sm logo new

सुविधांसह परिपूर्ण शिक्षण काळाची गरज

Share

Latest

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात दिमाखात साजरा झाला .’हर घर तिरंगा ‘हे अभियान मा.पंतप्रधानांनी आयोजित केले .संपूर्ण देशाने अभिमानाने ते यशस्वी केले .प्रत्येकाच्या घरावर 13 तारखेपासूनच तिरंगा डौलाने फडकला. घराघरातील सर्वांनी आपल्या राष्ट्रध्वजाला आदराने व प्रेमाने मानवंदना दिली, त्यात लहान मुले तर सामील होतीच पण वयोवृद्ध मंडळी ही सामील होती .बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले. अवघड वाटणारे ध्वजारोहणाचे काम काही ठिकाणी आजी व आजोबांनी ही मोठ्या देशभक्तीने साजरे केल्याचे दिसून आले. संपूर्ण देश या आनंदात होता जणू काहीच दुःख, चिंता नाही. सर्वकाही ‘ऑल इज वेल ‘ आहे .पण खरं आहे का हे? मनाला पडलेला एक प्रश्न!!…
खरंतर रोजच्या जीवनात बऱ्याच घडामोडी व प्रसंगांना तोंड देत सामान्य माणूस जगत असतो. त्यातही संपूर्ण देश साजरे करू शकतो असे सणावाराचे दिवस आले की, आपले रोजचे जगणे समस्या विसरून ,प्रत्येक जण भारावल्यासारखे ते आनंदाचे क्षण जगून घेतो, कारण ते क्षणच पूर्ण वर्षभर जगण्यासाठी उमेद देत असतात. सोशल मीडिया व टीव्हीवरील बातम्यांमुळे खरंतर घराघरात संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातील बरे वाईट प्रसंग पोहोचतात. असा महोत्सव साजरे करण्याचे क्षण पोहोचले की सर्वांनाच उत्साह येतो.
एक बातमी पाहून मात्र मन सून्न झालं. जून ते सप्टेंबर हे पावसाळ्याचे दिवस व या बातम्या तर रोजच ऐकायला व पाहायला मिळतात कुठे पूल वाहून गेला, तर कुठे पिकासह शेतच वाहून गेलं. अतिशय नुकसानीच्या व पावसाने हाहा:कार माजवलेल्या बातम्या पाहतानाच या बातमीने लक्ष वेधून घेतले.
लहान मुलांना पाण्यात खेळायला फार आवडतं, पण नाईलाज म्हणून नदीच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन रोज नदीपलीकडे जाणारी व येणारी मुले पाहिली हा खूप थरारक अनुभव वाटला. आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली पण खरंच देश सर्वांसाठी स्वतंत्र झालाय का ? आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय पण देश खरंच स्वतंत्र झालाय का ? हा प्रश्न सारखा सतावतोय. कारण देश स्वतंत्र झालाय तरी आपल्या हक्काचे शिक्षण ही आपली मूलभूत गरज सर्वांची पूर्ण होताना दिसत नाही. शिक्षण आपल्या सर्वांच्या हक्काचे आहे पण तेही या चिमुकल्यांना इतकी खडतर तपश्चर्या केल्यानंतर मिळावं ? त्यासाठी त्यांना इतकं झगडावं लागावं ? याचं वैषम्य वाटतं…..
ती लहानमुलं फार तर पहिली दुसरीतील असतील. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील, देवळाचा पाडा या वस्तीतून शाळा शिकायला नदीपार करून येणारी व जाणारी, पाच ते सात वयोगटातील, छोटी लहान मुलं व मुली, आणि त्यांना आपल्या खांद्यावर ‘ पातेल्या ‘मध्ये ठेवून नदीपलीकडे नेणारी व शाळा सुटल्यावर नदीपार आणणारी ‘ जलपरिषद मित्र परिवाराची ‘मोठी मुले म्हणजे या मुलांचे दादा .हा सगळा जीवावर उदार होऊन प्रवास रोज चालतो .


गुजरातच्या बॉर्डर वरचा हा तालुका .नाशिक दिंडोरीच्या परिसरातला हा तालुका. मंत्री व खासदार निवडून दिलेली हीच ती जनता आहे .स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही असं पातेल्यात बसून इवल्याशा जीवांना नदीपार करताना पाहिलं की आपल्या जीवाचा थरकाप होतो. हीच मुले पुढे दहावी पास झाली , मोठी झाली की वस्तीवरील इतर मुलांना असंच पातेल्यात बसवून नदी पार करून देतात. नाशिक मधील या बांधवांना शालेय शिक्षणासाठी आपल्या मुलांना जीवावर उदार होऊन, अगदी काळजावर दगड ठेवून नदी पार करून रोज पाठवावे लागते . त्यांच्या उद्याच्या उज्वल भवितव्यासाठी आज मात्र जीव धोक्यात घालावा लागतो . यासारखे दुर्दैव काय? एवढी मोठी तारेवरची कसरत करावी लागावी? शासन व राज्यकर्त्यांच्या कामाबद्दल येथे मोठे प्रश्न उभे राहतात .शिक्षण खरंच तळागाळापर्यंत पोहोचले का? शिक्षणाची घेण्याची सोय सर्वांसाठी सारखीच आहे का?देश स्वतंत्र झालाय गेली 75 वर्षे म्हणतोय आपण मग या लहान मुलांना नदीपलीकडे जाण्यासाठी साधा पूलही असू नये? ही गरज जर अजून पूर्ण झाली नसेल तर देशाचे स्वातंत्र्य अजूनही सर्वांसाठी नाही असंच दिसतं…..
प्रगत राष्ट्रांच्या यादीत आहे देश असे म्हणतात …पण इथे तर चित्र वेगळेच आहे… शिक्षणाची आस व महत्त्व हे सर्वांना माहीत आहे .त्यासाठी या मुलांचे आई-वडील सर्व तडजोड करतात.
पण उद्याचे राष्ट्राचे भवितव्य असणाऱ्या लहान मुलांचे आजचे वर्तमान व जीवन धोक्यात असेल तर!!!… प्रगती व विकास फक्त कागदावरच होतो का ?असा प्रश्न पडतो. प्रगती व विकास नावाच्या कागदी होड्या म्हणजे लहान मुलांनी पावसाच्या साठलेल्या पाण्यात सोडलेल्या होड्या वाटतात .पुन्हा पुढच्या पावसाळ्यात नव्या तयार करतात ना ?अगदी तशाच……

FOR YOU