PCOD / PCOS म्हणजे काय ?

Share

सप्रेम नमस्कार,

आजपासून पुढील काही लेखांत आपण स्त्रियांच्या काही आरोग्य समस्यांची माहिती घेणार आहोत. किशोरवयीन मुली आणि प्रजननक्षम वयातील अनेक महिलांना अनियमित पाळीचा त्रास जाणवत असतो. त्यापैकी बहुतांश पेशंट मध्ये ह्या त्रासाचे कारण असते, पी. सी. ओ. डी. ( PCOD/ PCOS). P म्हणजे पॉली अर्थात एका पेक्षा जास्त. C म्हणजे सिस्टिक अर्थात द्रव घटक असलेला फुगा किंवा बुडबुडा. O म्हणजे ओवरियन अर्थात अंडकोश आणि S म्हणजे सिंड्रोम अर्थात लक्षणांचा समूह. ह्याचा एकत्र अर्थ समजून घेतला तर तो असा होतो की, अंडाशयावर तयार झालेल्या किंवा साठत गेलेल्या पाण्याच्या गाठींमुळे शारीरिक पातळीवर दिसून येणारा लक्षण समूह. सर्वसामान्यपणे जाणत्या झालेल्या मुलींना आणि स्त्रियांना २८ दिवसात पाळी येते. साधारण १२- १७ दिवसात स्त्रीबीज परिपक्व होवून अंडाशयातून गर्भ पिशवीत सरकते. परंतु pcod मध्ये हॉर्मोन्स च्या असंतुलनामुळे हे संपूर्ण गणित बिघडते आणि पाळीचे चक्र अनियमित होते. हा अनियमितपणा अनेक शारीरिक अडचणींना आमंत्रण देतो. ह्याची काही महत्वाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत, जसे पाळीमध्ये कमी किंवा अधिक प्रमाणात अनियमित स्त्राव होतो. तसेच पाळी लांबत जाते किंवा / उशिराने येते. वर्षातून ९ पेक्षा कमी वेळा पाळी येवू शकते. काहींना पाळीच येत नाही तर काहीना खूप जास्त स्त्राव होतो. पाळी वेदनादायी असते. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर मुरूम येतात. केस गळून विरळ आणि निस्तेज होत जातात. चेहऱ्यावर अनावश्यक केस येतात. तसेच पाठीवर पोटावर असणारी लव जाड आणि जास्त गर्द होत जाते, त्वचा काळवंडते. वजन दिवसेंदिवस वाढत जाते आणि वाढलेले वजन कमी होणे फार अवघड होते. ह्या सर्वांसोबत सर्वात मोठी समस्या भेडसावते ती म्हणजे वंध्यत्व. सदर आजारात पुरुषत्वाचे हॉर्मोन्स वाढत जातात त्यामुळे स्त्री बीज परिपक्व होण्यास अडथळा निर्माण होतो. अंडाशय हे स्त्रीबीज मुक्त करण्यास असमर्थ होतात. त्यामुळे अपरिपक्व स्त्रीबीज अंडाषयातच सिस्ट च्या स्वरूपात साठून राहतात. स्त्रीबीज जर परिपक्व झालेच नाहीत तर गर्भधारणा राहूच शकत नाही. पाळीच्या चक्रात वाढत जाणारे अंतर, अंड्रोजेन हॉर्मोन्स ची वाढलेली पातळी ह्यामुळे स्त्रियत्वाच्या खुणा किंवा शारीरिक ठेवण ह्यात बदल होत जातो. उत्साह कमी होतो. शरीराला जडत्व आल्याची भावना येते. वाढलेले वजन, केसांत आलेला विरळपणा, चेहऱ्यावर आलेले अनावश्यक केस ह्यांमुळे मुलींचा आत्मविश्वास कमी होतो. बाहेर समाजात वावरण्यास लाज वाटते. महिलांमध्ये वंध्यत्व, त्यावर करावे लागणारे उपचार, पदरी येणारी निराशा ह्या मुळे अनेकींना डिप्रेशन चा त्रास देखील होतो. PCOD चा दीर्घकाळ त्रास असणाऱ्या महिलांमध्ये भविष्यात डायबेटिस, हाडांचा ठीसुळपणा, हृदयरोग, स्थुलत्व, पाळीच्या इतर गंभीर समस्या होण्याची शक्यता जास्त असते. आनुवंशिकता आणि पाश्चात्य जीवनशैली चे अनुकरण ह्यांचा एकत्रित परिणाम PCOD साठी कारणीभूत आहे. PCOD मुळे वाढते वजन आणि पुन्हा वाढत्या वजनामुळे पाळीचा अनियमित पणा हे चक्र चालूच राहते. PCOD ही समस्या उपचार करण्यासाठी अवघड असली तरी योग्य तो औषधोपचार आणि निरोगी जिवनशैली ह्या चक्रातून बाहेर पाडण्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. वजन नियंत्रणात ठेवणे त्यासाठी योग्य तो व्यायाम आणि आहार घेणे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. होमिओपॅथिक उपचार पद्धतींमध्ये हॉर्मोन्स असंतुतील होणाऱ्या कारणावर मात करणारे औषध दिले जाते. बाहेरून हॉर्मोन्स देणे हा ठोस पर्याय नसून हॉर्मोन्स चे असंतुलन, संतुलित करणे हा ठोस पर्याय आहे. आणि हेच काम होमिओपॅथिक औषधे करतात. शरीराच्या इतर अवयवांवर दुष्परिणाम न होता हळूवार उपचार केले जातात. मुळात पाळी येणे ही नैसर्गिक क्रिया आहे व ती विनासायास होणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी होमिओपॅथी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आजवर अनेक महिला आणि मुलींना होमिओपॅथिक औषध उपचारांनी PCOD ह्या समस्येतून बाहेर काढता आले ह्याचे निश्चितच समाधान आहे. आपल्या घरातील मुली, बहिणी, सूना कुणालाही पाळीच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर वेळीच त्याचे कारण शोधून त्यावर उपचार घ्या.
आजच्या भागात ऐवढेच. पुढील भागात नवीन विषयासह नक्की भेटू.
तो पर्यंत, कळावे लोभ असावा,

डॉ. सौ. नीलम गायकवाड.
एम. डी. ( होमिओपॅथी )
एम. एस. ( कौंसेलिंग )