ह्या जगात सर्वात चिरतरुण, कणखर अणि पटकन प्रभाव टाकणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे द्वेष.
काही लोकांत, जमातीत, समाज वर्गात एकमेकात कितीही वितुष्ट असुदे पण त्यांना एक करतो तो, एका व्यक्ती किंवा घटना किंवा गोष्टीसाठी असलेला द्वेष.
एक मान्यच केलं पाहिजे, द्वेष लोकांची बुद्धी फार झटकन व्यापून टाकतो.
लोकांना लवकर एकत्र आणण्याचं काम द्वेष करतं. द्वेषा इतका सदसद्विवेक बुद्धीचा ताबा दुसरे कुणीच घेऊ शकत नाही.
हा बाकीच्या भावनांपेक्षा किती वेगळा असतो ना!
तो तरुण असतो अणि म्हातारा पण असतो. म्हणजे, तो नुकताच निर्माण झालेला असतो किंवा वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या चालत आलेला असतो.
त्याचं खास वैशिष्टय़ म्हणजे, तो ज्यातून निर्माण झाला, त्याच कारणांना परत जन्म देतो. माणसाला एका न संपणाऱ्या चक्रात अडकवतो. तोही ईतक्या बेमालूमपणे की, अडकत जाणार्या माणसाला कळत देखील नाही की आपण द्वेष नावाच्या दुष्टचक्रात अडकलोय.
आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे, द्वेष दिवसा कधी विश्रांती घेत नाही अणि रात्री कधी झोपत नाही. अणि तरीही तो कधीच थकत नाही. जेंव्हा पाहू तेंव्हा तेंव्हा द्वेष ताजातवानाच असतो. विश्रांती न घेतल्याने तो आणखीनच तल्लख राहतो.
अनेक गोंडस नावाखाली हा द्वेष जगाच्या बाजारात सापडतो अणि हातोहात विकला जातो.
ह्याची लागण इतक्या त्वरेने होते की त्याच्यासमोर सर्वात जलद असलेला प्रकाशाचा वेग सुद्धा कमी पडतो.
द्वेष हा अनेक धर्मांच्या नावाखाली विकला जातो.
हा अनेक देश पण विकतात.
कधी आपल्याच लोकांमध्ये वाटतात तर कधी ह्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो.
अहो! न्याय सुद्धा जोपर्यंत द्वेषाची लागण होत नाही तोपर्यंत व्यवस्थित सरळमार्गी चाललेला असतो. पण न्यायाला द्वेषाचा संसर्ग झाला की न्याय हा बुद्धीचे बोट सोडून अतिरेकी विचारांचा हात धरतो.
बाकीच्या भावना ह्याच्या समोर अगदी फिक्या आहेत.
बाकीच्या भावना काळानुरूप कमी जास्त होत असतात… पण द्वेषाचे तसं नाही.. तो एकदा मनात किंवा डोक्यात घुसला की तसाच राहतो किंवा वाढत जातो.
एक छोटीशी ठिणगी सुद्धा द्वेषाने भरलेले डोके पेटवायला भडकावायला पुरेशी पडते.
तुम्ही कधी ऐकलं का! की माणुसकीच्या नावाखाली सगळी लोकं एकत्र आली होती… नाही. पण द्वेषाने पेटून उठली तर खूप जण एकत्र येतात.
अहो करुणा, दया, माया ह्यांनी होत नाही तेवढे पटकन द्वेषाने हे काम होते.
द्वेष किंवा तिरस्कार ह्यामध्ये भरपूर ताकद आहे. माणसं जेवढ्या निष्ठेने द्वेष मिरवतात त्यावरुन त्याचे लोकांना किती महत्व वाटते, हे पण कळते.
द्वेषाने इतिहासाच्या पुस्तकांची पानंच्या पानं भरली आहेत.
अनेक भूगोल बदलायची ताकद द्वेषात आहे.
साहित्य बदलायची प्रतिभा द्वेषात आहे.
अणि केवढ्या प्रतिमा असतात त्याच्या!
द्वेष हा बलात्काराच्या रूपाने, खून व दरोडय़ाच्या रूपाने, दहशतवाद, आतंकवाद, अतिरेकी अशा अनेक रूपांनी तो आपल्या समोर येतो.
केवढी व्याप्ती आहे द्वेषाची!
तो घराघरांत, शहरात, गावागावात, प्रांतात, निरनिराळ्या समाजात, देशोदेशी सगळीकडे सापडतो.
द्वेषाचे सौंदर्य तर काय सांगावे!
त्याचा आपलाच एक वेगळाच सौंदर्याविष्कार असतो.
फुटणाऱ्या बॉम्बचा प्रकाश हा सूर्यप्रकाशाला सुद्धा फिका करेल.
साहित्यामध्ये जसे नवरस असतात तसेच द्वेषाचे ही असतात.
द्वेषातून झालेल्या हिंसाचारानंतर ओसाड अणि सुनेसुने पडलेले प्रदेश, हे करूण रसाला लाजवतील.
हिंसाचार अणि दंग्यांनंतर येणारी शांततेसारखी शांतता शोधून सापडणार नाही.
काही झालं तरी द्वेष आपल्या मूळ स्वभावाशी कधीच फारकत घेत नाही. घरटी बांधण्यासाठी रोज नवीन मनं अणि नवीन डोकी शोधत असतो.
विक्रम इंगळे
कंटेंट रायटर आणि ट्रान्स्लेटर