स्टोरी टेलींग द्वारे मूल्याधारित शिक्षण देणारी संस्था : बुकवाला

Share

स्टोरी टेलिंग एक प्रभावी माध्यम असून ज्याद्वारे गरीब, गरजू आणि पिडीत मुलांच्या शैक्षणिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलण्याचे काम शिकागो स्थित ‘बुकवाला’ संस्था करत आहे. भारतातील अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी हे यामध्ये स्वयंसेवकाची भूमिका उत्तमरीत्या पार पाडत आहे.


बुकवाला ही शिकागो शहरातील आणि अमेरीका देशातील “एन जी ओ” असून या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सिना जेकब या उच्च शिक्षित, सहृदयी महिला असून त्या मूळ केरळवासीय,भारतीय वंशाच्या आहे. ही संस्था स्थापन करण्यापूर्वी सिना जेकब यांनी 2008 ते 2010 मध्ये विविध देशांचे दौरे केले ज्यात त्यांना त्या देशातील गरीब, गरजू आणि शारीरिक शोषण झालेली आणि विविध आजारांनी पिडीत अशी मुले पाहायला मिळाली. या दुर्लक्षित मुलांच्या व्यकतीमत्वामध्ये परिवर्तन घडवून आणायचा त्यांनी निश्चय केला. भारतामध्ये अशी 3 लक्ष पेक्षा जास्त मुले आहेत ज्यांना ‘चाईल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन’ नुसार शासन विविध दृष्ट्या काळजी घेण्याचे प्रयत्न करत आहे. शासनाच्या मर्यादित संसाधनामुळे त्यांना काही मर्यादा सुद्धा आहे परंतु शासन अशा कामी विविध सामाजिक संस्थांची ( एन जी ओ ) मदत घेत आहे.


आपण ज्या देशात जन्म घेतला त्या देशात लायब्ररी आणि स्टोरी टेलींगचा शुभारंभ करायचा सिना जेकब यांनी निश्चित केले आणि 2010 साली त्यांनी ‘बुकवाला’ या संस्थेची स्थापना केली. मुंबई, पुणे, बंगळूर आणि मंगळूर या शहरांची यासाठी निवड करण्यात आली. या सर्व महत्वाच्या शहरात त्यांनी त्यासाठी लायब्ररी सुरु केली. झोपडपट्टी परिसर, सामाजिक संस्था आणि गरजू मुलांच्या जवळच्या परिसरात या लायब्ररी सुरु केल्या आहेत. या लायब्ररी गरीब गरजू आणि शारीरिक दृष्टया पीडित मुलांच्या उन्नतीसाठी सुरु केल्या आहेत. लायब्ररी मध्ये विविध गोष्टीरूपी, मूल्याधारित, साहसवीर, प्रेरणादायी कथा अशा विविध स्वरूपाची पुस्तके ठेवली आहेत. सुरुवातीस ही संकल्पना समजावणे आणि त्यासाठी मुले गोळा करणे, स्वयंसेवक गोळा करणे खूप जिकरीचे काम होते. सहा वर्षांपूर्वी तर सुरुवातीला अशा मुलांना घराघरात जाऊन विविध कथा सांगाव्या लागत असे त्यावेळेला मुलांमध्ये पुस्तकांची आवड निर्माण करणे खूप अवघड जात असे परंतु आम्ही त्यांच्यामध्ये त्याची गोडी निर्माण केली असे बुकवालाच्या इंडिया च्या ऑपरेशन मॅनेजर अंजली ठाकर यांनी सांगितले. महाविद्यालीन शिक्षण घेत असताना मी स्वयंसेवीका म्हणून आवडीने काम करण्यास सुरुवात केली आणि मुंबईतील अनेक पिडीत मुलांना ज्यावेळी मी सिंड्रेला, पीटर पॅन डिझनीच्या कथा वाचून दाखवत असे तेव्हा ही मुले हळूहळू त्या कथांशी समरस होऊ लागली आणि त्यांना पुस्तकांची आवड निर्माण झाली असल्याचे अंजली यांनी सांगीतले. या कथा सांगितल्यामुळे मुलांच्या वैचारिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्यामध्ये खूप फरक पडल्याचे नुकताच भारताचा दौरा करत असताना सिना जेकब यांना पाहायला मिळाले आहे.

पुणे शहरातली भारतीय जनसंघटना येथील आत्महत्या ग्रस्थांच्या मुलांसाठी, मानव्य संस्था, बावधन येथील एच आय व्ही ग्रस्त मुलांसाठी आणि सिंधू ताई सपकाळ यांच्या सन्मती आश्रमातील मुलांसाठी बुकवाला या संस्थेने लायब्ररी सुरु केल्या आहेत. या लायब्ररी मध्ये स्टोरी टेलिंग चे काम करणारे स्वयंसेवक आणि बुकवला चे इंडियाचे सहयोगी संचालक कल्याण डुबल, बुकवाला चे पुणे प्रेसिडेंट कुणाल पवार आणि विविध उच्च विद्याविभूषित स्वयंसेवक प्रत्येक विकेंडला आपला मौल्यवान वेळ देत आहेत. या मुलांचे ते इतके समरस झालेले आहेत कि त्यांना विकेंडला कथा वाचून दाखवत नाही तोपर्यंत चैन पडत नाही. डिप्रेशन मध्ये गेलेली आणि विविध दृष्टया पीडित मुलांमध्ये पुस्तकांमुळे आणि स्टोरी टेलिंग मुळे खूप चांगला परिणाम झाला आहे. मुलांना पुस्तकांची आवड निर्माण झाली असल्याने फावल्या वेळात मुले स्वतः सुद्धा वाचन करत असतात. मुलांची आकलनशक्ती, सहनशक्ती, आत्मविश्वास आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनामध्ये कमालीचा फरक पडला आहे असे बुकवाला च्या ऑपरेशन मॅनेजर आणि प्रेरणास्थान प्रियांका रॉय यांनी सांगितले.


बुकवाला संस्थेने तर कोयाळी येथील स्नेहवन संस्थेमध्ये अनोख्या स्वरूपात ‘कंटेनर लायब्ररी’ सुरु केली आहे जी मुलांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू झाली आहे. या संस्थेमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आहेत. या ठिकाणी जाऊन स्वयंसेवक मुलांना स्टोरी टेलींग द्वारे लायब्ररी मधील पुस्तक वाचून दाखवतात. हे स्वयंसेवक आपल्या रसाळ बोलीने आणि वाक्चातुर्याने पुस्तकातील कथा समजवून सांगत असल्याने मुलांच्या मेंदू मध्ये ते कायमचे कोरले जाते.
शिवाजी महाराज, विविध प्रेरणादायी गुरूंची पुस्तके आणि विविध शहरातील लायब्ररी संख्या वाढवत असून याद्वारे जास्तीत जास्त मुलांना स्टोरी टेलींग द्वारे मूल्याधारित आणि सर्वोत्तम नागरिक घडविण्याचे शिक्षण देण्याचे मुख्य उद्देश असल्याचे बुकवाला च्या सर्वेसर्वा सिना जेकब यांच्या कृतीतून सतत जाणवत असते. या कामासाठी त्यांना अनेक स्वयंसेवक आणि पुस्तक दात्यांची गरज आहे. वंचित, पिडीत आणि गरीब गरजू मुलांना विकास प्रक्रियेत आणण्यासाठी आपण सर्व हातभार लावू या चला उज्जवल भारत घडवण्यासाठी पुढे येऊ या