sm logo new

कांदा (Onion) उत्पादन आणि संयुक्त मधमाशी (Bee) पालन…

social mirror onion production joint beekeeping
social mirror onion production joint beekeeping

Share

Latest

इथे खूप जणांना हा प्रश्न पडला असेल, की मधमाश्या (Bee) आणि कांदा (Onion) पिकाचा काय संबंध?
खरेतर मधमाश्यांशिवाय शेती ही कल्पनाच विचारांच्या पलीकडची आहे, शेती मधील सर्वात महत्वाचे काम मधमाश्या करतात आणि ते म्हणजे “परागीभवन (pollination)”. आपण मधमाश्यांना फक्त मध तयार करणाऱ्या माश्या म्हणूनच ओळखतो पण त्यांचे इतरही खूप फायदे आपल्याला होतात.

कांदा पिक

कांद्याचे पिक हे दोन वेगळ्या-वेगळ्या उद्देशांसाठी घेतलं जातं, एक म्हणजे- आपण खातो ते कांदे ( Bulb ) आणि दुसरे म्हणजे कांद्याचे बी (seeds) उत्पादन . कांद्याचे बी हे पुन्हा कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी वापरतात तसेच त्या बियांपासून तेलही काढले जाते. कांदा हे मसाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. यामुळे त्याची मागणीही कायमच मोठ्या प्रमाणावर असल्याची पाहायला मिळते. यामुळेच दरवर्षी अनेक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेण्यावर भर देत असतात.
कांदा हे विश्वातील तिसरे मुख्य पिक आहे, ज्याचे उत्पादन हे १.०६४ दशलक्ष टन ते १५.११८ दशलक्ष टन पर्यंत आहे. भारताला जवळपास ९४०० टन कांदा बियाण्याची गरज ११.१३ लक्ष हेक्टर जमीन लागवडी खाली आणण्या करता असते. ज्या मधील ४०% बियाणे हे कंपन्या ( Seed production Companies) तयार करतात तर ६०% बियाणे हे शेतकरी स्वतः तयार करतात.
शेतकरी कांद्याचे बी उत्पादन घेत असताना बऱ्याच वेळा माहिती अभावी शेतकरी आपल्याला मिळणाऱ्या उत्पादनातच समाधान मानत असतो. परंतु असे न करता प्रत्येक शेतकऱ्याने थोडा अभ्यास करून उत्पादन घेतले तर उत्पादनात नक्कीच वाढ होईल यात शंकाच नाही.
कांद्याचे बी उत्पादन घेताना आपण उत्पादनात मधमाश्यांचा उपयोग करून ४०%-५०% कसे वाढवू शकतो व आपला दुहेरी फायदा कसा होऊ शकतो हे जाणून घेऊयात …

बी उत्पादनाकरिता कांदा लागवड झाल्यानंतर आपण कांदापिकामध्ये मधमाश्यांचा उपयोग करणार आहोत, जेव्हा कांद्याला वरील बाजूला फुले दिसायला सुरुवात होईल तेव्हा आपण मधमाश्यांच्या पेट्या आपल्या शेतात ठेवून कृत्रिमरित्या मधमाश्यांना आपल्या शेतात आणू, एक एकर कांदा पिकाकरिता आपल्याला ५ मधमाश्यांच्या पेट्यांची आवश्यकता असते. या पेट्या आपण आपल्या शेतात काही विशिष्ट अंतरावर ठेवणार आहोत. या पेट्या ठेवल्यानंतर आपले कांदा बियांचे उत्पादन तर वाढेलच, त्या सोबतच आपण उत्कृष्ट दर्जाचे मध देखील मिळवणार आहोत.

मी किंवा इतर कोणीतरी सांगितले म्हणून तुम्ही मधमाश्यांच्या पेट्या तुमच्या शेतात ठेवल्या … पण त्या मधमाश्या नेमकं काय आणि कश्या काम करतील?

आपण मधमाश्यांच्या पेट्या आपल्या शेतात विशिष्ट अंतरावर ठेवल्यावर यातून मधमाश्यांचे मुख्य काम हे मध गोळा करणे हेच असते, आपण याचा उपयोग आपल्या शेती करता करून घेत आहोत, जेव्हा मधमाश्या मध गोळा करण्या करता फुलांमधील रस शोषण करतील तेव्हा त्यांच्या पायाला त्या फुलांचे परागकण चिकटतात, तेच परागकण हे दुसऱ्या फुलावर मधमाशी जाते तेव्हा त्या फुलातील स्त्री केसरवर जाऊन पडतात यामुळे परागीभवनाला मदत होते. परागीभवन म्हणजेच फुलांचे बी मध्ये रूपांतर होणे. एका अभ्यासामध्ये असे समोर आले आहे, की एक मधमाशी ही तिच्या अन्नाच्या शोधा मध्ये १ ते ५ किलोमीटर पर्यंत प्रती दिवस प्रवास करते , याचाच फायदा आपल्याला होतो, आपण शेतात ठेवलेल्या मधमाश्या या त्यांचे अन्न शोधत फिरत असतात, त्या फिरतानाच आपल्या पिकाकरीता महत्वाची अशी परागीभवनाची क्रिया होण्यासाठी मदत करतात, थोडक्यात सांगायचे झाले तर आपण त्यांना अन्न उपलब्ध करून देतो आणि त्यांच्या कडून आपले परागीभवनाचे काम साध्य करून घेतो.

परागीभवन हे फक्त मधमाश्याच करतात का? तर नाही परागीभवन हे विविध माध्यमांद्वारेही होऊ शकते जसे की हवा, पाणी, किडे, मुंग्या व इतर कीटक. मग आपण मधमाश्यांचाच एवढा विचार का करतोय, तर मधमाश्या या जास्त प्रवास करतात तसेच त्यांच्या पासून आपण मध व इतर पदार्थ जसे कि मेण, रॉयल जेली ( Royal jelly), परागकण व इतर घटक ही मिळतात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे मधमाश्यांमुळे कांद्याच्या उत्पादनात ५०% तर प्रती एकर १ क्विंटल पर्यंत वाढ होते हे सिद्ध झालेले आहे .तर मग झाला ना आपला डबल फायदा !!
तसेच आपण यामधूनच बेरोजगारीची समस्या कमी होऊ शकते, कशी ते बघूया …
तुम्ही थोडी गुंतवणूक ( Investment ) करून काही मधमाश्यांच्या पेट्या ( honey bee hives ) विकत घेतल्या, त्या सोबतच मधमाशी पालनाचे शिक्षण घेऊन तुमच्या गावातील शेतकऱ्यांना मधमाश्यांमुळे होणाऱ्या उत्पादन वाढीबद्दल समजावून सांगितले, तुम्ही विकत घेतलेल्या पेट्या भाडेतत्वावर शेतकऱ्यांना द्यायच्या, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल व तुमच्या पेट्यांमध्येही मध जमा झालेले असेल ज्याच्यावरती तुम्ही प्रक्रिया करून पुढे विकू शकता व तुम्ही विकत घेतलेल्या पेट्यांचे भाडे ही तुम्हाला मिळेल. मधासोबतच तुम्ही रॉयल जेली ( Royal Jelly ), मेण (wax) व इतर उत्पादनेही मिळवू शकता.
कांदा पिकामध्ये मधमाश्यांचा अनोखा प्रयोग तुम्हीही तुमच्या शेतामध्ये नक्की करून पाहा !
धन्यवाद!

FOR YOU