मनकर वस्ती पारगाव ते मियामी बीच फ्लोरिडा चा प्रवास : सौरभ मनकर

Share


यशाला वयाचे बंधन नसते त्यास फक्त हवे असते नियोजन, सातत्य आणि अपार कष्ट. मनगटात ताकद असेल तर परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही हे सिद्ध केले आहे मनकर वस्तीमधील गरीब कुटुंबातील फक्त 21 वर्षाच्या सौरभ मनकर या युवकाने. जगातील सर्वोत्त्तम बीच मियामी, फ्लोरिडा येथील नामांकित आझाबू या जापनीज फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये सुशी शेफ म्हणून तो काम करत आहे.


आई अंगणवाडी सेविका आणि वडील अल्पभूधारक शेतकरी ही सौरभची कौटुंबिक पार्शवभूमी होय. पारगाव तर्फे पेठ येथील छोट्याशा मनकर वस्ती मध्ये 1999 मध्ये त्याचा जन्म झाला. आई अंगणवाडी सेविका असल्याने भले तिला तुटपुंजा पगार असला तरी मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊन मोठे करायचे हे लहानपणी तिने स्वतः ठरवले आणि मुलांच्या मनात सुद्धा बिंबवले. वडील अध्यात्मिक पार्श्वभूमीचे आणि शेतकरी ज्यांची सर्व मदार पाऊस, शेती उत्पादन आणि बाजारपेठेवर अवलंबून असल्याने याच्यातील एक जरी गणित चुकले तर शुन्य उत्पन्न, वेळ प्रसंगी कर्जबाजारी ठरलेले. अशा परिस्थितीत सौरभने जि प च्या प्राथमिक शाळेत आणि माध्यमिक शिक्षण गावातच घेतले. बारावीला सायन्सला सुमारे 60 टक्के मार्क्स पडले आणि भारती विद्यापीठात बी एस सी हॉटेल अँड हॉस्पीटलीटी ऍडमिनिस्ट्रेशन या तीन वर्षाच्या कोर्स साठी प्रवेश घेतला. जास्त फी असल्याने त्याला कर्ज तसेच नातेवाईकांकडून उसने पैसे घ्यावे लागले.
नामांकित शेफ बनायचे याच ध्येयाने सौरभ पछाडला होता. एकीकडे आई वडिलांचे आणि मोठा भाऊ रोहनचे काबाडकष्ट त्याला स्वस्त बसून देत नव्हते. दिवस रात्र अभ्यास आणि स्वयंपाकामधील वेगवेगळी कौशल्य तो विकसित करू लागला होता. मराठी माध्यमातून गेलेला सौरभ पहिल्याच वर्षी वर्गात पहिला सुद्धा आला होता. पुढे दोन वर्ष महाविद्यालयीन सर्व स्पर्धा मध्ये तो प्रथमच राहिला. त्याने त्याच काळात काळाची गरज ओळखली आणि सुशी या जापनीज पदार्थांमध्ये प्रावीण्य मिळविले. जून 2019 ला निकाल लागला आणि त्याचवेळेला त्याने ठरवले आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सात समुद्रापार जायचे. पुढील चार महिन्यात आवश्यक असणाऱ्या मानसिक, शारीरिक आणि तांत्रिक सोपस्कर पूर्ण केले आणि त्याची निवड झाली फ्लोरिडा येथील मियामी बीचवरील पंचतारांकित आजावू या हॉटेल मध्ये सूशी शेफ या पदाकरिता .
डिसेंबर 2019 सूशी शेफ म्हणून आजाबू हॉटेल मियामी मध्ये तो रुजू झाला. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वयंपाक पद्धतीने त्याच्या हाताच्या चवीची मियामी बीचवर सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि आजाबूत चांगलीच गर्दी होऊ लागली. कोरोना पँडमीक ने काही महिने हॉटेल व्यवसायांवर परिणाम झाला पण मागील दोन महिन्यापासून येथे गर्दी वाढली आहे असे सौरभने सांगितले. तो म्हणतो येथील ग्राहक हा शेफ ला खूप आदर देतो त्याचे कौतुक करतो. या ठिकाणी मला चांगला पगार आणि सुविधा दिल्या गेल्या आहेत.


ग्रामीण युवकांना तो म्हणतो अशक्यप्राय असे काही नाही तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा त्याला जगातील कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात संधी आहे. हे मात्र लक्षात ठेवा कि तुम्ही त्या क्षेत्रात सर्वोत्तम असले पाहिजे. आपले आई वडील हे आपले दैवत आहे हे प्रथम समजून घ्या. त्यांच्या कष्टातून मिळवलेल्या प्रत्येक पैशाचे मूल्य जपा मग तुम्हाला जगातील कोणतेही ध्येय साध्य करता येईल. मोबाईलचा वापर नवनवीन शिकण्यासाठी करा. टाईमपास साठी करू नका कारण वेळ गेलेला कधीच येत नसतो. ‘मी ठरवले आहे कि मी मियामी मधील एक नामांकित शेफ होणारच’ तुम्ही सुद्धा ठरवा तुमचे ध्येय आणि तयारीला लागा ध्येय प्राप्तीच्या!
सोशल मिरर तर्फ़े सौरभला खूप खूप शुभेच्छा.