मानवी स्वभावातील अनेक भावनांपैकी भीती ही एक महत्त्वाची भावना आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ही खूप महत्त्वाची भावना आहे. ही भावना नसेल तर आपण कुठलेही अतिरेक धाडस करून संकटात पडू शकतो. सर्वसामान्यपणे प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती वाटतच असते.
“भीती.. पण किती?” हे वाचल्यावर लक्षात येते की वाजवीपेक्षा जास्त भीती जेंव्हा आपल्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण करते तेंव्हा तो एक मानसिक आजार तयार होतो. ज्याला Phobia अर्थात भयगंड असे म्हटले जाते.
एखाद्या वस्तूची, परिस्थितीची किंवा कृतीची अवाजवी भीती जेव्हा सतत जाणवत राहते आणि भीती वाटणाऱ्या त्या प्रत्येक गोष्टीपासून किंवा परिस्थितीतून व्यक्ती पळ काढते ही झाली Phobia ची शास्त्रीय व्याख्या.
Phobia चे शेकडो प्रकार किंवा शेकडो गोष्टींची भीती वैद्यक शास्त्रात नोंद आहे.
ही एक सामान्य भावना आहे, की दखलपात्र मानसिक त्रास आहे हे कसे ओळखणार.
Phobia ओळखण्याची काही महत्वाची लक्षणे.
- एखादी वस्तू, परिस्थिती किंवा कृतीच्या संपर्कात आल्यावर भीती वाटणे.
- भीती ही वस्तू किंवा परिस्थिती पेक्षा अती प्रमाणात असणे ज्याला आपण Out of Proportion म्हणतो.
- व्यक्तीला समजत असते की मला वाटणारी भीती ही अवाजवी आहे. व्यक्तीला ह्याचे ज्ञान असते.
- व्यक्तीला जाणीव, इच्छा असूनही भीतीवर नियंत्रण आणता येत नाही.
- ह्यामुळे सदर व्यक्ती अशा वस्तू, घटना , परिस्थितीला टाळायला सुरूवात करते.
- हळूहळू भीती वाढत गेल्यावर नुसत्या विचाराने त्रास व्हायला सुरुवात होते. व्यक्ती अस्वस्थ राहू लागते. घराबाहेर किंवा Comfort Zone च्या बाहेर पडत नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्य आणि सामाजिक सहभाग कमी होत जातो. भितीदायक गोष्ट टाळण्यासाठी व्यक्ती कुठल्याही थराला जाऊ शकते.
Phobia चे शेकडो प्रकार असले तरी तीन मुख्य प्रकारात त्याचे वर्गीकरण करता येते.
Agoraphobia – म्हणजे मोकळ्या जागेचे, वर्दळीच्या ठिकाणाची जागा, घरापासून लांब असणारी जागा
Social phobia – ह्याला Social Anxiety Disorder देखील म्हटले जाते. जन समुदायाला सामोरे जाणे, भाषण देणे ह्याची भीती वाटते. लोकं आपल्याला बघत आहेत आणि आपल्याला judge करत आहेत आपले दोष काढून अपमान करत आहेत. आपली चेष्टा करत आहेत, असा विचार येऊन भीती वाटायला सुरुवात होते.
Specific Phobia –
भूतकाळात आलेल्या काही विशिष्ट आणि धक्कादायक अनुभवांमुळे किंवा दुसऱ्याला आलेल्या वाईट अनुभवांचे कथन ऐकल्यामुळे देखील विशिष्ट प्रकारची भीती वाटायला सुरूवात होते.
ह्यात अनेकप्रकार आहेत
१.जसे विशिष्ट कीटक किंवा प्राण्यांची भीती जसे साप, कोळी, कुत्रा.
२.नैसर्गिक गोष्टी जसे वादळ, उंची, पाणी.
३.सार्वजनिक वाहनांची भीती जसे बस, ट्रेन, बोगदा, लिफ्ट, पुलावरून जाण्याची भती.
४. रक्त इंजेक्शन, अपघाताची दृश्ये ह्यांची भीती
५. गुदमरण्याची,उलटी होण्याची, वरून खाली पडण्याची भीती.
एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं भयगंड निर्माण होण्यासाठी अनेक कारणे असली तरी आनुवंशिकता, त्या व्यक्तीचा मुळात असणारा स्वभाव, आजूबाजूची परिस्थिती, आयुष्यातील भितीदायक अनुभव कारणीभूत असतात.
Behavioral therapy, Cognitive behavioral therapy, Exposure therapy सारखे अनेक उपचार फोबिया वर उपयुक्त आहेत. व्यक्तिगणिक प्रत्येक रुग्णाचा वेगळा अभ्यास करून, भयगंडाचे वेगळे कारण शोधून, रुग्णाचा त्यावेळी दिसणारा प्रतिसाद बघून Homoeopathic औषधे आणि Bach flower औषधांचा खूप चांगला फायदा रुग्णांना होऊ शकतो.
हा लेख लिहिण्यामागे विशेष कारण असे की, बऱ्याचदा भित्रा म्हणून किंवा शुल्लक गोष्ट म्हणून आपल्या घरात, आजूबाजूला असणाऱ्या भयगंडग्रस्त लोकांना आपण दुर्लक्षित करतो. विशेषतः लहान मुलांकडे दुर्लक्ष होते. लहान आहे म्हणून घाबरतो, मोठा झाला की होईल कमी असे म्हणून सोडून देतो आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या संपूर्ण स्वभावावर आणि सामाजिक आयुष्यावर होतो. भीतीपोटी घर न सोडणारी मुले अजूनच बुजरी होत जातात. त्यामुळे वर सांगितलेली लक्षणे जर आपल्याला कुणात दिसत असतील तर त्यांना वेळीच मदत करा. एक मुक्त स्वतंत्र आयुष्य जगायला मदतीचा हात द्या.
धन्यवाद!