sm logo new

सोशल मीडिया – मन आणि व्यक्तिमत्व विकास

Share

Latest

सोशल मीडिया – मन आणि व्यक्तिमत्व विकास

मित्रांनो नमस्कार

मित्रांनो या पोस्टमधील विचार हे माझ्यासाठीही लागू आहेत. मी ही पोस्ट लिहितोय म्हणजे मी फार मोठा, असं काही दाखवायचं नाही आहे. कधी कधी खूप आश्चर्य वाटते, की लोक फेसबुकवर, व्हॉट्स ॲपवर, कोण काय करतंय, कोण कोणाच्या पोस्ट्स, फोटोंवर लाईक, कमेंट जास्त करत आहेत?? यावर बारकाईने लक्ष ठेवतात. काही पोस्ट या अशा असतात की, त्यातून आपण सतत फोकस मधे कसे राहू किंवा रहाता येईल हे प्रकर्षाने जाणवते. मग ती पोस्ट किती अर्थपूर्ण असते किंवा नाही यावर न बोललेले बरे.

मग ठराविक म्हणजे सुंदर, छान, आकर्षक अशा फोटोंवर, रिल्सवर, इंस्टावर, लाईक, कमेंट्स करत असतील तर तो / ती कशा स्वभावाचा असू शकतो / शकते ??? खूपच लक्ष असते हो, कमाल आहे त्यांच्या बौद्धिक विचार विस्ताराची.

व्हॉट्स ॲप DP कोण किती वेळा बदलतं, कोण जास्त बघतं?? व्हॉट्स ॲप स्टेटस, यावरून स्वभाव अनुमान काढण्याचा निकष.

मग कोणत्या कोणत्या गृपवर कोण कोण आहे?? त्यात कोणाचे कोणाबरोबर जास्त जमते?? किती ( संख्यात्मक) आणि कोणते मित्र जास्त ॲक्टिव्ह असतात?? त्या ग्रुपमधे एवढे हजार मित्र, तर त्या ग्रुपमधे एवढे हजार. मनात प्रश्न पडतो, आपण खरंच येवढ्या लोकांशी वास्तव जीवनात एकमेकांशी संवाद, संपर्कात राहू शकतो का?? समाजोपयोगी कार्य करण्यासाठी हे ग्रुप्स निश्चितच चांगले असतात.

व्हॉट्स ॲप ग्रुपमधे लाइक्स, बदाम वाटप कोण कोणाला जास्त देते, कोणाच्या पोस्ट्सवर कोण बोलतो, बौद्धिक गप्पा तर अशा की नुसती चढाओढ असते. मग सगळे आपापले उपजत ज्ञान शेअर करतात, मी कसा/ कशी हुशार, ही सांगण्याची भावना त्यात असावी. यात मी काही अपवाद नाही, मी ही असतोच.असे ज्ञान शेअर करणे यात गैर असे काहीच नाही. एखाद्या पॉइंटवर शास्त्रोक्त मुद्देसूद उत्तर / माहिती आणि ती ही विस्तृतपणे, कशी क्षणात येते, हे केवळ अनाकलनीय. खरंच दिव्य आहे. मनात कधी कधी असंही वाटतं की हे गुगल बाबा कडून तर आले नाही ना??

दुर्दैवाने अशी स्थिती आहे की फोटोंवर लाइक्स, कमेंट्स जास्त असतात, आणि ज्या खरोखर वैचारिक पोस्ट्स आहेत / असतात त्यावर कोणीही अभिप्राय देत नाहीत. काही मित्रमंडळींची खरोखर वैचारिक / अनुभवसिद्ध क्षमता असताना देखील त्यांचे अभिप्राय अशा वैचारिक पोस्टवर नसतात.

आपण म्हणताना म्हणतो, मी खूप बिझी असतो, पण जर काही न पटणारा मुद्दा कोठेही
सोमी वर असेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मन कसं असूसलेलं असतं आणि ती व्यक्त झालेली प्रतिक्रिया ही इतरांनी मान्यच करावी ही मनाची सुप्त इच्छा असते. अशा गोष्टींसाठी आपण आवर्जून वेळ काढतो. एक प्रकारे आपण आपला विचार, मत, दुसऱ्यावर इन्सिस्ट करत असतो. मानसिक लवचिकता कमी झाली असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

या सोमी मुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. एखाद्या न पटलेल्या गोष्टींमुळे नातेसंबंध दूर झालेले आपण पहात असतो.

आपल्या मनाला एवढे पळवलं जातंय, बापरे, कल्पना करवत नाही. आपल्या आयुष्याचा विचार केला तर हे असे पळवणे खरंच गरजेचे आहे का ??? प्रवाहाप्रमाणे जावे लागते हेही सत्य आहे, पण पळवायचे किती?? त्यालाही मर्यादा आहेत. बाह्य परिस्थिती अशी आहे की ती आपल्याला हल्लीच्या प्रवाहात नाईलाजाने किंवा अप्रत्यक्षपणे खेचती आहे असे दृश्य आहे. याचा दूरगामी परिणाम आयुष्यावर नंतर नक्कीच होतो. या सोमी मुळे रोजच्या शारीरिक व्यायामाकडे, आहाराकडे, रोजच्या वेळेच्या नियोजनामध्ये, दुर्लक्ष होत आहे का?? यावर विचार करणे आवश्यक आहे.

खरं तर या सोशल मीडियाचा एक सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर इतका छान झाला की, या सोमि ने आपल्या सर्वांची निरीक्षण शक्ती अफाट म्हणजे अफाट वाढवली. बुध्यांक अफाट वाढला. हजरजबाबीपणाचे तर जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मनातील विचारांचे प्रगटीकरण करता येणारे असे हे वेगवगळे प्लॅटफॉर्म. असा हजरजबाबीपणा आणि निरीक्षण शक्ती कदाचित कोणत्याही व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळेने (वर्कशॉप) आली नसती. आपल्यामधे असलेल्या कलागुणांना वाव मिळेल अशी जागा म्हणजे सोमी. व्यवसाय वृध्दी होण्याचे ठिकाण म्हणजे सोमी. काही खरोखर ज्या चांगल्या गोष्टी आपण समाजासाठी वैयक्तिक पातळीवर करू शकत नाही त्या आपण या सोशल मीडियाच्या ताकतीवर यशस्वीपणे करू शकतो. अशी कितीतरी ,असंख्य उदाहरणे आहेत. ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. समाजोपयोगी विधायक कार्य करण्याची जागा म्हणजे सोशल मीडिया. मी या सोमि च्या माध्यमातून खूप चांगली माणसे मिळवली आहेत. त्यात एक मानसिक आनंद असतो.

मेसेज :- एकमेकांचा आदर ठेवा. मनाला लवचिक ठेवा. मी ही चूकू शकतो हे लक्षात असू द्या. प्रत्येक गोष्टीत तंतोतंत बघू नका. संकुचित वृत्ती नको. जर एखादी समाजोपयोगी गोष्ट असेल त्याला सपोर्ट करा. (जमेल तेवढी आणि शक्य असेल तेव्हढी आर्थिक मदत करायला हरकत नाही). एकमकांसोबत असण्याने आपले व्यक्तिमत्व खुलते हे लक्षात ठेवा. लोकसंग्रह वाढवा. मनाची प्रगल्भता असावी

शुभेच्छा. वीकेंड आहे तर मजेत घालवा. सोमवारपासून आहेच की बिझी रूटीन.

प्रमोद कुलकर्णी
निवृत्त अधिकारी (एस बी आय )

FOR YOU