निनाद

Share

मनामध्ये समाजसेवेची आस आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा ध्यास आमच्याकडे भरपूर होता. यालाच सत्यात उतरवण्यासाठी आम्ही हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित न ठेवता छोटी-छोटी समाजकार्य करायला सुरुवात केली. आठवणीत असलेली पहिली मदत म्हणजे एका मुलीला आणि तिच्या आज्जीला केली होती, ती मुलगी अवघी ६ किंव्हा ७ वर्षांची असेल आणि आम्ही २ री मध्ये !😀 त्यावेळी मदत करून जो आनंद आणि आत्मिक सुख मिळाले ते पैशाने मिळवणे अशक्यच! तेव्हापासून आम्हाला समाजकार्याबद्दल ओढ वाढली. भविष्यात आपण जास्तीत-जास्त गरजू व्यक्तींना मदत करायची ही खूणगाठ मनाशी बांधली. छोट्या-छोट्या समाजकार्यानंतर अखेर तो दिवस उजडला. 5 फेब्रुवारी 2019 रोजी आम्ही आपल्या ‘निनाद फाऊंडेशन’ ची नोंदणी केली. त्यावेळी नोंदणी करण्यासाठी भरपूर अडचणी आल्या, पण शुभकार्य विघ्न न येता पार पडलं तर काहीतरी विसरल्यासारखं वाटतं, हो ना?…..

निनाद फाऊंडेशन तर सुरु केले पण चालवण्यासाठी, समाजउपयोगी कार्य करण्यासाठी पैसे नव्हते, सर्वचजण कॉलेजवयीन तरुण-तरुणी असल्यामुळे मिळकत काहीच नाही, पण समोरच्यांच्या आयुष्यातील दुःख त्याच्या डोळ्यातून आम्हाला समजतं आणि मग ते त्यांचे दुःख आम्हाला शांत बसू देयचं नाही. मग आम्ही आमच्या पॉकेटमनी चे पैसे वापरण्यास सुरुवात केली.आम्ही आमचा सगळा वायफळ खर्च बंद केला आणि त्या पैशाचा उपयोग गरजू माणसांची मदत करून दुःख दूर करण्यासाठी करायला सुरुवात केली, आणि निनाद फाऊंडेशन चा सरकारी मान्यता मिळवून समाजकार्याचा प्रवास सुरु झाला.

दिवाळी सण आपण गोड-धोड करून, रोशनाई करून साजरा करतो पण त्यांचं काय जे आपलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करून एका साध्या लाईट नसलेल्या,प्रसंगी साधा दिवा नसलेल्या झोपडीत राहतात, त्यांच्या मुलांना का हा आनंद मिळू नये? का ते भारतात राहत नाहीत का? का ते माझ्या महाराष्ट्रात राहत नाही ! ज्या महाराष्ट्रामध्ये साधी भाजी सुद्धा 4 घरामध्ये वाटून खाल्ली जाते, कोणी उपाशी सोडा अर्धपोटी झोपत नाही, सुखी-समाधानी अशी परंपरा आणि तिथे एका घरात आनंदी उजाळा आणि दुसऱ्या घरात अंधार आणि भूक! असं होणार नाही. दौंड तालुक्यातील पारगाव(सा.मा.) गावामध्ये मध्ये आलेल्या ऊसतोड ४५०-४८० कामगारांना, त्यांच्या पत्नी आणि मुलांसह दिवाळीचा फराळ, कपडे, पणती अश्या सगळ्या वस्तू देऊ केल्या व त्याचबरोबर मुलांना शिक्षणाची ओढ लागावी यासाठी त्यांना पाटी-पेन्सिल आणि अंकलिपी, बालमित्र अश्या वस्तू देखील दिल्या.

आपल्याला सध्याच्या काळात पर्यावरण जपणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून आम्ही मुख्य कल पर्यावरणावरती दिला. विविध गावांमध्ये जाऊन तेथील मातीचे परीक्षण करून, तिथल्या मातीला पूरक अशी स्थानिक झाडे लावायला सुरुवात केली. झाडांची काळजी स्थानिकांनी घ्यावी यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्यावरच तिथून मागारी फिरणे.सहकारी मित्र किंव्हा ओळखीतील कोणाच्या घरी लग्न झाले तर नव-विवाहित जोडप्याच्या हातून वृक्ष लागवड करून घेण्यास सुरुवात केली. गावाकडील माध्यमिक शाळांमध्ये ज्या शाळेमध्ये क्रीडा साहित्य उपलब्ध नाही तिथे क्रीडा साहित्य देणे, शाळेतील गरिबी विद्यार्थाना शालेय साहित्य, शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये आवश्यक ती मदत करून कला-गुणांना वाव देणे, अशी सगळी कार्य सुरू झाले, तसेच सार्वजनिक गणेश उत्सवांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून मुलांच्या कला-गुणांना वाव देणे सुरु केले.

अशी सर्व पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्व कार्य सुरु असतानाच ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असंच ज्या ठिकाणी आमचे बंधू-भगिनी दुःखात असतील त्यांना मदतीची गरज असेल तिथे आम्ही आमच्या आवाक्यानुसार नेहमी मदत करतो. सांगली मध्ये आलेल्या महापुरानंतर तेथील अंकलखोप मधील शाळेसाठी आवश्यक असणारे संपूर्ण साहित्य, शिक्षकांसाठी आवश्यक साहित्य व मुलांसाठी आवश्यक असणारे सर्व शैक्षणिक, क्रीडा साहित्य देऊ केले, आणि तेथील महापुरामुळे त्रासलेल्या जनतेला कपडे वाटप केले. त्या सर्वांचे आनंदी चेहरे अजूनही आमच्या लक्षात आहेत.

पर्यावरणामध्ये कचरा मोठ्याप्रमाणावर परिणाम करतो. त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे म्हणून आम्ही ‘ध्यास ग्राम कल्याणाचा’ या मोहिमेवर निघालो, ज्यामध्ये रायगड परिसरातील 23 गावामध्ये जाऊन तेथील कचऱ्याची समस्या जाणून घेतली आणि त्यावरती उपाययोजना करण्यासाठीची योग्य ती तयारी आत्ता सुरु आहे.(लॉकडाऊन च्या पूर्वीची मोहीम असल्यामुळे)

पर्यावरण आणि मातीशी घट्ट नातं असलेला आणि अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांना त्या झाडांच्या लागवडींनंतर आर्थिक मदत होईल यासाठी ‘पर्यावरण आणि शेतकरी विकास’ या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि तो कार्यक्रम यशस्वीरित्या चालत ही आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळातही वेगवेगळ्या social media वरती विविध पोस्टर, व्हिडिओ तयार करून जनजागृती केली, शक्य असेल तिथे जाऊन मदत ही पोहचवली. अशी अनेक कामे आम्ही नेहमी करत असतो. एक मोठे समाजकार्य उभा करून अनेकांना मदत करायची आहे. एक मोठ्ठा सकारात्मक बदल घडण्यासाठी आम्हाला तुमच्या साथीची, तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. निनाद मध्ये तुम्ही कोणत्याही मार्गाने योगदान देऊ शकता.

•ज्यांना श्रम शक्य आहे त्यांनी श्रम द्यावे,

•ज्यांना धन शक्य आहे त्यांनी धन द्यावे (धन=आर्थिक मदत)

निनाद मधील अश्या सर्व समाजकार्यासाठी आवश्यकता असते ती आर्थिक मदतीची परंतु ती नसल्याने आणि तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या आमच्या उद्दिष्ठामुळे ‘निनाद रायडर स्टुडिओ’ आणि ‘निनाद ग्राहक सेवा केंद्र’ ची स्थापना केली आहे. जरी आणखी काही मदत करणे शक्य नसेल तरी आमच्याकडून या दोन सेवांचा लाभ घेतला तरी तुम्ही कोणालातरी मदत केली याचे समाधान तुमच्यासोबत नेहमी असेल.

निनाद कुटुंबामध्ये एक महत्वपूर्ण सदस्य होण्यासाठी कृपया संपर्क करा

9850 703 701

निनाद रायडर स्टुडिओ

9850 703 701

निनाद ग्राहक सेवा केंद्र

97 63 03 01 63

Ninadsevakendraindia.in