मागील लेखात आपण आत्महत्या ह्या गंभीर समस्येविषयी सखोल माहिती घेत त्याबद्दल असणारे गैरसमज आणि चुकीच्या धारणा देखील समजून घेतल्या. आजच्या लेखात एक सर्वसामान्य नागरिक कशा प्रकारे मदत करू शकतो? आपल्यापैकी प्रत्येक जण आत्महत्या रोखू शकतो ते कसे? हे आजच्या भागात आपण समजून घेवू.
आयुष्यात अनुभवलेले दुःखद प्रसंग, कडू अनुभव, मानसिक धक्के ह्याच्या बरोबरच अनेक प्रकारच्या मानसिक आजारात देखील रुग्णाच्या मनात टोकाचे निर्णय घेण्याची भावना येवू शकते.
आत्महत्येचे विचार मनात असणारी व्यक्ती ही नकळतपणे तिच्या कृतीतून आणि वागण्यातून चेतावणी देणारी लक्षणे दाखवत असते. ही लक्षणे कशी ओळखायची आपण पुढे बघुयात. एखाद्या व्यक्ती मध्ये जेवढी जास्त लक्षणे तेवढी जास्त रिस्क.
वर्तणुकीत दिसणारी धोक्याची लक्षणे-
१. कुटुंब किंवा मित्र परिवार ह्यांच्यापासून अलिप्त राहणे, एकलकोंडे होणे.
२. झोपेच्या चक्रा मध्ये (sleep cycle) अमुलाग्र बदल होणे. एकतर अतिजास्त झोपणे किंवा निद्रानाश जाणवणे.
३. अचानक, विनाकारण रडण्याचे उमाळे येणे आणि त्याचे कारण सांगता न येणे.
४. औषधोपचार बंद करणे.
५. भविष्याबद्दल कुठलेही नियोजन किंवा आशावाद नसणे.
६. स्वतःच्या भावना आणि विचार ह्यात इतके गुंतलेले असणे की त्या व्यक्त न करता येणे.
७. आपण दुसऱ्यावर ओझे आहोत, स्वतःची लाज शरम वाटत अपराधीपणाची भावना असणे.
८. Hopeless + helpless
९. स्वभावात लहरीपणा वाढत जावून फक्त अपयश ह्याच विषयावर बोलणे.
१०.असलेले व्यसन वाढणे किंवा नव्याने एखादे व्यसन जडणे. जुना मानसिक आजार विशेषतः नैराश्य ( Depression) बळावणे.
११. आत्महत्येविषयी बोलणे किंवा अशा कृतींचे समर्थन करणे. त्याबद्दल माहिती घेत राहणे ( Net Browsing)

अशी लक्षणे असलेली व्यक्ती आपल्या घरात किंवा आजूबाजूला दिसत असेल तर ती लक्षणे ओळखून त्या व्यक्तीची स्वतःहून संवाद साधणे. स्वयम् प्रेरणेने चौकशी करणे. संवाद साधताना आपण कुठले शब्द वापरत आहोत ह्याचे भान असणे फार गरजेचे आहे. डिवचले जाईल, दुखावले जाईल, कलंक वाटेल अशी भाषा न वापरता त्यांना बोलण्यासाठी संधी उपलब्ध करून देवू या. हे सर्व करत असताना एखाद्या व्यक्तीला औषधे सुरू असतील तर कृपया त्यांना औषध घेणे बंद करायला सांगू नये. ह्या उलट तज्ञ डॉक्टर आणि समुपदेशक ह्यांचा सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे जर आत्महत्येविषयी विचार मांडले असतील तर त्यांना शक्य तोवर एकटे न सोडता लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळवून देण्यास मदत करावी. हे सर्व दुसऱ्यांसाठी करण्यापूर्वी ह्या सर्व बाबी स्वतःच्या बाबतीत तर घडत नाहीत ना ह्याची पण पडताळणी जरूर करावी.
निराशेने अडकलेले, गोंधळलेले, घाबरलेले असे अनेक जण आपल्या घरात आणि आजूबाजूला आहेत त्यांच्यासाठी ऐकणारे कान होवू या… कुणाला एकट्या प्रवासात सोबत करू या… कुणी साद घातली तर त्यांना प्रतिसाद देवूया. मी समजू शकते… मी आहे सोबत असे म्हणत संवादाचा सेतू उभारुया… एका मनाकडून दुसऱ्या मनाकडे….