मित्रांनो नमस्कार. आजचा विषय हा आपल्या सर्वांना माहीत आहे. रोजच्या बोलण्यातील, गप्पातील, चर्चेतील शब्द. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या सोशल मीडियावर कार्यरत असतो. वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कोणी नाही असे होऊच शकणार नाही. आजचा लेखनप्रपंच हा अशाच एका गृपवरील झालेल्या चॅटिंग / ट्रोलींग तसेच निरिक्षणातून आलेला आहे. मनात म्हणलं यावर पोस्ट लिहून व्यक्त व्हावे. एक मेसेज द्यावा.
मग ट्रोलिंग म्हणजे नेमके काय??
मूळात ट्रोलिंग हे वृत्तीतील नकारात्मता दर्शवते. ती नकारात्मकच बाब आहे.
एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला, दाहक, अपमानास्पद, वादग्रस्त, आक्षेपार्ह आणि असंबद्ध बोलून चिथावणीखोर वृत्तीचे दर्शन किंवा व्यक्तव्य करणे म्हणजे ट्रोलिंग.
हल्ली आपण सोशल साईटसवर किंवा आपल्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर याचा अनुभव घेतो आहोत. एखाद्या व्यक्तीची कृती ( मग ती योग्य की अयोग्य हा मुद्दा नाही, कोणतीही कृती ) इतरांना सुसंबद्ध वाटत नसेल, असह्य होत असेल, तेंव्हा त्या प्रसंगापुरती का होईना, ही ग्रुपमधील नकारात्मकतेची समविचारी मंडळी एकत्र येऊन, त्या व्यक्तीला कशी ट्रोल करतात याचा अनुभव बहुतेक सर्वांना आला असेल. खरं तर ही ट्रोलींग करणारी मंडळी जेंव्हा ट्रोल करत असतात तेंव्हा ते त्यांच्या मानसिकतेचे दर्शन देत असतात. आपले ज्ञान किती आहे (म्हणजे उच्च दर्जाचे हा) हे प्रदर्शित करत असतात. ग्रुपमध्ये कुणाला ट्रोल करायचे हे खाजगीत आधीच ठरलेले असते कारण त्यांच्या मेसेजिंगवरून ते सहज लक्षात येते. कधी कधी काय असतं मित्रांनो, व्हॉट्स ॲप ग्रूपवर काही मंडळी कधीच ॲक्टीव्ह नसतात, झोपलेले असतात, पण असा काही ट्रोलिंगचा विषय निघाला की तेवढ्यापुरते का होईना ठोकायला सोडत नाहीत. ट्रोलिंगमधे सहभागी होण्याची ती एक खुमखुमी / सुप्त इच्छा असते. मानसिक भूक असते. ही सर्व मंडळी एकमेकांच्या मेसेजिंगला एका क्षणात लाइक्स, बदाम वाटप करत असतात. खूप तत्पर असतात हो. बरोबर ना ?? आणि इथेच या मंडळींच्या मानसिकतेचे दर्शन होते आणि बुद्धी कोणत्या प्रकारे, कशी चालते हे समजते.
नेहमीच नकारात्मकता या ट्रोलिंग मधे असते असं नाही, एखाद्याचे कधी कधी कौतुक आणि स्तुतीपर वाक्य टाकूनही इतरांना त्या ट्रोलिंगमधे उतरवण्याचा (भडकावणे या शब्दापेक्षा प्रवृत्त केले जाते, थोडं सौम्य फिलिंग) प्रयत्न केला जातो. त्या कौतुकामधे गुगली बॉल असतो. कालच एका ग्रुपवर घडलेले उदाहरण. अशा कुशाग्र बुद्धिमत्तेला दादच द्यावी लागते.
अगदी सुरुवातीला मलाही ट्रोलिंग हा शब्द माहीत नव्हता. कोणी बोलताना हा शब्द उच्चारला की डोक्यावरून जायचे. थोडा अभ्यास केला, मग हळूहळू ही भानगड काय आहे ती समजली. नकारात्मक मानसिकतेशी निगडित हा विषय आहे.
मग असे नकारात्मक ट्रोलिंग करून काय मिळते?? तर उत्तर आहे मानसिक समाधान होय. संधी आली आहे तर ट्रोलिंगमधे हात धूऊन घेणे, ही वृत्ती. यामधे मग तो सो कॉल्ड सुशिक्षितपणा हरपून गेलेला असतो. यातून कधीकधी अपशब्द बोलला जाण्याचीही शक्यताअसते. आपल्याजवळ असलेल्या इगोला,अहंभावाला शाबासकी देऊन, कुरवाळून दुसऱ्याला हरवलेल्याचा मनस्वी आनंद म्हणजे ट्रोलींग असे माझे मत. आपण अनैतिकतेने, खोटेपणाने दुसऱ्याला कसे हरवले आहे याची जाण / कबूली आपल्या मनाने दिलेली असते, त्यात भ्रामकपणे जिंकल्याची भावना असते. कधी कधी ज्या व्यक्तीवर ट्रोलिंग झालेले असते ती खऱ्या अर्थाने जिंकलेली असते.
मग ही ट्रोलींगची वृत्ती कायमस्वरूपी असते का?? तर उत्तर आहे की, ही परिस्थितीनुसार, प्रसंगानुसार बदलते पण हे असे केलेले कृत्य हे कायमस्वरूपी लक्षात रहाते, सहजासहजी विसरले जात नाही. वेगवेगळ्या मानसिकतेच्या, विचारसरणीच्या व्यक्ती अशा ट्रोलिंगला, सहजपणे एकत्र आलेल्या दिसतात, त्यात त्यांची झालेली एकजूट ही त्यांच्या चॅटिंग वरून सहज दिसते. अशा त्यांच्या एकीमध्ये सर्वांचे वरवरचे का होईना एकमेकांबद्दल तात्पुरते उफाळून आलेले प्रेम,एकजूट,उसनी कौटुंबिक भाषा दिसते. हेतू साध्य होत नाही तोपर्यंत हे सगळं असतं, नंतर मात्र हे सगळं लुप्त होतं.
दुसऱ्याला जाणूनबुजून दुःखी करणे, अपमानित करणे,शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या
खच्चीकरण करणे, भडकावणे, करमणुकीसाठी, तसेच बदला घेण्यासाठी तर कधी कधी इतरांचे लक्ष खेचण्यासाठी (Attention Seeking) ट्रोलींग केले जाते.
ट्रोलींग करणार्याने वापरलेले शब्द हे त्या व्यक्तीच्या खऱ्या रूपाचे प्रतिबिंब असते. त्यातून त्या व्यक्तीवर झालेले संस्कार,सामाजिक स्थान, घरातले वातावरण दिसून येते.
तर मित्रांनो असं आहे ट्रोलिंग. मी आपलं ट्रोलिंग कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्ट आवडली नाही तर तुम्ही मला या पोस्टवरून ट्रोल करण्याची शक्यता / कल्पना आहे.
पोस्टचा मेसेज :- या पोस्टला सकारात्मक वृत्तीने बघा. कोणालाही असे ट्रोलिंग करून दुखवू नका. तर अशा या ट्रोलींगने,नकारात्मक कमेंट्सने इमेज खराब होण्याची शक्यता असते किंवा होते आणि ती खराब झालेली इमेज ही त्या व्यक्तीच्या किंवा ग्रुपच्या स्मरणात कायमस्वरुपी रहाते. माणूस अपमानित गोष्टी, घटना, प्रसंग सहजासहजी विसरत नाही. थोडा विचार करा. कर्माने ती वाईट कृती आहे हे त्रिवार सत्य. कर्म हे बूमरँग प्रमाणे असते. चांगले अथवा वाईट, कालांतराने कदाचित वेगळ्या स्वरूपात पण फिरून आपल्याकडेच येते.
प्रमोद कुलकर्णी,
निवृत्त एसबीआय अधिकारी
पुणे.