आज संध्याकाळी एका व्यक्तीच्या घरी गेलो तर गेल्या गेल्या 80 वर्षाच्या सिनिअर सटिझन ने माझे दार उघडून स्वागत केले आणि आतमध्ये पाहतो तर काय एक ओजस्वी, शांत, संयमी अर्ध शतक ओलांडलेला चेहरा माझी वाट पाहत होता. त्याचा चेहरा त्याच्यातील आत्मविश्वास, ईच्छाशक्ती आणि समाधान सांगून गेला. ह्या नवीन मित्राचे नाव आहे विक्रम इंगळे – कंटेंट रायटर आणि ट्रान्स्लेटर. पुढे आम्ही एक तास त्याच्या 25 वर्षाच्या जीवनशैलीवर चर्चा केली.
1994 साली विक्रमने वाडिया कॉलेज मध्ये इंजिनिअरिंग केले. महाविद्यालीयन शिक्षण चांगल्या गुणांनी पास झालेल्या विक्रमच्या सुंदर जीवनात एक मोठे वादळ येईल हे त्याने स्वप्नात ही पहिले नव्हते. 1995 साली त्याला अचानक ताप आला आणि जो 105 डिग्रीवर गेला आणि काही दिवसात त्या तापाने नर्व्हस सिस्टीम डॅमेज केली. तीन वर्ष बेड रिडन झालेल्या विक्रमसाठी त्याच्या आईवडिलांनी त्याकाळी म्हणजे 1995ते 98 दरम्यान उपलब्ध असलेल्या विविध ट्रीटमेंट घेतल्या पण त्याला आणि त्याच्या आईवडिलांना अपयश आले. परंतु या माणसाने हार मानली नाही. साधे उठून बसता येत नाही चेहऱ्यावरील अवयव फक्त शाबूत पण मानेखालील सर्व अवयव असून नसल्या सारखे झाले होते. अशा कठीण परिस्थितीत ही त्याने हार न मानता टिळक टॅंकवर पोहायला सुरुवात केली. अहो एकवेळ लहान मुलगा स्विमिंग लवकर शिकेल पण याच्या हातापायांची हालचालच होत नाही मग पोहायचे कसे? त्याच्यातील इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. सातत्य आणि प्रयत्न या जोरावर तीन महिने सतत प्रयत्न करून उपडे पडून तो स्विमिंग शिकला. अहो सर्व सामन्यांना 200 मीटर बॅक स्ट्रोकला दोन ते चार मिनिट लागतात तर याला 35 मिनिटे लागत होती. यामागील एकच उद्देश हार मानायची नाही आणि किमान आपले कमरे वरील शरीर कार्यरत करायचे आणि त्याचा परिणाम असा झाला कि त्याच्या हाताच्या दहा बोटांपैकी एक बोट कार्यरत झाले जो तो लिखाणासाठी वापरू लागला. उजच्या हाताचा खांदा त्यातल्या त्यात कार्यरत केला, मान हलकीशी वळवू लागला आणि पाणी पिण्यासाठी कसाबसा मग उचलणे, कसेबसे जेवण घेणे, स्वतःची काही आवश्यक कामे कशी बशी मॅनेज करणे अशा प्रक्रिया सुरु झाल्या. चार वर्षानंतर त्याच्यात वरील बदल झाला आणि यापुढे आणखी खास काही बदल होणार नाही हे त्याला समजून चुकले. मग करायचे काय तर सर्वप्रथम डाव्या हाताच्या मधल्या बोटाच्या साह्याने 8 वी ते 12 वी पर्यंतच्या गणित विषयाच्या सर्व नोट्स काढल्या आणि हळूहळू मुलांचे घरातच क्लास सुरु केले. आपल्या उदरनिर्वाहासाठी अशाप्रकारची धडपड करणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात तरी मी प्रथमच पाहिली. वीस वर्षे त्यांनी अशाप्रकारे क्लास चालवले आपला उदरनिर्वाहची तजवीज स्वतःच केली. मार्च 2020 अचानक कोव्हीड आला आणि क्लास बंद पडला आणि आर्थीक उत्पन्न ठप्प झाले. त्याचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर पोहचले एवढेच समाधान याला मिळाले कारण अल्प फी मध्ये कुटुंब चालवले बँक ब्लॅन्स नाही वाढवला. त्यामुळे अर्थार्जनाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला. मागील दोन वर्षांपासून फक्त चार स्टुन्डस त्यांच्याकडे येत आहेत ज्यामुळे त्याला स्वतःसह वयस्कर आईवडिलांना (80-75 वय) सांभाळणे अवघड होत आहे. मागील 32 वर्षांपासून तेच त्याची सर्व काळजी घेत आहेत पण पैशाच्या टंचाई मुळे आलेल्या अपंगत्वामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुदैवाने आईवडील सध्या तरी स्वतःची कामे स्वतः करतात पण पुढे काय हा एक प्रश्न त्याला सतत सतावत आहे.
बुद्धीच्या जिवावर दोन पैसे मिळवण्यासाठी याची धडपड चालूच आहे कारण तो हार मानणाऱ्यांपैकी नाही. कोवीड नंतरच्या काळात राम आणि शुभदा चिंचलीकर या जोडप्याने स्वतः व त्यांच्या मित्रांच्या साह्याने त्याला विविध मार्गाने सहकार्य केले आहे पण या स्वाभिमानी मित्राचे ध्येय सुद्धा मोठे आहे. तो विविध विषयांवर अप्रतिम लिखाण करत असल्याने त्याचे एफबी वर चांगलेच फॉलोअर्स आहेत पण पैशाचे काय? लाईक कॉमेंट ने पोट भरते का? अफाट इच्छाशक्ती आणि तुफान आत्मविश्वास या जोरावर विक्रम पुन्हा फिनिक्स प्रमाणे उभारी घेऊ इच्छितो. त्याला तुमच्या माझ्या सहानुभूतीची गरज नाही. त्याला गरज आहे आपल्या सर्वांच्या मानसिक आणि सामाजिक आधाराची. हा मित्र कन्टेन्ट रायटर आणि ट्रान्स्लेटर या क्षेत्रात उतरला आहे. आपण आपल्या नेटवर्क , कॉन्टॅक्टस चा वापर करून त्याला काम उपलब्ध करून देऊ या….त्याच्या पंखांना बळ देण्याचे काम करू या.
मी माझ्या सोशल मिरर तर्फे कन्टेन्ट रायटिंग ची छोटीशी असाईनमेंट देऊन आलो आहे. माझा मुलगा जयवर्धन आणि सोशल मिरर डायरेक्टर सुद्धा त्याच्या कामाला प्रोत्सान देऊ इच्छितो. तुम्ही सुद्धा ठरवा विक्रमसाठी तुम्ही काय करू शकता?
(आपण इतके प्रबळ आणि सक्षम आहोत तरी सबबी सांगतो आणि हार मानतो. पण या मित्राने शिकवले कि जगात कितीही संकटे येऊ तुम्ही त्यावर मात करून कोणतेही ध्येय आत्मसात करू शकता. या मित्रामुळे माझ्यातील आत्मविश्वास बळावला आणि निघताना सॅल्यूट ठोकून बाहेर पडलो. अशा व्यक्तींची गाठ घालून देऊन देव मला खूप काही सांगून गेला. )
रवींद्र वायाळ : मुख्य संपादक, सोशल मिरर.