sm logo new

सिगारेट स्मोकिंग / धूम्रपान

Share

Latest

मित्रांनो नमस्कार,
हा विषय लिहिण्यामागचे कारण म्हणजे माझे रोज सकाळी नित्यनियमात असलेले मॉर्निंग वॉक. तसा मॉर्निंग वॉक आणि सिगारेट स्मोकिंग याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मग संबंध नाही तर ही पोस्ट कशी???हा प्रश्न आपल्याला पडला असेल. मित्रांनो मी आधी स्पष्ट करतो की मी सिगारेट स्मोकिंग करत नाही. मी का ही पोस्ट लिहितोय यावर विचार व्हावा, आत्मपरीक्षण व्हावे आणि त्यायोगे आपले आरोग्य उत्तम रहावे हा, या पोस्टचा मूळ हेतू आहे.

सीन नंबर 1 – त्याचं काय आहे, गेली 25 वर्षे मॉर्निंग वॉक करतोय, निरीक्षण करायची थोडी सवय मला. वॉक करत असताना, सिगारेट स्मोकिंग / धूम्रपान याबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने मनात येते ती म्हणजे, मी जेव्हा वॉक करत असतो, तेंव्हा काही मंडळी रस्त्याच्या कडेला एकटेच स्मोकिंग करत असतात, त्यांच्या नोकरीच्या बसची वाट बघत असतात, काही जणांच्या घरी स्मोकिंगची परवानगी नसते. पण घरच्यांना माहीत असते की हे स्मोकिंग करतात. त्यांना हे ही माहीत असते की हे बाहेर स्मोकिंग करतात. इथे मनात विचार येतो आणि आश्चर्य पण वाटते की, सकाळी सकाळी शरीर आणि मन दोन्ही फ्रेश असते तर स्मोकिंग करण्याची गरज भासावी???
काही जण ड्युटी करून ,नोकरी करून घरी जाण्याआधी एक सिगारेट घ्यायची नी मग घरी जायचे असा त्यांचा नित्यक्रम असतो.
काहीजण दिवसभरात घडलेल्या मानसिक तणावामुळे स्मोकिंग करतात, काहीजण रिलॅक्स व्हायचं म्हणून स्मोकिंग करतात.

आता सीन नंबर 2 – काही जण एकटे किंवा बरोबर मित्र असतील तर, मॉर्निंग वॉकच्या आकर्षक दिसणाऱ्या ड्रेसमध्ये ( म्हणजे कसं ना अगदी प्रॉपर सगळं, खाली स्पोर्ट्स शूज, स्पोर्ट्स पॅन्ट किंवा थ्री फोर्थ, टी शर्ट, सगळं कसं अगदी ब्रँडेड, दंडावर किंवा मनगटावर, ते किती चाललो, कॅलरीचे घड्याळ किंवा इन्स्ट्रुमेंट , एखादी छोटी पाण्याची बाटली इत्यादी ) म्हणजे कसं हेल्थ कॉन्शस हो. त्यांचं मॉर्निंग वॉक झालेलं असतं. मग आता त्यांच्या नेहमीच्या कट्ट्यावर / टपरीवर, चहा किंवा ब्रेकफास्ट करून नंतर सिगारेट आणि गप्पा, असा तो माहोल असतो. मनात विचार येतो की, फुप्फुसात शुद्धध हवा जावी म्हणून व्यायाम करायचा आणि त्याची सांगता स्मोकिंग करून ??? कसं वाटतं ते ??? हे करत असताना आपण दुसऱ्याचंही आरोग्य खराब करत असतो.
पण हे सत्य चित्र आहे.

सीन नंबर 3 – काही तरुण / तरुणी, स्मोकिंग करत असलेले बघतो आणि मनात विचार येतो की, अजून यांचं आयुष्य जायचंय, कसं होणार पुढे ??? यांच्या आई वडिलांना हे माहीत नसते की ही मंडळी काय करत आहेत. कुणाला सांगणार?? असं वाटतं की या मुलांना सांगावे की स्मोकिंग करू नका पण आजकाल चांगला सल्ला दिलेलाही आवडत नाही. बघत रहाणे.

सबब सांगणारे सांगतात की, मी जास्त नाही, सकाळी एक आणि संध्याकाळी एक, अशा दोनच सिगारेट घेतो. म्हणजे सांगतानाचा अविर्भाव असा असतो की, माझा मनावर किती ताबा आहे. असं असलं तरी,रोजच्या 2, याप्रमाणे महिन्याच्या झाल्या 60 सिगारेट्स.

व्यसन हे कोणतेही वाईटच. ते त्याचा त्याचा इंगा आयुष्यात जेंव्हा वेळ येईल तेंव्हा दाखवतेच हे निर्विवाद सत्य आहे. सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असते की सिगारेट स्मोकिंग हे शरीरास घातक आहे, पण आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. याबद्दलची माहिती ही, सरकारतर्फे, आरोग्य मंत्रालयातर्फे सगळीकडे प्रदर्शित केली जाते. अगदी चित्रपटगृहात चित्रफितीद्वारे. त्यात त्याचे दुष्परिणामही दाखवले जातात.

मग एवढं सगळं माहीत असताना, आपण आपली तब्येत या सवयीमुळे का कमकुवत करून घ्यायची, हा माझा प्रश्न?? काय मिळते त्या स्मोकिंगने ?? जर काही गंभीर आजार झाला तर आपल्या कुटुंबावर काय बेतेल याचा विचार व्हावा.

कसं असतं, आपलं शरीर जोपर्यंत अंगात या सवयी सहन करण्याची क्षमता आहे तोपर्यंत सहन करते, पण एकदा का त्याची रेषा ओलांडली की, शरीर त्याचा उद्रेक दाखवतेच. जर काही झालं तर, हॉस्पिटल बिल आपण कसे भरतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही असे मला वाटते. सगळा शारीरिक आणि मानसिक ताण आणि त्रास. म्हणणं असं की, आपल्या या सवयीमुळे आपल्याला आणि कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक चिंतेत का घाला ??? मला कोणावरही टीका करायची नाही आहे, पण एक अवेयरनेस यावा याकरता ही पोस्ट लिहिली आहे.

मूळ हेतू आपल्या सर्वांचे आरोग्य उत्तम राहो हीच मनातील सदभावना.

प्रमोद कुलकर्णी
निवृत्त अधिकारी,
एस बी आय बँक

FOR YOU