सांधेदुखी आणि होमिओपॅथी

Share

सप्रेम नमस्कार,

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हमखास करून वाढणाऱ्या तक्रारींमध्ये सांधेदुखीचा पहिला क्रमांक लागतो. आज ह्या लेखात आपण सांधेदुखी आणि त्यावरील होमिओपॅथिक उपचार यांची माहिती घेणार आहोत. सर्वात आधी सांधा अर्थात जॉइंट म्हणजे काय हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दोन किंवा त्या पेक्षा जास्त हाडे, त्यांना जोडणारे दोर ( लिगामेंट) एकत्र येवून सांधा तयार होतो. त्यात सांध्याचे देखील विविध प्रकार असतात. जसे उखळीचा सांधा, बिजागिरीचा सांधा. सांध्यांमधील हाडांची हालचाल सुलभ व्हावी म्हणून त्यात सायनोव्हीयल फ्लुईड नावाचा द्रव पदार्थ असतो. ही झाली सांध्याच्या बाबतीत ढोबळ माहिती. जेव्हा सांध्यांमध्ये वेदना होतात तेंव्हा सर्वसाधारणपणे त्या दुखण्याला संधिवात असे नामकरण केले जाते. परंतु सांधेदुखी आणि संधिवात ह्यात फरक आहे. ह्या दोन्हीच्या बाबतीत बऱ्याचदा गल्लत केली जाते. आता ह्या दोघांमधील फरक आपण लक्षात घेवूया. सांध्यांमध्ये वेदना अर्थात जॉइंट पेन ह्याला बरीच कारणे आहेत. सांध्यांना झालेले इजा, शारीरिक श्रम, प्रवास, नव्याने सुरू केलेला व्यायाम, स्थूलपणा, वयोमानानुसार सांध्याची झालेली झीज, थंड दमट वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम, शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी चे कमी असलेले प्रमाण, सांध्यांना झालेले इन्फेक्शन ह्या पैकी कुठल्याही कारणाने सांध्यांमध्ये वेदना होवू शकतात. सांधेदुखी ही उतारवयात जाणवणारी तक्रार आहे असाही काहींचा गैरसमज असतो. वरील कारणे पहिली असता लक्षात येते की सांधेदुखी ही कुठल्याही वयात जाणवू शकते. आता वैद्यकीय शास्त्राप्रमाणे संधिवात म्हणजे काय हे आपण जाणून घेवुयात. संधिवात हा “ऑटो इम्यून” गटात मोडणारा आजार आहे. ऑटो म्हणजे स्वतःची आणि इम्यून म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती. ह्या आजारात शरीराची रोगप्रतकारक प्रणाली ही “ऑटो” म्हणजे स्वतःच्याच शरीराला दुखापत करते. ही प्रणाली इतर अवयव आणि सांध्यांवरच हल्ला चढवून त्यात बिघाड करायला सुरुवात करते. सांध्याना सूज येवून, हालचाल करण्यास अडचण होते, सांधे समान प्रमाणात बाधतात ( दोन्ही बाजूचे सारखेच ) आणि सुजतात, हात लावल्यावर गरम वाटतात. सकाळी उठल्यावर सांधे कडक आणि अखडल्यासारखे वाटतात. एका जागेवरून उठून हालचाल करताना, पाहिले पाऊल टाकताना वेदना होतात. जिना चढ उतार करायला अडचण होते, मांडी घालून बसायला, दोन पायावर बसायला अडचण होते, रोजच्या हालचाली सुलभ होत नाहीत. यासोबत बऱ्याचदा कणकण येणे, ताप येणे, थकवा जाणवणे ही लक्षणे देखील आढळतात आणि विशेष म्हणजे हा त्रास जास्त करून तरुण लोकांना जाणवतो. ह्या सर्व लक्षणांच्या समूहाला म्हणायचे संधिवात अर्थात र्हुम्याटौइड अरथ्राइटीस. बऱ्याच रुग्णामध्ये सांध्यावर टोके फुटणे, त्वचेवर चट्टे येणे ही देखील लक्षणे आढळून येतात. रक्तातील आर. ए. फॅक्टर आणि सी. आर. पी. ह्या चाचण्या प्राथमिक निदान करण्यासाठी पुरेशा असतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्या आजाराचे प्रमाण जास्त असते. अनुवांशिकता, धूम्रपान आणि व्यसनाधीनता, हा आजार होण्याची शक्यता वाढवितात. वर उल्लेख केल्या प्रमाणे संधिवात हा रोगप्रतिकार प्रणाली मध्ये झालेल्या बिघाड किंवा रोगप्रतिकारक शक्तीच्या स्वतःच्याच शरीराचे नुकसान करण्याच्या प्रवृत्तीमुळे तयार होतो. त्यामुळे उपचार करताना बिघाड झालेली रोगप्रतिकारक शक्ती ला चालना देणे आणि मोडिफाय करणे गरजेचे ठरते. प्रचलित उपचार पद्धतींमध्ये स्टेरॉएड्स, डेक्सा, मिथेल प्रेडनिसेलोन सारखी औषधे ही तत्काळ वेदना कमी करण्यासाठी वापरतात आणि तत्काळ आराम मिळण्यासाठी उपयुक्त देखील असतात. परंतु ह्यांचा जास्त काळ वापर हा अनेक साईड इफेक्ट्स ला आमंत्रण देतो. आणि त्यांचा फायदा हा औषधांचे सेवन असे पर्यंतच टाकतो. होमिओपॅथिक उपचार पद्धतीने उपचार करताना मुळात प्रत्येक रुग्णाचा वेगळा विचार केला जातो. रोग प्रतिकारक प्रणाली मध्ये बिघाड होण्यासाठी प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळे कारण असू शकते. पेशंट ची अचूक पास्ट हिस्टरी आपल्याला प्रत्येकाचे कारण शोधून देते. भूतकाळातील काही घटना, मनावरील आघात, जुने अपमान, फसवणूक, विश्वासघात, आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंग, मोठे संकट, सारख्या नकारात्मक भावना आणि विशेषतः जीवाला धोखा उत्पन्न करणारी भावना देखील रोग प्रतिकारक शक्ती च्या कार्यप्रणाली मध्ये बिघाड घडवू शकतात. जर हा बिघडच दुरुस्त केला तर आजार मुळापासून नक्कीच बरा होवू शकतो. आणि होमिओपॅथिक औषधे ह्याच संकल्पनेवर आधारित मूलभूत तत्वांवर काम करतात. आजराची सामायिक लक्षणे त्याच बरोबर रुग्णाची स्वतःची दुखण्यातील विशिष्ट लक्षणे, दुखणे कमी जास्त करणारे घटक, आणि दुखण्यात रुग्णाच्या मानसिकतेमध्ये होणारा बदल ह्या सर्वांचा एकत्र विचार करून होमिओपॅथिक औषध दिले जाते. ब्रयोनिया, बेलडोना, रुटा, ह्रस टॉक्स, लेडम पाल, कालमीया, कल्केरिया फॉस, डलकामारा, एपिस मेलफिका या सारखी अनेक औषधे त्यांच्या लक्षणांच्या विविधतेमुळे वेगवेगळ्या रुग्णांना फायदेशीर ठरतात. आणि मुळात ह्या औषधांचा कुठलाही साईड एफेक्ट होत नाही. दीर्घकाळ घेण्याची वेळ आली तरी सदर औषधे ही सुरक्षित असतात. व्यायाम, जीवनशैली मध्ये सुधारणा, सकस आहार आणि योग्य असे होमिओपॅथिक उपचार हे सांधेदुखी आणि संधिवात ह्या दोन्ही आजारातून रुग्णाची सुलभ रीतीने सुटका करू शकतात. सांधेदुखी मुळे अनेकांच्या आपल्या रोजच्या हालचाली करणे, व्यायाम करणे, फिरायला जाणे यांसारख्या अनेक गोष्टींवर बंधने येतात. एकाजागी बसून दुखणे वाढते आणि परावलंबत्व आल्याची भावना देखील वाढते. शारीरिक दुखण्यासोबत मानसिक रित्या देखील माणूस खचतो. वेदनाशामक गोळ्याघेण्याचाही कंटाळा आणि तात्पुरता आराम ह्यामुळे पदरी निराशा येते. रुग्णाचा सर्वतोपरी विचार करून दिली जाणारी होमिओपॅथिक औषधे अशा रुग्णांसाठी खरोखर संजीवनी ठरते.

सदर वातावरणात पौष्टिक आहार आणि व्यायाम ह्याच्या जोडीने आपल्या सांध्यांची काळजी घ्या….
तो पर्यंत, कळावे लोभ असावा!

डॉ. सौ. नीलम गायकवाड.
एम. डी. ( होमिओपॅथी)
एम. एस. ( कौंसेलिंग )