मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती आणि होमिओपॅथी

Share

सप्रेम नमस्कार ,
होमिओपॅथी सर्वांसाठी ह्या लेखमालेत आपण मागील भागात PCOD बद्दल माहिती घेतली. आज आपण स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मेनोपॉज बद्दल माहिती घेवूयात. प्रजनन क्षमतेच्या आधारावर ठरवलेला स्त्री आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. रज म्हणजे धातू अर्थात मासिक पाळीतील स्त्राव, ह्या धातूची निवृत्ती म्हणजे पाळी बंद होण्याचा टप्पा. वयाच्या साधारण ३५/४० वर्षापर्यंत स्त्री बीज नियमाने वाढतात आणि क्षय पावतात. परंतु या पुढे त्यांची संख्या झपाट्याने कमी होत जाते. ह्या काळात प्रजनन क्षमता कमी होते आणि पाळी अनियमित होते. ही रजोनिवृत्ती ची पुर्वावस्था होय. त्यानंतर दोन्ही बिजांडकोषातील बिजांची संख्या निर्मिती फार कमी होत जाते आणि पाळी पूर्ण बंद होते. ही बंद झालेली पाळी पुढे वर्षभर परत चालू नाही झाली तर त्याला रजोनिवृत्ती म्हणतात. ही काही तत्काळ घडणारी घटना नव्हे. हळू हळू हॉर्मोन्स च्या पातळीत बदल होत जाणाऱ्या अवस्थेसोबत घडणारी नैसर्गिक अवस्था आहे. ह्या अवस्थेत इस्ट्रोजेन नावाच्या हार्मोन्सची पातळी खूप कमी होते आणि त्यामुळे स्त्रियांना अनेक शारीरिक तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. प्रजननक्षम वयात इस्ट्रोजेन हे हार्मोन स्त्री शरीराची राखण करते. दांडगी स्मरणशक्ती, सकारात्मक विचार, शरीराचे तापमान, शांत झोप, पाठीचा कणा – हाडांची मजबुती, त्याचबरोबर स्त्री सौंदर्याचे अनेक मापदंड टिकून राहण्यासाठी इस्ट्रोजेन फार मोठी भूमिका पार पाडत असते. एकंदरीत प्रजननक्षम वयात इस्ट्रोजेन हे स्त्रियांसाठी संरक्षक छत्रीचे काम करत असते. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन च्या अभावामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर पुढीलप्रमाणे परिणाम दिसू लागतात. सर्वात महत्वाचे म्हणजे सतत थकवा जाणवू लागतो. काम करण्याची इच्छा आणि ताकद कमी होत जाते. उत्साह कमी होतो. त्याच बरोबर काही विशिष्ट त्रास जाणवू लागतात जसे, चेहरा अचानक गरम होणे,घाम येणे, चेहऱ्यावरून किंवा डोक्यातून गरम वाफा गेल्यासारखे वाटणे. काही सेकंदांपासून ते काही मिनिटे ही भावना टिकून राहते व थोड्यावेळाने पूर्ववत झाल्यासारखे वाटते. हाडांचा ठिसूळपणा वाढतो कंबरदुखी गुडघेदुखी सुरू होते आणि क्वचित प्रसंगी शुल्लक कारणामुळे फ्रॅक्चर ला निमंत्रण दिले जाते. हाडांच्या तक्रारी सोबत जाणवणारा दुसरा त्रास म्हणजे लघवीच्या तक्रारी. वारंवार युरिन इन्फेक्शन होणे, लघवीला जळजळ होणे, लघवीला अनावश्यक घाई होणे, खोकला किंवा शिंक आल्यावर आपोआप थोडी लघवी होणे ह्या सर्व गोष्टी मुख्यतः इस्ट्रोजेन च्या कमतरतेमुळे जाणवतात. त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल ( LDL) चे प्रमाण वाढल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे प्रमाण मेनोपॉज नंतर वाढते. भविनिक पातळीवर सांगायचे झाल्यास एकटे पणाची भावना वाढत जाते. अकारण चिडचिड वाढते. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागल्याने टचकन डोळ्यात पाणी येणे. अकारण रडायला येणे आणि नकारात्मक भावना बळावत जातात.
वयाच्या साधारण चाळीशीनंतर खूप स्त्रिया एकाकी झालेल्या असतात. सेवानिवृत्ती, शिक्षणासाठी घराबाहेर पडलेली मुले, शारीरिक आणि भावनिक पातळींवर होणारे बदल ह्यामुळे अनेकींना ह्या काळात डिप्रेशन चा त्रास जाणवतो.
थोड्याफार फरकाने, रजोनिवृत्ती मध्ये प्रत्येक स्त्रीच्या स्वभावानुसार होणारा त्रास हा कमी अधिक होत असतो. औषध उपचारांच्या जोडीने अशा वेळी तिला गरज असते ती कुटुंबाच्या आधाराची. मूळात हा बदल नैसर्गिक आहे आणि तात्पुरता आहे. जसजसे शरीर हॉर्मोन्स च्या बदलाला जुळवून घेईल तसतसे हा त्रास कमी होत जाणार. हे एकदा समजावून सांगितले आणि ह्या बदलाला सामोरे जाण्यासाठी स्त्रियांची मानसिक तयारी करून घेतली की त्या हे आव्हान देखील लीलया पेलू शकतात. होमिओपॅथिक औषधे ह्या काळात, स्त्रियांना शरीर आणि मन ह्या दोन्ही पातळीवरील बदलांसोबत जुळवून घेण्यासाठी मदत करतात. आणि त्यांच्या जोडीने हा बदलाचा टप्पा कमीतकमी ताण आणि संघर्ष सोबत पार पाडता येतो. शरीरात होणाऱ्या बदलांचा स्वीकार देखील खूप सकारात्मक परिणाम घडवून आणू शकतो. पुरेशी झोप, कॅल्शियम युक्त आहार, व्यायाम आणि दिवसभराच्या कामातून २-३ तासांनी छोटे छोटे ब्रेक , सकारात्मक विचारसरणी, मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि गरज पडल्यास फॅमिली समुपदेशकांची मदत घ्यायला विसरू नये.
आजच्या पुरते ऐवढेच…
पुढील भागात पुन्हा भेटूया नवीन विषयासह, तो पर्यंत,
कळावे, लोभ असावा.

डॉ. सौ. नीलम गायकवाड.
एम. डी. ( होमिओपॅथी )
एम. एस. ( कौंसेलिंग )