टॉन्सिल्स आणि होमिओपॅथी

Share

डॉ. नीलम गायकवाड

.

वातावरण बदलले किंवा काही थंड, तेलकट खाण्यात आले तर लगेच सर्दी घसा दुःखी होवून ताप येण्याचा प्रकार बऱ्याच मुलांमध्ये दिसून येतो. अशी मुलांमध्ये दिसून येणारी व वारंवार त्रास देणारी तक्रार म्हणजे टॉन्सिल्स ची तक्रार. टॉन्सिल्स म्हणजे घशाच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या अंडाकृती ग्रंथी. ह्या ग्रंथींना जेंव्हा जंतुसंसर्ग होवून सूज येते आणि त्या लालसर होतात तेंव्हा त्या त्रासाला “टॉन्सीलायटिस” असे म्हणतात. वारंवार ताप येणे, घसा दुखणे, वारंवार सर्दी खोकला होणे, गिळताना त्रास होणे, रात्री झोपेत घशातून आवाज येणे ही टॉन्सीलायटिस ची काही महत्वाची आणि सर्वसामान्य लक्षणे आहेत. आधीच कमजोर प्रतिकार शक्तीमुळे मूल अशक्त झालेले असते आणि घसा सतत दुखत असल्याने मुलांचे खाणे अजुन कमी होते. परिणामी मुलांच्या आरोग्यावर ह्याचा वाईट परिणाम होतो.
तसे बघितले तर ह्या दोन्ही ग्रंथी आपल्या रोग प्रतिकारक प्रणालीचा महत्वाचा भाग आहेत. साध्या भाषेत सांगायचे झाले तर, आपल्या शरीराचा प्रवेशमार्ग अर्थात आपला घसा आणि त्या मार्गावर तैनात केलेले हे दोन सैनिक म्हणजे टॉन्सिल्स. त्यामुळे कुठलाही जंतू जेंव्हा घशातून शरीरात प्रवेश करू पाहतो त्याला ह्या दोन सैनिकांशी दोन हाथ करावे लागतात. आणि त्या हतापायीचा परिणाम म्हणजे टॉन्सिल्स ला जंतू संसर्ग होऊन सूज येणे. आलेल्या जंतूंना कैद करून ठेवणे आणि प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रतिद्रव्य ( अँटीबॉडी) तयार करण्याचे काम ह्या ग्रंथी करत असतात. विशेषतः लहान मुलांमध्ये दिसून येणारा हा त्रास वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. जसे जीवाणू किंवा विषाणू ह्यांमुळे होणारा त्रास, किंवा आत्ता नुकताच सुरू झालेला त्रास ( ॲक्युट ), जुनाच असलेला परंतु आत्ता वाढलेला त्रास ( सब ॲक्यूट ) किंवा फार जुना नेहमीच होणारा (क्रॉनिक ). वारंवार टॉन्सिल्स ला सूज येवून घसा दुखत असेल तर त्याचा अर्थ प्रतिकार शक्ती कमी आहे असा होतो. त्यामुळे टॉन्सिल्स चे ऑपरेशन करणे म्हणजे आधीच नाजून असलेली प्रतिकार शक्ती अजुन कमजोर करणे होय. गुंतागुंतीच्या काही केसेस मध्ये ऑपरेशन हा पर्याय निवडावा लागतो. परंतु होमिओपॅथिक औषधांनी मुलांना वारंवार होणार हा त्रास कमी करून ऑपरेशन नक्कीच टाळू शकतो. होमिओपॅथिक औषधांनी मुळातच आपल्याला प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फायदा होतो. आणि लहान मुलांच्या बाबतीत सांगायचे झाले तर वातावरणातील बदलाने, आहारातील बदलाने वारंवार त्रास होण्याचा प्रकार निश्चितच रोखता येवू शकतो. घरात आनुवंशिकता असेल तर हा त्रास होण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत मुलांना चांगल्या सवयी नसतील तर हा त्रास होवू जास्त प्रमाणात दिसून येतो.
होमिओपॅथिक औषधे जी घेण्यासाठी सोपी आणि लहान मुलांच्या आवडीची असतात त्यांच्या साहाय्याने प्रतिकार शक्ती वाढवून ह्या त्रासातून मुलांची सुटका करता येते.
बरायटा कार्ब, बेलाडोना, अकॉनाइट, काली मूर, गुयाकम, सिलिशिया, हीपर सल्फ फायटोलाका सारखी औषधे अत्यंत गुणकारी आहेत. सदर औषधे ही तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. कुठली बाजू जास्त दुखत आहे, आजाराची अवस्था काय आहे, यासोबत अजुन दुसरा कुठला त्रास आहे, काय केल्याने त्रास कमी अधिक होतो ह्या सर्व इतर लक्षणांच्या आधारे औषध निवड केली जाते. आपल्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारात कुण्या लहानग्यांना हा त्रास असेल तर ऑपरेशन करून टॉन्सिल्स काढून टाकण्याआधी होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
धन्यवाद…!
पुढील भागात नवीन विषयासह पुन्हा भेटू…
तो पर्यंत…
कळावे, लोभ असावा…

डॉ. सौ. नीलम गायकवाड.
एम. डी. ( होमिओपॅथी )
एम. एस. ( कौंसेलिंग )