प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर झाल्या वायुदलात स्क्वाड्रन लीडर: विदुला अभ्यंकर

Share


अवकाशात गवसणी घालायची असेल तर पंखातच बळ लागते. जगात सहज काहीही मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला नियोजन करावे लागते. अडथळे, समस्या, संकटे येणारच आहेत पण तुमच्यात आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यश सुद्धा तुम्हाला शरण येते. स्क्वाड्रन लीडर विदुला अभ्यंकर या वायुदलातील महिला अधिकाऱ्याने लहानपणी बघितलेले स्वप्न अनेक संकटांवर मात करून पूर्ण केले आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीने वायुदलात आपला वेगळाच ठसा उमटविला.
विदुला अभ्यंकर हिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण औरंगाबादला झाले. वडील विनायक अभ्यंकर नेव्हीत एस. पी. ओ. असल्याने लहानपणीच तिला सेना दलाचे बाळकडू पाजले गेले. अशक्त असल्याने तुला सैन्यदलात जायला जमणार नाही असे तिच्या जवळच्यांकडून बोलले गेले पण विदुलाने आईवडिलांना आश्वासन दिले, कि मी कोणत्याही परिस्थितीत सैन्य दलात अधिकारी म्हणून जाणारच. आपल्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास विदुला पुण्यात आली. स. प. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिने अभ्यास आणि खेळाबरोबर आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी स्ट्रीट प्ले, नाटके यांच्यामध्ये सुद्धा सहभाग घेतला. शारीरिक तंदुरुस्तीसठी तिने धावणे, पोहणे आणि रायफल शुटींगचे प्रशिक्षण घेतले. एकीकडे या सर्वात अव्वल असताना दुसरीकडे एन. सी. सी. मध्ये सुद्धा तिचा सहभाग तेवढाच नियमित होता ज्यामुळे तिची दिल्लीच्या रिपब्लिक डे परेड साठी निवड झाली होती. वर्गात ती सतत अव्वल असायची. तिने स. प. महाविद्यालयातून इंग्लिश विषयात विशेष प्रावीण्याने पदवी संपादन केली आणि पुणे विद्यापीठात एम. ए. सुद्धा प्रथम वर्गात पूर्ण केले. तसेच जगन्नाथ इन्स्टिट्यूट मधून ‘जिओपॉलिटिक्स आणि आंतराष्ट्रीय संबंध’ मध्ये डिप्लोमा कोर्स सुद्धा प्रथम क्रमांकाने पूर्ण केला.


सैन्य दलात जाण्यासाठी लागणाऱ्या सर्व पात्रता आणि कौशल्य तिने विकसित केले. त्यामुळे 2003 मध्ये अथक परिश्रमानंतर वायुदलात ग्राउंड ड्युटी ऑफिसर म्हणून तिची निवड झाली. काही महिन्यांच्या अत्यंत कठीण प्रशिक्षणानंतर तिची वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. ग्राउंड ड्युटी ऑफिसर हे वायुदलातील प्रशासन, शिक्षण विभाग आणि तांत्रिक विभाग यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवत असते. थोडक्यात वायुदलाची प्रशासकीय शाखा / अतांत्रिक शाखा होय. एअरमन ट्रेनिंग स्कुल,बेळगाव येथे 2006 मध्ये फ्लाईट लेफ्टनंट म्हणून कार्यरत असताना त्यांनी तेथील प्राथमिक शिक्षणामध्ये विशेष संचालिका पद भूषविताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले. संस्थेतील सामाजिक कार्यात त्यांचा सतत सहभाग राहिला आहे. एअरफोर्स अकादमी हैदराबाद आणि एअरफोर्स स्टेशन पाठाणकोट मध्ये स्क्वाड्रन लीडर असताना त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. त्यांनी येथे शिक्षण पद्धतीत बदल केले आणि मानवी संसाधने विकास यात मोलाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय विद्यालये आणि एअर फोर्स शाळांची मासिके यांचा पदभार असताना या माध्यमातून वैचारिक आणि माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध केले. पठाणकोट येथील मुलींच्या शाळेला आयएसओ नामांकन मिळवून दिले. त्यांच्या कारकीर्दीत पठाणकोट आणि डुंडीगल येथील शाळांनी एअरफोर्स शाळांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केले. वायुदलामध्ये कार्यरत असताना त्यांच्या विविध कामगिरी बद्दल गौरविण्यात आले आहे.


त्यांनी दहा वर्षानंतर वायुदलातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. सध्या त्या मिलिटरी इंटेलिजन्स यावर ब्लॉग लिहीत असतात आणि सेनादलातील निवडीसाठी आवश्यक असणाऱ्या एस. एस. बी. ची तयारी कशी करावी यावर मार्गदर्शन करत असतात. या एस. एस. बी. मध्ये ग्रुप टास्क, ग्रुप डिस्कशन, आकलनशक्ती, शारिरीक चाचणी, मानसिक चाचणी आणि मुलाखत ही महत्वाची असते. लहानपणापासून दैनंदिन पेपर वाचन, विविध विषयांवर गटचर्चा आणि व्यायाम केल्यास अशी परीक्षा सोपी जाते. त्या म्हणतात अनेक मुलींना सेनादलातील परीक्षेबद्दल माहिती नसते. सेनादलाचे करिअर खूप छान आहे. ग्रामीण भागातील मुलींनी या करिअर चा विचार करावा. यासाठी मार्गदर्शनासाठी त्या सदैव तयार असतात. सोशल मिरर कडून या उमद्या महिला अधिकाऱ्याला कडक सॅल्यूट आणि खूप खूप शुभेच्छा.