पिंपल्स आणि होमिओपॅथी

Share

सप्रेम नमस्कार,

आज ह्या विषयावर लिहावेसे वाटले कारण, चार दिवसांपूर्वी ही तक्रार घेवून एक मुलगी ओपीडी ला आली होती. आणि काही केल्या तिचे विचार मनातून जात नव्हते. गेल्या ७/८ वर्षांपासून पिंपल्स च्या त्रासाला आणि तात्पुरत्या आराम देणाऱ्या उपचाराला ही मुलगी कंटाळली होती. आपला चेहरा खराब दिसतो, आपल्याच चेहऱ्याचा तिरस्कार वाटतो म्हणून चक्क अनेक महिन्यांपासून ती आरसा देखील बघायचे टाळत होती. ” सुंदर मी होणार ” म्हणण्याच्या वयात चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, फोड,त्याचे डाग किंवा जुन्या फोडांमुळे पडलेले छोटे छोटे खड्डे हे आत्मविश्वास कमी करून निरशेला आमंत्रण देतात. कुणी सांगेल तो उपाय करण्याच्या धडपडीत, काही अघोरी प्रयोग करून चेहऱ्याचे अजुन नुकसान होते. आजच्या ह्या लेखात आपण मुरूम अर्थात पिंपल्स बद्दल माहिती घेणार आहोत. आपली त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. त्यामुळे त्वचा हा फक्त सौंदर्याचे मापदंड नसून आरोग्य दर्शविणारा आरसा आहे. आपले आरोग्य शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्हींचा अंदाज आपल्या त्वचेवरून लावता येतो. आणि विशेष करून चेहऱ्याची त्वचा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य भाग आहे. त्वचेची रचना बघितली तर लक्षात येते की, त्वचेच्या रचनेतील एक मुख्य घटक म्हणजे तैलग्रंथी ह्या स्निग्ध पदार्थ ( सीबम ) स्त्रवणाऱ्या ग्रंथी संपूर्ण शरीरावर आच्छादलेल्या असतात. ( तळपाय आणि तळहात सोडून) चेहरा, त्यातही नाक, कपाळ, पाठ येथे त्यांचे प्रमाण जास्त असते. ह्या ग्रंथिंमधून स्त्रवणारा पदार्थ म्हणजे सीबम चेहऱ्याची आर्द्रता टिकवून ठेवतो आणि त्वचेला जंतू संसर्ग होवू देत नाही. चेहऱ्यावर येणारी पुरळ बऱ्याचदा साधी शारीरिक प्रतिक्रिया देखील असू शकते. तरुण्यावस्थेत तसेच सर्वसाधारण शारीरिक प्रतिक्रियेत देखील तैलग्रंथिंचा आकार वाढतो आणि त्यातून स्त्रावणाऱ्या तेलाचे देखील प्रमाण वाढते. पण काही कारणाने जर हेच प्रमाण दीर्घकाळ चालले तर सूज आलेल्या ग्रंथिंमध्ये बदल होतात. आता मुरूम किंवा पिंपल्स कसे तयार होतात हे बघुयात. बारीक धूळ किंवा जीवाणू चेहऱ्याच्या संपर्कात आल्यावर नैसर्गिक तेल किंवा सीबम त्यास प्रतिरोध करते. जिथे चेहऱ्यास हानी पोहोचू शकते तिथे तेलाचे प्रमाण वाढते आणि ग्रंथीला सूज येते. हा संसर्ग इतर ठिकाणी पोहोचू नये म्हणून तिथेच त्याला अटकाव केला जातो संसर्गाचा नाश केला जातो व ह्या प्रक्रियेत तिथे पुळी किंवा मुरूम तयार होतो. ग्रंथीला संसर्ग झाल्याने सूज देखील वाढते. ही वाढलेली सूज जास्त काळ अशीच राहिल्यास शेजारी शेजारी असलेल्या ग्रंथी आकाराने वाढून मोठी गाठ देखील तयार होवू शकते. ज्याला सिस्ट नसे म्हणतात. सुरुवातीला अशा पुळीमध्ये धूळ, जीवाणू, पांढऱ्या रक्तपेशी आणि नैसर्गिक तेल असते. जास्त काळ राहिलेल्या संसर्गाने तेथे पू तयार होवून पिंपल्स तयार होतात. मुळातच तेलकट त्वचा, डोक्यातील कोंडा, सौंदर्य प्रसाधनं ह्यांचा अतिरेकी वापर, वयात येताना तसेच पाळीच्या आधी किंवा नंतर शरीरात हॉर्मोन्स च्या पातळीत होणारे बदल, सदोष जीवनपद्धती, चुकीचा आहार, पचनाच्या तक्रारी आणि मानसिक ताणतणाव ही सर्व करणे स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे पिंपल्स येण्यासाठी कारणीभूत आहेत. होमिओपॅथिक उपचार प्रणालीत पिंपल्स चा प्रकार, त्यात होणाऱ्या वेदना, चेहऱ्यावर विशिष्ट ठिकाणी येण्याची जागा, त्याच प्रमाणे ह्या सोबत चयापचयक्रियेत असलेले अडथळे देखील दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. चेहऱ्याची स्वच्छता राखणे त्यासाठी स्वतःचा स्वतंत्र रुमाल किंवा टॉवेल वापरणे गरजेचे आहे. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी दिवसातून किमान ४ते५ वेळा चेहरा स्वच्छ धुवावा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेस वॉश किंवा औषधी साबण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावे. सौंदर्य प्रसाधने कमीत कमी वापरावी. त्वचेची आद्रता टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. आणि सर्वात महत्वाचे नख लावून मुरूम फोडू नये त्यामुळे नैसर्गिक प्रकियेत अडथळा येतो आणि डाग व खड्डे यांचे प्रमाण वाढते. समतोल आहार, ऋतूनुसार फळांचे सेवन, तेलकट मसालेदार पदार्थाचे कमी सेवन आणि योग्य ती औषधे परिणामकारक बदल घडवून आणतात. आपल्या आरोग्याची, आपल्या त्वचेची काळजी घ्या. स्वतःचा नितळ चेहरा आरशात बघण्याचा जरूर आनंद घ्या…

पुढील लेखात नवीन विषय घेऊन भेटायला येते, तो पर्यंत….

कळावे, लोभ असावा….

डॉ. सौ. नीलम दीपक गायकवाड.
एम. डी. ( होमिओपॅथी)
एम. एस. ( कौंसेलिंग )