स्वयंघोषित अध्यात्म

Share

डॉ. निलम पाचुपते

अध्यात्म आणि विज्ञान या दोन विषयांना घेऊन आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा अजून एक मोठा गैरसमज ( विशेषतः भारतीयांच्या मनात) असा आहे, कि भारतीय लोक जे करतात किंवा आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे ते सगळं अध्यात्माचं आहे म्हणजे आम्ही नुसता पाणी प्यायलाे तरी ते अध्यात्मच या गैरसमजुतीमळे कुठे तरी आपण स्वतःला मनातल्या मनात अध्यात्मिक घोषित करून देतो आणि खऱ्या अर्थाने अधोगतीची सुरुवात तिथे होते. याचा सगळ्यात मोठा तोटा असा होतो, कि आपल्यामध्ये असणाऱ्या चुका किंवा दोष आपल्याला दिसत नाहीत. जिथे दृष्टी खुंटते आणि पुरे हा शब्द येतो, तिथे बद्धता आणि बंधन सुरु होते आणि जिथे बद्धता आहे तिथे अथांग, निर्बद्ध अशा आत्म्याची ओळख करून घेणं किंवा इतरांना करून देणं हे अशक्य आहे. आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्स्टाईन, जेम्स जीन्स सारखे अनेक शास्त्रज्ञ इंग्लंड-अमेरिके सारख्या देशातही होऊन गेले, ज्यांनी ध्यान, मानवता, देव यासारख्या अनेक संकल्पनांना नुसतं स्विकारलं नाही तर त्या संकल्पना लोकांना पटवून देण्यासाठी प्रयत्न केले, वेळो वेळो जागोजागी आपली ठाम मते ठेवली अगदी तशी पुस्तकेही प्रकाशित केली. सर जेम्स जीन्स हे तर प्रसिद्ध क्वांटम फिसिसिस्ट, मॅथॅमॅथेसीयन होते जे म्हणतात कि “सृष्टीचं चलन जर आपण नीट पाहिलं, आकाशगंगांचा अभ्यास केला तर लक्षात येईल कि या साऱ्या निर्मितीमध्ये किंवा चलन वलनामध्ये मध्ये एकही चूक नाही किंवा एर्रर नाही, देव नक्कीच एक मोठा गणितज्ञ असला पाहिजे (GOD must be a great Mathematician)”. जर खऱ्या अर्थाने अध्यात्माचं विज्ञान शोधायचं असेल तर संशोधकांमधील ऋषी आणि ऋषीं मधला संशोधक आपल्याला मनापासून स्वीकारता आला पाहिजे. संशोधकातील ऋषी यासाठी म्हंटलं कि आपल्याला जी विज्ञानाची ओळख आहे, ती सध्याच्या संशोधकाच्या संशोधनातूनच. अनेकांना प्रश्न पडू शकतो, कि अनेक संशोधक तर नास्तिक आहेत, मग त्यांना ऋषी कसं बोलायचं (?). असा प्रश्न पाडण्याचं कारण कि आपण आस्तिक आणि नास्तिक याची व्याख्या सुद्धा खुज्जी करून ठेवली आहे. खरं तर आदिगुरू शंकराचार्यांच्या विवेकचूडामणी या ग्रंथामध्ये नास्तिक त्याला म्हंटलं आहे, ज्याने साऱ्या वेद आणि पुराणांचा अभ्यास केला आहे आणि तरीही त्याला ईश्वरी शक्तीचा अस्तित्व समजलं नाही, मान्य नाही तो ‘ नास्तिक ‘ आणि ज्याने अभ्यासाने, ज्ञानाने ईश्वरी शक्तीला समजून घेतला आहे, मान्य केलं आहे पण अजून त्या ईश्वरी सत्तेला स्वतःमध्ये अनुभवणं बाकी आहे तो ‘आस्तिक’. आता विचार करा आपण ज्या ज्या लोकांना या आस्तिक – नास्तिक च्या वर्गवारीमध्ये गणिलें आहे ते खरंच योग्य आहे का? आता मनातील ही आस्तिक नास्तिकाचे, संशोधक आणि ऋषी हि वर्गवारी केली आहे ती मुजावणं आवश्यक आहे, कारण आपल्या आजू बाजूला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास विज्ञानात करतो मग ते भौतिक शास्त्र असेल, रसायन शास्त्र असेल, वनस्पती शास्त्र असेल किंवा जीवशास्त्र असेल. जिथे जिथे ज्या ज्या प्रक्रियांचा आणि संबांधांचा मागोवा घेत घेत आपण मुळापर्यंत जाणार तिथे तिथे आपल्याला चैतन्य मिळणार मग ते वृक्षांची पाणी आणि सूर्यप्रकाशापासून अन्न बनवण्याची फोटोसिन्थेसिसची प्रक्रिया असो किंवा इलेक्ट्रॉनचं व्हेव आणि पार्टीकल नेचर असो, सूक्ष्मांत सारंच चल आहे, सारंच चर आहे, सारंच चैतन्यमय आहे म्हणजेच (आपल्या भारतीय ऋषिमुनींच्या आणि संतांच्या मते) “राममय” आहे. आपल्या संतांनी यालाच परब्रह्म किंवा ईश्वरीय चेतना असं म्हंटलं आहे.

संत ज्ञानेश्वर म्हणतात,
मी आघवियेची सृष्टी│
आदिमध्यांती किरीटी│ओतप्रोत पटी│ तंतू जेवी ║[अध्याय १०/ओव्या २६४ ]
“हे किरीटी,मी सर्व सृष्टीचा आदी मध्य आणि अंत आहे. ज्याप्रमाणे वस्त्रात तंतू उभे आडवे भरलेले आहेत”
गीतेमध्ये तेराव्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्ण आपल्याला परब्रम्हाची ओळख करून देताना म्हणतात,
बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च । सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ (अध्याय १३/श्लोक १५)
“ते भूतमात्रांच्या बाहेर आहे, आत आहे, ते अचर आणि चर आहे, सूक्ष्मत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे, तसेच ते दूर आहे व जवळही आहे (ते परब्रह्म आहे ) “

  • (लेखिका किर्तनकार, भागवतकथाकार, प्रेरणादायी वक्त्या असून एम्. एस्सी. मध्ये मुंबई विद्यापीठाच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत तसेच रसायनशास्रात पी.एच.डी. आहेत.)