असं केलं.
देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे.
महाराष्ट्र राज्यही कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य राज्य समजलं जातं. आपल्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून आजचा शेतकरी झटत आहे. अनेक विपरीत परिस्थितींवर मात करून, संकटांशी दोन हात करत, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी खंबीरपणे लढतो आहे. आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.