उन्हाळा संपत आला आहे. खरीप हंगाम सुरु होत असताना शेतीची कामे वेग घेत आहेत. पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सोयाबीन, टोमॅटो सारख्या पिकांचे नियोजन करतो आहे. परंतु हे सर्व करत असताना एक महत्वाची बाब शेतकरी विसरताना दिसतो आहे. ही लक्षात नाही घेतली तर पीक उत्पादनावरती नक्कीच नकारार्थी परिणाम होऊ शकतो. शेती करत असताना पिकांबरोबरच मातीचे आरोग्य, मातीची निघा राखणे तितकेच महत्वाचे. मातीला काय हवं आणि काय नको? याकडे शेतकरी म्हणून आपण लक्ष द्यायलाच हवे. परंतु मातीला काय हवे हे आपल्याला कसे कळणार? त्यासाठी मातीची चाचणी करायला हवी, ज्यालाच आपण “माती परिक्षण(Soil Testing)” असे म्हणतो.
माती परिक्षण म्हणजे काय?
आपले आरोग्य तपासण्यासाठी आपण डॉक्टरकडे जाऊन वेगवेगळ्या टेस्ट करत असतो. तसेच मातीचे आरोग्यही आपण वेळोवेळी तपासून घेतले पाहिजे. मातीचे आरोग्य तपासून घेणे म्हणजेच माती परिक्षण. माती परिक्षण Soil Testing laboratory मध्ये करावे लागते. ज्या Labs प्रत्येक तालुक्यात किंवा जिल्ह्यात उपलब्ध असतात किंवा KVK म्हणजेच कृषी विज्ञान केंद्र स्थापन केलेले असतात. जिथे आपण आपल्या मातीचे नमुने तपासून घेऊ शकतो.
मातीला स्वतःचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म आहेत. हे गुण प्रामुख्याने मातीच्या पृष्ठभागाच्या आत होणाऱ्या विविध क्रियांसाठी जबाबदार असतात.ज्यांचा संबंध थेट जमिनीच्या सुपीकतेशी असतो. हे सर्व गुणधर्म ठीकठाक आहेत कि नाही? हे माती परिक्षणातून आपल्या लक्षात येते. यासाठी मातीचा pH, EC (Electrical conductivity), माती मधील मॅक्रो आणि मायक्रो पोषक घटकांचे प्रमाण तपासले जाते.
माती परिक्षण कसे करावे?
माती परिक्षण पीक घेण्या अगोदर केले जाते. माती परिक्षण करत असताना आपल्या शेताच्या क्षेत्रानुसार मातीचे नमुने घेतले जातात. साधारण एक एकर क्षेत्रासाठी शेतातील ८ ते १० वेग वेगळ्या भागांवरून zigzag पद्धतीने मातीचे नमुने घेतले जातात. हे नमुने शेतातील बांधापासून दूर तसेच पाण्याचा पाट, शेतामध्ये असलेल्या मोठ्या झाडाच्या सावलीची ठिकाणे, तसेच उकिरड्याची जागा, construction site जवळील जागा सोडून इतर ठिकाणांवरून घेतले जातात. ह्या ८ ते १० ठिकाणांवरून गोळा केलेली २ ते २.५ किलो मातीचे नमुने एकत्र करून घेतले जाते. शेडमध्ये सुकवल्यानंतर त्याचे ४ समान भाग करून समोरासमोरचे दोन भाग काढून टाकले जातात. उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र करून त्याचेही परत ४ समान भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाकले जातात. ही प्रक्रिया अर्धा किलो(५०० ग्रॅम) माती शिल्लक राहीपर्यंत केली जाते. त्यानंतर हा ५०० ग्रॅम मातीचा नमुना एका कापडी पिशवी मध्ये भरून त्यामध्ये एका चिठ्ठीवरती आपले नाव, गटनंबर, ह्याआधी घेतलेले पीक, त्यासाठी वापरलेली खते व आता घेणार असलेले पीक, अशी सर्व माहिती भरून, चिठ्ठी बॅग मध्ये टाकावी. ह्या नंतर हा मातीचा नमुना माती परिक्षण केंद्रावरती तपासणीसाठी पाठवला जातो.
एका आठवाड्यमध्ये परिक्षणाचा रिपोर्ट आपल्याला मिळतो. ज्यामध्ये मातीचा प्रकार, pH, EC, ORGANIC CARBON, मॅक्रो आणि मायक्रो पोषक घटकांचे प्रमाण, कोणते घटक कमी आहेत , कोणते घटक जमिनीमध्ये जास्त आहेत अशी सर्व माहिती दिलेली असते. ज्या आधारे आपण आपल्या शेतात कोणती खते वापरायला हवी या बद्दलची माहिती आपल्या लक्षात येते.


माती परिक्षण करण्याचे फायदे?
निरोगी माती हा निरोगी पीक आणि निरोगी शेतीचा पाया आहे! माती परिक्षणामुळे शेतकऱ्याला शेतातील मातीचे सध्याचे आरोग्य कसे आहे आणि ते कसे सुधारायचे याबद्दल माहिती मिळते. मातीची सुपीकता मातीच्या जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांद्वारे निर्धारित केली जाते. मातीची रचना, मातीचा पोत आणि रंग यासारखे गुणधर्म डोळ्यांना दिसतात. परंतु, मातीची रासायनिक रचना डोळ्याने पाहणे कठीण आहे. त्यासाठी माती परिक्षण गरजेचे आहे.
माती परिक्षण केल्याने आपल्या मातीला नक्की कशाची गरज आहे ते लक्षात येते. मातीची नेमकी कमतरता काय आहे? हे जाणून घेतल्यास खतांचा अपव्यय होत नाही व खतांचे अधिक माहितीपूर्ण नियोजन करता येते. ज्याने मातीची धूप कमी होण्यास मदत होते. असे केल्याने गरज नसलेल्या खतांवरील खर्च कमी होतो.
जगाच्या सतत वाढणाऱ्या लोकसंख्येची भुक भागवण्यासाठी वाढीव उत्पादनाची गरज आहे आणि त्यासाठी सुपीक मातीची आवश्यकता आहे. निरोगी मातीमुळे पिकांची वाढ सुधारते. उत्पादन आणि नफा ही सुधारतो कारण माती परिक्षणानंतर आपण पिकांना आवश्यक असलेली ती सर्व पोषक तत्वे पुरवत असतो. ज्यामुळे लागवड आणि फवारणीसारख्या इतर प्रक्रिया सुलभ करण्यास मदत होते.
माती परिक्षणामुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदे मिळतात. कारण निरोगी पिक वाढवण्यासाठी सुपीक माती आवश्यक आहे आणि म्हणूनच मातीचे नमुने घेणे महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींचा विचार करता माती परीक्षण ही आता काळाची गरज आहे!