“पावसाळ्यातील सह्याद्रीची भटकंती”

Share


पावसाच्या रिमझीम सरी चालू आहेत… डोंगरदऱ्यातून येणारा गार वारा अंगाला झोंबत आहे…धरतीने हिरवागार शालू अंगावर पांघरला आहे…धुक्याच्या अस्तित्वामुळे वातावरण धूसर झाले आहे…डोंगरांमधून ओघळणारे पाण्याचे प्रवाह धबधबे निर्माण करू लागले आहेत आणि अशा अद्भूत ठिकाणी लॉंग ड्रायव्ह नंतर तुम्ही पोहचले आहात. स्वर्गाहून सुखकर असे हे वातावरण आपल्याला अनुभवायला मिळत आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये!
पावसाळा म्हणजे सर्वांचा आवडता ऋतू होय. या ऋतूच्या आगमनाने सर्व सृष्टी चैतन्यमय होऊन जाते. पशु पक्षी वनस्पती आणि मनुष्य प्राण्यामध्ये जान येते. उन्हाळ्यातील घामाने डबडबलेले शरीर पाण्यात चिंब भिजण्याची वाट पाहत असते.

सह्याद्री आपले बाहू पसरून आपण सर्वांच्या स्वागतासाठी तयार असतो. पाऊस पडून गेल्याने मातीचा गंध महागड्या परफ्युम पेक्षा मोलाचा झालेला असतो. तिफण घेऊन बळीराज शेतामध्ये राबत असतो. पतीपुस्तक घेऊन शाळेत जाणारी मुले ऑनलाईन शिक्षणात मग्न झाली आहेत. सगळीकडे कसा आंनदी आनंद वातावरण निर्माण होऊ लागले आहे. कोरोनाची मळभ काही प्रमाणात का होईना ओसरली आहे . म्हणून तुम्ही या पावसाळ्यात सह्यद्रीच्या भटकंतीला जायला विसरू नका बरं का? नाशिक ते कोल्हापूर पसरलेल्या सह्याद्री मध्ये असंख्य गड किल्ले, लेणी, तलाव, धरणे आणि संस्कृती पाहण्यासारखी आहे. सह्यद्रीमध्ये मनसोक्त फिरा तो तुमच्या स्वागतासाठी आतुर झाला आहे पण त्याची काळजी आवश्य घ्या.
सह्यद्री ची सफर करताना काय काळजी घ्यावी

यासाठी माझ्या काही टिप्स

 1. पर्यावरणाला धोका पोहचेल असे कोणतेही कृत्य करू नका.
 2. प्लास्टिक वापर टाळा आणि चुकून प्लास्टिक जवळ बाळगले असेल तर ते तेथे किंवा घरी येऊन कचरा कुंडीत टाका.
 3. हॉर्न वाजवून तेथील जैवसंपदेला हानी पोहचवू नका.
 4. निसर्गात जात आहात तर त्याच्या संगतीत राहा.
 5. निसरडे रस्ते, शेवाळलेले दगड यामुळे तुमच्या बरोबर चांगले बुट आणि आवश्य कपडे परिधान करायला विसरू नका.
 6. स्थानिक फूडची टेस्ट नक्की चाखा.
 7. विकेंडला जाऊन गर्दी करण्यापेक्षा सुट्टी मिळत असल्यास वीकडेला जाण्याचा प्रयत्न करा.
 8. गडकिल्यावरील वस्तूंची तोडफोड करू नका. तेथील प्राचीन वस्तुंना हात लावण्याचा मोह टाळा.
 9. ट्रेक करताना धुक्यामुळे वाट चुकण्याचा जास्त संभव असतो त्यामुळे स्थानिक किंवा वाटाड्या बरोबर ठेवा.
 10. पर्यटनाला आदिवासी भागात जात असाल तर जातायेता एखादी सोशल ऍक्टिव्हिटी नक्की करा.
 11. मन रिफ्रेश करण्यासाठी निसर्गात जात आहात तर तुमचे सर्व ग्याझेटस बाजूला ठेवा.
 12. कुटुंबाला घेऊन निसर्ग सानिध्यात वेळ खर्च करा. ज्याठिकाणी जात आहात त्या ठिकाणची माहिती गुगलवरून आत्मसात करा आणि आपल्या मुलांना ती माहिती सांगा.
 13. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका जरा हटके डेस्टिनेशन निवडा.
 14. दारू सिगारेट वगैरे निसर्ग सानिध्यात कृपया सेवन करू नका.
 15. नदीप्रवाहात तुमच्याकडे असणाऱ्या वस्तू टाकू नका. हे सर्व करणे प्रत्येकाला सोपे आहे फक्त तशी इच्छाशक्ती असू द्या. सह्याद्री ची सफर चे महत्व सर्व जगापर्यंत पोहचवू या चला आंनदी जीवन जगण्यासाठी पर्यटन करू या.