sm logo new

स्मशानभूमी – जीवन शिकण्याची जागा.

Share

Latest

स्मशानभूमी – जीवन शिकण्याची जागा.

मित्रांनो नमस्कार. थोडा पेशन्स ठेऊन शेवटपर्यंत ही पोस्ट वाचावी ही नम्र विनंती. पोस्ट खूपच मोठी आहे. जीवनाशी निगडित असलेल्या विषयांवर माझे जास्त लिखाण असते. माझी फेसबुकवॉल स्क्रोल केल्यास लक्षात येईल. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या विषयावर लिहायला आवडते. प्रत्येकाची लेखनशैली, स्टाईल ही ठरलेली असते. तर मित्रांनो आजचा विषय आहे “स्मशानभूमी,जीवन शिकण्याची जागा”. शाळा कॉलेजमध्ये जीवन जगण्यासंदर्भातील किती गोष्टी सिरीयसली शिकवल्या जातात हा चर्चेचा विषय. तुम्ही म्हणाल काय हो, असला कुठे विषय असतो का हो ?? स्मशानभूमी शब्द नको वाटतो हा. असलं निगेटिव्ह लिखाण नको हा !!

जेंव्हा चार चौघे जीवनावर गप्पा मारत असतात. तेंव्हा काही ऐकलेली जीवनाबद्दलची रुबाबदार वाक्ये खालीलप्रमाणे : –

1)जीवन कसं मस्त जगायचं,
2)नो टेन्शन बॉस – जिंदगी मे टेन्शन लेनेका नही तो देनेका,
3)जीवन कसं हलकेफुलके जगायचं,
4)आलेला दिवस किंवा क्षण कसा मस्त एन्जॉय करायचा,
5)इच डे इज माय डे,
6)कल का किसने देखा यार.
7)मन मारून जगायचे नाही डिअर.

म्हणजे त्यांच्या आवाजाचा टोनही खूप आत्मविश्वासाचा असतो हो. वयोगट कोणता असेल याचा अंदाज तुम्हीच लावा.

तर अशा काही पॉप्युलर भारी फ्रेजेस, वाक्ये आपण नेहमी ऐकतो आणि बोलतोही. म्हणजे कसं ना की, ही वाक्ये बोलायला आणि ऐकायला लई भारी वाटतं. जीवनाबद्दल खूपच ज्ञान दर्शवणारी अशी ही रुबाबदार वाक्ये हो.
(वरती लिहिलेली 1 ते 7) निदान शहरात तरी ही वाक्ये बोलली जातात, कारण सर्व कसं इझीली मिळतंय, खूप रेलचेल आहे, करमणूक आहे, हॉटेलिंग, औटिंगला जाणे, मौजमस्ती करणे, मित्रांबरोबर गेट टू गेदर्स, इत्यादी इत्यादी. पण या गोष्टी तालुक्याच्या ठिकाणी किंवा खेडेगावात सहजपणे उपलब्ध नसतात. ( इच्छा असली तरी उपभोगता येत नाहीत ). माझी जवळजवळ 30 वर्षे बँकेतील नोकरी, ही खेडेगावात आणि तालुक्याच्या ठिकाणी झाली आहे. आयुष्य कसं खच्चून, ठासून आनंदाच्या क्षणांनीच जगले पाहिजे हे माझे स्वतःचे ठाम मत आहे. प्रत्येक जण त्याच्या परीने तसं जगण्याचा प्रयत्न करत असतो. जेंव्हा मी नेहमीप्रमाणे आजूबाजूला बघतो तेंव्हा वास्तव जीवनात किती जणांच्या वाट्याला वर नमूद केलेली ( 1 ते 7 )
रुबाबदार वाक्ये कायमस्वरुपी आलेली असतील हा माझा प्रश्न?? याचं उत्तर तुम्हीच द्या. मला विचाराल तर वास्तव जीवन जगणे, तेवढं सोयीस्कर, सुखकर, सुखमय राहिलेले नाही. हे मी सर्वसामान्य लोकांबद्दल बोलतोय. रोजच्या जीवनात, नोकरीत खूप मानसिक ताण, स्ट्रेस, पॉलिटिक्स आहे, आपला व्यवसाय, आपल्या घरातील प्रोब्लेम्स, घरातील माणसांच्या आरोग्यासंदर्भातील तक्रारी आणि त्यावरील न परवडणारा खर्च, सिनियर सिटीझन्सच्या समस्या, मुलांच्या शिक्षणावरील खर्च, महिलांच्या समस्या, अश्या कित्येक गोष्टी आपल्या सर्वांच्या जीवनात आहेत. प्रत्येकाच्या ताटात काहीतरी वाढून ठेवलेलं आहेच. या सर्व गोष्टी असूनही माणूस सकारात्मक वृत्ती ठेऊन आयुष्य काढत असतो हे नाकारता येणार नाही आणि जे वास्तव आहे त्यापासून माणूस पळूनही जाऊ शकत नाही.

मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात कुणाच्या ना कुणाच्या निधनाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जात असतो. मी नेहमी म्याटरनिटी होमला “स्टारटिंग पॉईंट” आणि स्मशानभूमीला ‘डेस्टिनेशन पॉईंट” असे संबोधितो.

माझी आई वय 82, ही सोलापूरला नोव्हेंबर 2020 मध्ये स्वर्गवासी झाली आणि आता वडिलांना 16 जून 2022 रोजी इथे माझ्याकडे पुण्यात वृध्दापकाळाने देवाज्ञा झाली. त्यांचे वय 89 होते. एक न भरून येणारी कायमची पोकळी निर्माण झाली. दुःख स्वीकारणे हेच एक औषध.

माणूस देवाघरी गेल्यानंतर त्याच्या नातेवाईक , मित्रपरिवार यांना अंत्यसंस्कार होईपर्यंतची जी काही शासकीय नोंदणी, फॉर्म्यालिटीज करायच्या असतात, त्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्या शिवाय अंत्यसंस्कार होऊ शकत नाहीत. स्मशानभूमीत वातावरण कसे असते हे सर्वांनाच माहिती आहे. अशा वेळी मनात दुःख तर असतेच पण माझ्या मनात जीवनाविषयीच्या विचारांची खळबळ चालू असते. सगळं सोडून जायचंय हा विचार सर्वांच्याच मनात येतो. ( निदान त्या क्षणी तरी ) मी जेंव्हा जेंव्हा स्मशानभूमीत जातो तेंव्हा तेंव्हा हे जीवनाविषयीचे विचार उफाळून येतात आणि हे उफाळून आलेले विचार म्हणजेच आजची ही पोस्ट किंवा व्यक्तव्य होय. आयुष्यात दबलेले विचार माझ्या वडिलांच्या निधनाने बाहेर आले.

जी सृष्टी या भूतलावर आहे तिचा विचार केला, तर आपल्या जीवनाचा लाइफ स्पॅन हा खूपच कमी आहे. आपल्या देहाचा जर विचार केला तर या विशाल सृष्टीपुढे आपलं अस्तित्व दाखवणारी जागा म्हणजे स्मशानभूमी अशा या छोट्याशा आयुष्यात आपण कोणत्या शब्दावर जास्त प्रेम करतो तर मी या शब्दावर. आम्ही या मी च्या गर्तेत एवढे अडकलो आहोत की, आयुष्य काय आहे किंवा असते हे थोडंफार विसरलो आहोत. हा मी पणा जरूर असावा पण किती असावा याला थोडी मर्यादा हवी. हा मी कधीतरी संपणार आहे हे ध्यानात हवे. माझी कार,माझा बंगला,माझे प्याकेज, माझी आयडेंटिटी, रेकग्निशन, ( यात मीही आलो हं ) भौतिक गोष्टी मिळवण्यात जीव अडकलाय / गुंतलाय इत्यादी इत्यादी. आयुष्यात आपण कसे जगतो, इतरांशी कसे वागतो, किती सूडबुद्धीने वागतो, हेवेदावे, गैरसमज, मग्रुरीने वागतो, दांभिकपणे वागतो, संशयी स्वभाव, बेभानपणे कसेही वागतो, बोलतो की, आपण दुसऱ्याला शारीरिक आणि मानसिक दुःख काय होईल याची पर्वाही करत नाही. पैसा, स्टेटस, पोझिशन, नेम अँड फेम, मिळवलेली संपत्ती, स्थावर मालमत्ता यामुळे आलेली जी एक अहंभावाची वरची पट्टी आहे, ती या स्मशानभूमीत नष्ट होते. अर्थातच एका लाईटच्या बटणाने. संपत्ती किती आणि कोणत्या पद्धधतीने मिळवलेली असते हे ज्याचे त्यालाच माहीत असते. एका क्षणात डोळ्यांदेखत शारीरिक अस्तित्व नष्ट होतं, ते ठिकाण म्हणचे स्मशानभूमी. तिथे गेल्यावर कमीतकमी एवढा तरी विचार जरूर करायला हवा की,“अशी वेळ ही माझ्यावरही येणार आहे”

मग हे सर्व ज्ञान आपल्याला ज्ञात असताना आपण इतरांशी किती सलोख्याने वागतो?? हा प्रश्न. माणसे म्हणा, नातेसंबंध म्हणा,
माणसे जोडण्याची हल्लीच्या काळातील तंत्रज्ञानाची साधने जरी वाढली तरी कुठेतरी आपण कमी पडतोय का?? विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे?? यावर विचार व्हायला हवा असं म्हणण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे मला वाटते. माणूस परिस्थितीनुसार वागतो, बदलतो हे मी समजू शकतो.

आपण नेहमीच म्हणतो की, आयुष्य हे क्षणभंगूर आहे. या छोट्याशा जीवनाचा जर विचार केला तर, या सर्वांची उत्तरे या स्मशानभूमीत मिळतात. स्मशानभूमीतून बाहेर पडताना एक प्रगल्भ विचार घेऊन बाहेर पडा, मी कसा आहे, कसा वागलो यापेक्षा मी आहे त्यापेक्षा अजून छान कसा वागू
शकतो, यावर विचार करा. विचारांची आणि मनाची खिडकी ही नेहमी मोठया साईजची पाहिजे. संकुचित विचारसरणी सोडायला हवी. पुढील आयुष्यात बघा, आतून किती फ्रेश वाटेल. विचारांचा प्रवाह नी दिशा बदलेल. आयुष्य जगण्याची जी एक आणि एकच संधी आहे, तिचे चीज होईल यात शंकाच नाही. मिळालेलं आयुष्य हे एकदाच आहे, सो नो मोअर चान्स फ्रेंड्स. प्लीज रिथिंक ओव्हर इट. जीवनातील कोणताही क्षण हा कॉपी पेस्ट होत नाही हे आवर्जून सांगतो. आलेला प्रत्येक क्षण हा नवीन आहे. एन्जॉय लाईफ टू द फुलेस्ट. पोस्ट ही सकारात्मक विचारांची आहे. तुमची मते ही वेगळी असू शकतात हे मी जाणून आहे. तुमचे उर्वरित आयुष्य हे निरामय, निरोगी नी आनंदमय जावो हीच माझी सदिच्छा. ऑल द बेस्ट.

पोस्ट आवडली असल्यास जरूर शेअर करा. जर कंमेंट केली तर ती इतरांनाही वाचायला मिळेल. सर्वांच्या ज्ञानात निश्चित भर पडेल यात शंकाच नाही. (फीडबॅक)

ही पोस्ट मी माझ्या आईवडिलांना श्रद्धांजली म्हणून अर्पण करत आहे. ओम शांती.

प्रमोद कुलकर्णी
निवृत्त बँक अधिकारी (एसबीआय)

FOR YOU